पत्रकारांमुळे ज्यांचे हितसंबंध दुखावले आहेत अशी मंडळी भलेही पत्रकारांच्या नावाने कितीही शिमगा करीत असली तरी पत्रकार हा समजाचा जागल्या या नात्यानं सातत्यानं आपली भूमिका पार पाडत आला आहे.अनेक धोके पत्करून समाजहिताचे काम करताना पत्रकार मागे-पुढे पहात नाहीत.एका जिगरबाज महिला पत्रकाराने दाखविलेले धाडस,पत्करलेल्या धोक्यामुळं समाजहितविरोधी काम करणार्‍या एका डॉक्टराला सक्तमजुरीची शिक्षा झाली आहे.तमाम पत्रकारांना अभिमान वाटावा अशी ही स्टोरी…
मुंबई : मालेगावमध्ये लिंगनिदान करताना पकडण्यात आलेल्या दोन डॉक्टरांना गजांआड पाठवण्यात धाडसी वाटा आहे एका पत्रकार तरुणीचा! तिचे सामाजिक भान आणि अभूतपूर्व धाडस यामुळेच खणखणीत पुरावे सादर होऊन डॉक्टरांना सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकली.
 
महिलांच्या हक्कांविषयी सातत्याने लिहिणारी साताऱ्याची प्रगती जाधव-पाटील ही पत्रकार तरुणी प्रतिष्ठेच्या लाडली पुरस्काराची मानकरी आहे. न्यासा तिची मोठी मुलगी. दुसऱ्यांदा गर्भवती राहिली तेव्हा ‘लेक लाडकी अभियाना’कडे संपर्क साधून स्टिंग ऑपरेशनमध्ये सहभागी होण्याची इच्छा तिने व्यक्त केली. पत्रकार पती शैलेंद्र पाटील यांचा तिला पूर्ण पाठिंबा होता.
 
गर्भलिंग निदानासाठी बनावट रुग्ण म्हणून जाणे धोकादायक असते. ओळख उघड झाली तर मारहाण होऊ शकते, प्रसंगी जिवावर बेतू शकते. अॅड. वर्षा देशपांडे यांनी तिला तशी कल्पना देत सोबत तिची सर्वतोपरी काळजी घेण्याची ग्वाहीही दिली. प्रगती निर्णयावर ठाम होती. त्यांनी कर्नाटकात केलेल्या काही स्टिंग ऑपरेशनला यश आले नाही, पण मालेगावात ते जमले.
 
२० जुलै, २०१३ या दिवशी अभियानाचे कार्यकर्ते कैलास जाधव तिचा भाऊ तर अॅड. शैला जाधव मावशी झाल्या. प्रगती साताऱ्याची, स्टिंग ऑपरेशन मालेगावात. प्रगतीने स्थानिक रिक्षावाल्यांशी बोलून भाषेचा लहेजा बदलला. शंका नको म्हणून एसटीने प्रवास केला.
 
डॉ. सुमीत देवरे यांच्याकडे पहिली सोनोग्राफी झाली. तिथून त्यांना डॉ. अभिजीत देवरे यांच्याकडे पाठवण्यात आले. स्टिंग ऑपरेशनमध्ये हे कार्यकर्ते स्पाय कामेरे आणि छोटा ऑडिओ रेकॉर्डर वापरतात. हे दोन्ही कैलासकडे होते. डॉक्टरांनी फक्त दोन्ही महिलांनाच आत घेतल्याने काय करायचे, हा प्रश्न होता. पण बाहेर थांबलेल्या कैलासकडून डॉक्टरचा सहायक १२ हजार पाचशे रुपये घेताना कॅमेऱ्यात कैद झाला. डॉक्टरांनी सराइतपणे तपासून थंडपणे मुलगी असल्याचे सांगितले. कैलास डॉक्टरशी बोलायला म्हणून आत गेला, मुलगीच असल्याचे त्याच्याकडून पुन्हा वदवून घेतले. ऑडीओ आणि व्हिडीओरूपात सज्जड पुरावा मिळाला होता. एक मोठी कामगिरी पार पडल्याचे समाधान होते, प्रगती सांगते.
(ही स्टोरी आजच्या महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिध्द झाली आहे.मटाच्या सौजन्यानं येथे ती प्रसिध्द केली आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here