‘एल्फिन्स्टन’चे गुन्हेगार सापडतील ?

0
1688

सावित्री दुर्घटनेतले गुन्हेगार अजून सापडलेच नाहीत…

तीच अवस्था एल्फिन्स्टन दुर्घटनेबाबत होणार 

जे बळी गेलेत त्यांना न्याय मिळण्याची शक्यता धुसरच..

सावित्रीच्या पुलाची दुर्घटना आठवतेय…2 ऑगस्ट 2016 च्या काळरात्री त्या दुर्घटनेत पन्नास निष्पाप लोक ठार झाले होते.त्या घटनेत आणि आज एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील दुर्घटनेत बरंच साम्य आहे.दोन्हीकडे स्ट्रक्चरल ऑडीट झालेलं नव्हतं.त्याची गरज अनेकदा व्यक्त करूनही..ती दुर्घटना घडल्यानंतर मंत्री-संत्री आले,आरोप-प्रत्यारोप झाले.मग लोकसंताप शांत करण्यासाठी चौकशी आयोग नेमण्याची घोषणा झाली.आजही तेच होतंय.रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी चौकशी करण्याचं आश्‍वासन दिलंय.उच्चस्तरीय चौकशी होणार आहे म्हणे..ही एखादया आयोगामार्फत होणार आहे की,अन्य पध्दतीनं ते स्पष्ट व्हायचंय.अर्थात कशीही झाली तरी तो सोपस्काराचा भाग असतो.अशा चौकश्यातून हाती काहीच लागत नाही. अशा चौकश्यांचं आणि चौकशी आयोगाचं पुढं काय होतंय याचा कोणी विचार केलाय  का ? .बाकीचं सोडा सावित्रीच्या दुर्घटनेतील चौकशी आयोगाचं बघा कसं चाललंय ते..दुर्घटना घडल्यानंतर कमिशन ऑफ इन्क्वॉयरी अ‍ॅक्ट 1952 च्या तरतुदीनुसार 1-10-2016 रोजीच्या एका आदेशान्वये न्या.एस.के.शहा यांचा एक सदस्य आयोग नेमण्यात आला.आयोगाला सांगितलं की,त्यांनी आपला अहवाल सहा महिन्यात सादर करावा.ठरलेल्या कालावधीत चौकशीचं काम झालं असतं तर 31-03-2017 रोजीच अहवाल सादर झाला असता.कारण तो मुदतीचा शेवटचा दिवस होता.मात्र तसं झालं नाही.न्या.शहा यांनी आयोग जाहीर झाल्यानंतर एक महिन्यानं 02-11-2016 रोजी आयोगाचा अधिभार स्वीकारला.त्यानंतर सहा महिन्याची मुदत 30-04-2017 रोजी संपणार होती.परंतू आयोगानं सरकारकडं मुदतवाढ मागितली आणि सरकारनं  30-08-2017 पर्यंत मुदतवाढ दिली.मात्र या काळातही आयोगाचं काम झालं नाही.त्यामुळं आयोगानं 11-08-2017 रोजी सरकारला एक पत्र लिहून पुन्हा एकदा सरकारकडं सहा महिन्याची मुदतवाढ मागितली.ती 11 सप्टेंबर 2017 रोजी दिली गेली आणि आयोगानं आपला अहवाल 30-11-2017 पर्यंत द्यावा असं आयोगाला सांगितलं गेलं.गंमत आणि दुदैव्यं असं की,पाच महिन्यात नवा पूल बांधून झाला.पण तेरा महिने उलटून गेल्यानंतरही चौकशी आयोगाचा अहवाल काही आला नाही.त्यामुळं सावित्रीच्या दुर्घटनेला जबाबदार कोण ? हे अजून कोणाला कळलंच नाही.अहवाल कधी येईल माहिती नाही.तोपर्यंत लोक घटना विसरतील,कदाचित जे जबाबदार असतील ते निवृत्तही झाले असतील.एल्फीस्टनच्या रेल्वे पूल दुर्घटनेचं यापेक्षा वेगळं काही होणार नाही.या दुर्घटनेला कोण जबाबदार आहे याचं उत्तर कोणीच देत नाही.काही जण प्रशासनाला दोष देतात तर काहींनी चक्क पावसाला जबाबदार धरलं आहे.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा म्हणणारे हास्यस्पद विधानं करतात.कोणावर हा गुन्हा दाखल करणार ?.सत्ताधारी म्हणतात,चौकशी होऊ द्या,मग गुन्हेगारांना जबाबदार धरू.चौकशी समिती असेल किंवा आयोग याचे अहवाल वेळेवर येत नाहीत हा नेहमीचा अनुभव असल्यानं जसे सावित्रीच्या दुर्घटनेचे दोषी सापडलेच नाहीत तशीच गत एल्फ्ीन्स्टनच्या दुर्घटनेच्या बाबतीतही होणार आहे.खरे गुन्हेगार सापडणारच नाहीत.दोन दिवसांनी अन्य बातम्या येतील आम्हीही विसरू आणि जनताही .जे गेले त्यांना न्याय मिळण्याची शक्यता मात्र अजिबात नाही.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here