पत्रकार संरक्षण कायद्यासाठी तब्बल बारा वर्षे चाललेला लढा जेवढा विलक्षण होता तेवढाच तो राज्यातील पत्रकारांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारा होता.सरकारं येत होती जात होती,कायद्याचा पाळणा हालत नव्हता.राजकारणी वेगवेगळे बहाणे सांगत होते.आपल्यामधीलच काही दीडशहाणे आडवे पाय घालत होते.तर काही राजकारणी तुमच्या हयातीत कायदा होणार नसल्याचे भाकित वर्तवित होते.आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर हेलकावे खाणार्या या चळवळीचं काय होणार ? हे कळत नव्हतं.मात्र पत्रकारांची भक्कम एकजूट,त्यांनी शांततेच्या आणि सनदशीर मार्गानं चालविलेलं आंदोलन,आणि चिकाटी यामुळं सरकारला कायदा कऱणं भाग पडलं.मात्र ही सारी लढाई सोपी नव्हती. शांततेच्या मार्गानं लढलेल्या या लढयाची हकिकत चळवळींना कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते याची जाणीव करून देणारी आहे.या लढयाची साद्यंत माहिती देणारे कथा एका संघर्षाची या एस.एम.देशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन 25 जून रोजी नागपूर येथील मराठी पत्रकार परिषदेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात होणार आहे.