एस.एम.देशमुख यांचे रामटेकमध्ये प्रतिपादन
ऊठसुठ पत्रकारांना आत्मचिंतनाचे डोस पाजणार्या
राजकारण्यांनीच अगोदर स्वतः आत्मचिंतन करावे
रामटेकः लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आज अस्वस्थ का आहे ? ,वीस वीस वर्षे पाठपुरावा करूनही पत्रकारांचे प्रश्न सुटत का नाहीत ?,बिहार आणि युपी पेक्षाही महाराष्ट्रात पत्रकारांवर जास्त हल्ले होत असताना ते आपण थांबवू का शकत नाहीत ? पत्रकारांना संरक्षण देण्यात सरकार आज अपयशी का ठरत आहे ? याबाबत राजकारण्यांनीच आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी केले आहे.उठसुठ पत्रकारांना आत्मचिंतनाचे डोस पाजणार्या राजकारण्यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या व्दैवार्षिक अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी पत्रकारांच्या व्यथा विस्ताराने मांडल्या.ते म्हणाले,आज पत्रकारितेतील प्रत्येक घटक अस्वस्थ आहेत .सुप्रिम कोर्टाने आदेश देऊनही मजिठिया आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होत ऩसल्याने श्रमिक पत्रकार अस्वस्थ आहेत,भांडवलदारी पत्रांकडून मोठया प्रमाणात पत्रकार कपात सुरू असल्याने हजारो पत्रकार आणि कर्मचारी रस्त्यावर येत आहेत तर छोटया आणि मध्यम वर्तमानपत्रांच्या जाहिरातीचे दर गेल्या पंधरा वर्षापासून वाढून दिले गेले नाहीत आणि सरकारने जाहिरात बिलाची कोटयवधींची रक्कम आदा केलेली नसल्याने छोटया पत्रांचे मालक त्रस्त आहे,वाहिन्यांतील ना वेतन आयोगाचं संरक्षण आहे ना नोकरीची गॅरंटी या सर्व प्रश्नाकडं कोणी लक्ष देत नाही आणि पत्रकारांच्या व्यासपीठावर येऊन पत्रकारांनाच आत्मचिंतनाचे डोस देताना राजकारण्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. हे राजकारण्यांनी थांबवून आपण लोकशाहीतील या महत्वाच्या घटकाला न्याय का देऊ शकत नाही ? याचे चिंतन केले पाहिजे असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.साधनं वाढली तरी पत्रकारांची साधना संपली म्हणणार्या राजकारण्यांनी राजकारणाचा स्तर रसातळाला का गेला? यावरही जर भाष्य करावे असे आवाहन देशमुख यांनी के ले पत्रकारांची अवस्था आज बेठबिगारांसारखी झाली असून या घटकाला ना मालकांचे संरक्षण आहे, ना सरकारचे अशा स्थितीत पत्रकारांनी भक्कम एकजूट कऱणे आवश्यक असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.सरकारला पत्रकारांचा कोणताच प्रश्न सोडवायचा नाही असे स्पष्ट करून देशमुख म्हणाले,सरकारच्या भुलथापांना बळी न पडता आता पत्रकारांनीच संघटीतपणे भेडसावणार्या प्रश्नांना सामोरे गेले पाहिजे.पत्रकारांचे आरोग्याचे प्रश्नही पत्रकारांनी एकत्रीत येत मार्गी लावणे आता गरजेचे झाले असून त्यासाठी मराठी पत्रकार परिषद पुढील काळात ठोस भूमिका घेत प्रयत्न कऱणार असल्याचे त्यानी सांगितले.कधी संघटनेच्या नावाने,कधी वृत्तपत्रांच्या नावाने,कधी शहरी-ग्रामीण असा भेद करत तर कधी हा प्रिन्टचा तो इलेक्टॉनिकचा ,हा साप्ताहिकाचा हा दैनिकाचा असा भेद करत पत्रकारांमध्ये फूट पाडण्याचा सातत्यानं प्रयत्न झाला आहे.या फाटाफुटीने पत्रकारांची आतापर्यंत प्रचंड होरपळ झाली असून पत्रकारांनी आता तरी डोळे उघडत आपसातील हे वाद बाजूला करून आम्हीही एकत्र येऊ शकतो हे राजकारण्यांना दाखवून देण्याची वेळ आता आली असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.
प्रारंभी माजी मंत्री राजेंद्र मुळीक पूर्वी साधनं अपुरी असली तरी पत्रकारांची साधना होती मात्र आज साधनं वाढली असली तरी साधना कमी पडते असं मत मांडलं.तर आ.मल्लीकार्जुन रेड्डी यांनी पत्रकारांनी सत्य बातमी वाचकांसमोर मांडावी असे आवाहन केले.यावेळी माहिती संचालका राधाकृष्ण मुळी ,परिषदेचे विभागीय सचिव हेमंत
डोर्लिकर,नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनी आपली मतं मांडली.कार्यक्रमास जिल्हयातून साडेतीनशे पत्रकार उपस्थित होते.