प्रसारभारती‘कडून १२ जूनचा मूहूर्त; दिल्लीतील मराठी वृत्तविभाग मुंबईत हलवणार
दिल्ली आकाशवाणीवरून प्रसारित होणारी मराठीतील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमीपत्रे बंद करण्यासाठी १२ जूनचा मुहूर्त ‘प्रसारभारती’ने काढल्याचे समजते. त्यामुळे दिल्ली आकाशवाणी केंद्रातील मराठीचा राष्ट्रीय वृत्तविभाग मुंबईत हलविण्याची औपचारिकता फक्त उरली आहे. तब्बल ७७ वर्षांपासून मराठी श्रोत्यांच्या मनात एक स्थान निर्माण करणाऱ्या या दिल्लीतून सहक्षेपित होणाऱ्या राष्ट्रीय बातमीपत्रांचा आवाज आता काळाच्या उदरात कायमचा गुडूप होईल.
‘केवळ मराठीच नव्हे, तर दिल्लीतील चौदा प्रादेशिक भाषांचा राष्ट्रीय वृत्त विभाग त्या त्या राज्यांच्या राजधानीत हलविण्याचा धोरणात्मक निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे. त्याची अंमलबजावणीही चालू झाली असून आतापर्यंत आसामी, उडिया, मल्याळी आणि तमीळ बातमीपत्रे हलविली गेली आहेत. आता पुढचा क्रमांक मराठी व गुजरातीचा आहे. तांत्रिकदृष्टय़ा सोमवार, दि. ५ जूनपासूनच दिल्ली आकाशवाणीवरून प्रक्षेपित होणारी मराठी बातमीपत्रे बंद होतील. कारण ५ जूनपासून मुंबईहूनही बातमीपत्रे प्रक्षेपित होतील. एका आठवडय़ाच्या चाचणीनंतर दिल्लीतील मराठी प्रादेशिक विभाग कायमचा बंद होईल,’ अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दिल्लीतील मराठी विभागावर गंडांतर आल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने १४ ऑगस्ट २०१६ रोजी दिले होते. पुण्यासह अन्य सहा शहरांमधील आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्त विभाग बंद करण्याचा ‘धोरणात्मक निर्णय’ जनमताच्या रेटय़ानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थगित केला होता. त्याच पद्धतीने दिल्लीतील प्रक्षेपित चौदा भाषांवरील गंडांतर टळण्याची खात्री वाटत होती. त्यासाठी काही मंत्री व सुमारे पन्नास खासदारांनी पत्रे लिहिली होती, पण त्याचा फारसा उपयोग झाला नसल्याचे दिसते आहे. मराठी व गुजराती झाल्यानंतर बंगाली, पंजाबी, काश्मिरी, डोंगरी, अरुणाचली आदींचा क्रमांक लागेल. त्यामुळे यापुढे राजधानीतील ‘आकाशवाणी भवना’तील ‘मिनी भारता’मध्ये फक्त हिंदी, संस्कृत आणि उर्दू या तीन भाषाभगिनींचे अस्तित्व राहील.
दीड लाखांहून अधिक मराठीजन दिल्लीमध्ये आहेत. तरीदेखील मराठीचे उत्तम ज्ञान असलेली मंडळी मिळत नसल्याचे कारण पुढे सरकविले जात आहे. हेच सूत्र अन्य भाषांनाही लावण्यात आले.
लोकसत्तावरून साभार