J आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना हटवून त्यांच्या जागी कुमार विश्वास यांना संयोजक पदी नेमावे अशी मागणी आपचे कार्यकर्ते करीत आहेत. त्यासाठी रविवारी दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर आप पक्षाची बौठक होणार आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर येथे रविवारी ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर नेतृत्व बदलाच्या मागणीने जोर धरला आहे. ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ७० सदस्य आहेत. ‘आप’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, या ७० सदस्यांना पक्षाच्या संयोजकाला पदावरून हटविण्याचा अधिकार आहे. या बैठकीत नेतृत्व बदलाचा प्रस्ताव चर्चेला येण्याची शक्यता आहे. कुमार विश्वास मात्र या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
तसेच, आम आदमी पक्षाच्या नेत्या अश्विनी उपाध्याय यांची आज (रविवार) ‘आप’मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. ‘आप’ने आज त्यांना ई-मेल पाठवून पक्षातून हकालपट्टी केल्याची माहिती दिली. तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्यात आली आहे. उपाध्याय यांनी अरविंद केजरीवाल यांच्याऐवजी कुमार विश्वास यांना पक्षप्रमुख करण्याची मागणी केली होती.