पत्रकारितेतील ‘साधुत्व’ हरपले !

0
809

‘सिंहासन’, ‘झिपऱ्या’, ‘मुंबई दिनांक’ अशा एकाहून एक सरस कलाकृतींनी मराठी साहित्यविश्वात स्वत:चे अढळ स्थान निर्माण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि पत्रकार अरुण साधू यांचे सोमवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. वयोमानामुळे गेल्या काही दिवसांपासून साधू यांची प्रकृती खालावली होती. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता. त्रास वाढत गेल्याने काल सकाळी त्यांना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान अखेर आज पहाटे साडेचार वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. साधू यांचे पार्थिव वांद्रा येथील त्यांच्या राहत्या घरी नेण्यात येणार असून तिथेच अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांनी देहदान करण्याचा निर्णय घेतला असल्याने त्यानुसार पुढील सोपस्कार पार पाडले जाणार आहेत. साधू यांच्या निधनामुळे पत्रकारिता, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील एक मोठे नाव काळाच्या पडद्याआड गेले आहे.

चतुरस्त्र प्रतिभेच्या अरुण साधू यांनी मराठीत कादंबरी, कथासंग्रह, एकांकिका, नाटक आणि ललित लेखन या विविध साहित्यप्रकारांच्या माध्यमातून विपूल लेखन केले. त्यांच्या ‘सिंहासन’ आणि ‘मुंबई दिनांक’ या दोन कादंबऱ्या मराठी साहित्यविश्वात प्रचंड लोकप्रिय ठरल्या. यावर आधारित ‘सिंहासन’ हा चित्रपटही अजराअमर ठरला. या सिनेमातील ‘दिगू टिपणीस’ हे अभिनेते निळू फुले यांनी साकारलेले पात्र अरूण साधू यांच्यावरच बेतलेले होते, अशीही चर्चा त्यावेळी झाली. ‘सिंहासन’ या सिनेमात अरूण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मधुकर तोरडमल, मोहन आगाशे, दत्ता भट, सतीष दुभाषी, रिमा लागू, लालन सारंग, जयराम हर्डीकर, नाना पाटेकर या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. मराठी सिनेसृष्टीतला ‘मास्टरपीस’ म्हणून या सिनेमाकडे आजही पाहिले जाते. मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर साधू यांची पकड होती. जवळपास ३० वर्षे पत्रकारितेत असलेल्या अरुण साधू यांनी ‘केसरी’, ‘माणूस’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. सहा वर्षे ते पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. याशिवाय, त्यांनी रशिया, चीन व क्युबातील साम्यवादी क्रांतीवर आधारित पुस्तकांचेही लिखाण केले. ‘एक माणूस उडतो त्याची गोष्ट’, ‘कथा युगभानाची’, ‘बिनपावसाचा दिवस’ हे त्यांचे कथासंग्रही गाजले. ‘पडघम’ या नाटकाचेही लिखाण त्यांनी केले. ‘अक्षांश रेखांश’, ‘तिसरी क्रांती’, ‘सभापर्व’ यांसारखे त्यांचे ललित लेखनही वाचकांनी डोक्यावर घेतले.

लोकसत्तावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here