इचलकरंजी दौर्‍याची फलश्रुती

0
1343

इचलकरंजी दौर्‍याची फलश्रुती 

त्रकार दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं परवा इचलकरंजीत होतो.मँचेस्टर अशी ओळख असलेल्या या गावात पहिल्यांदाच जात होतो.पत्रकार दिनाचं निमित्त असलं तरी तेथील भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात त्यांच्याशी चर्चाही करायची होती.त्यांच्याशी चर्चा करण्याचे कारण असं की,भाजप विरोधी पक्ष असताना पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा करावा अशी मागणी करणारं खासगी विधेयक त्यांनी सर्वप्रथम सभागृहात मांडलं होतं.तेव्हा सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे अशा दोन्हीकडचा कायद्याला विरोध असल्यानं त्यांनी दोन तीन वेळा प्रयत्न करूनही विधेयक चर्चेला आलं नाही,आलं नाही म्हणण्यापेक्षा ते येऊ दिलं गेलं नाही.सुरेश हाळवणकरांनाही काहींनी ‘पत्रकारांना नव्हे तर पत्रकारांपासून लोकप्रतिनिधींना संरक्षणाची गरज आहे’ असं सांगत तुम्ही विधेयक मांडू नका असा आग्रह धरला होता.या सर्व विरोधाला न जुमानता हाळवणकर यांनी ते विधेयक मांडले होते.त्यावर चर्चा होऊ न देण्यात तेव्हाचे सर्वपक्षीय आमदार यशस्वी झाले असले तरी या विषयाला अधिकृतपणे पहिल्यांदाच सभागृहात तोंड फुटले होते,या विषयाचं गांभीर्य आणि गरजही लोकांच्या समोर पहिल्यांदाच आली होती.नंतरच्या काळात अनेकांनी विविध वैधानिक हत्यारं वापरून हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला ,नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशात कॉग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी हा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित करून मुख्यमंत्र्यांनीच या लक्षवेधीला उत्तर द्यावे असा आग्रह धरला आणि सुदैवानं त्यांना त्यात यश आलं.संजय दत्त यांच्या लक्षवेधीवर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी पत्रकार संरक्षण कायदा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्याचे वचन दिलं आहे.अगोदर सुरेश हाळवणकर आणि नंतर संजय दत्त यांनी या विषयाचा पाठपुरावा केल्यानं हा प्रश्‍न आता मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.हा कायदा झाला तर त्याचं श्रेय सुरेश हाळवणकर आणि संजय दत्त या दोन्ही आमदार मित्रांना द्यावं लागेल यात शंकाच नाही. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या दोन्ही आमदारांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहे.त्याच प्रमाणे नंतरच्या काळात राज्यातील 165 आमदारांनी कायद्याला पाठिब्यांची पत्रं आम्हाला दिली आहेत त्याबद्दल त्यांचेही आभार.हाळवणकर यांनी इचलकरंजीतील पत्रकारांना गृहनिर्माणसाठी जागा देण्याचं आश्‍वासनही दिलं आहे.त्याचंही स्वागत केलं पाहिजे.

अर्थात मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिलं म्हणजे अडथळ्यांची शर्यत संपली एवढा हा सोपा मामला नाही.अजूनही काही शक्ती आणि पत्रकारितेतील आमचे काही मित्र स्पीडब्रेकरची भूमिका बजावत आहेत हे नक्की.त्यामुळं प्रयत्न बंद होऊ देता कामा नयेत हे आम्हाला ठाऊक आहे.इचलकरंजीला जाण्यामागं तो देखील एक उद्देश होताच.सुरेश हाळवणकर यांचे आभार व्यक्त कऱण्याबरोबरच त्यांची पुढेही मदत घेता येईल काय असा प्रयत्न होता.त्यात नक्कीच आम्हाला यश आलं आहे.कारण सुरेश हाळवणकर यांनी आपल्या भाषणात पत्रक ार संरक्षण कायदा आणि पत्रकार पेन्शनचा मुद्दा आपण येत्या अधिवेशनात पुन्हा उपस्थित करण्याचे आश्‍वासन दिलं आहे.पत्रकाराला स्वाभिमानानं जगता यावं यासाठी राज्यात योग्य ते वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारकडं आपण आग्रह धरणार आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.पत्रकारांच्या इतरही प्रश्‍नांबद्दल हाळवणकर बरेच सकारात्मक दिसले.हाळवणकर आता सत्ताधारी पक्षात आहेत.त्यामुळं त्यांची भूमिका नाही म्हटलं तरी आमच्यासाठी महत्वाची ठरणारी आहे.सोळा राज्यात पत्रकारांना पेन्शन दिली जाते आणि महाराष्ट्रात पत्रकार पेन्शन सुरू केली तर सरकारी तिजोरीवर पाच कोटी रूपयांचाही अतिरिक्त बोजा पडणार नाही असं त्याना सांगित्लायवर मी लगेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडं याबाबतची तरतूद बजेटमध्ये करण्याची विनंती करतो असंही सांगितल्यानं निश्‍चितपणे आम्हा सर्वानांच आनंद झाला.त्यामुळं त्या अर्थानं माझा इचलकरंजी दौरा सफलसंपूर्ण झाला असंच म्हणावं लागेल.आमचे पुणे विभागीय सचिव शरद पाबळे, कोल्हापूर विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य शिवराज काटकर माझ्या समवेत होते. इचलकरंजी जसं टेक्स्टाईल हब आहे त्याचबरोबर ही सास्कृतिकदृष्टयाही समृध्द नगरी आहे.इचलकरंजी हा तालुका नाही.इचलकरंजीला हातकणंगले तालुका आहे.तरीही एक छान ,समृध्द असं हे शहर आहे हे नक्की.

लायन्स क्लबला भेट देण्याचा योग आला त्यांनी विविध उपक्रम राबवून एक चांगला आदर्श अन्य क्लब समोर निर्माण केलेला आहे.तेथील पत्रकारांची टीमही सामाजिक बांधिलकी जपत काम करणारी दिसली.तिथंही प्रेस क्लब आणि श्रमिक पत्रकार अशा दोन संघटना असल्यातरी दोन्हीतील एकोपा नक्कीच अनुकरणीय आहे.प्रेस क्लबच्या कार्यक्रमाला शहरातील सर्व पत्रकार उपस्थित होते ही गोष्ट नक्कीच कौतूकास्पद आहे.त्यांच्याशी चर्चा करताना त्यांनी ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्‍नांकडं शहरी पत्रकार उपेक्षेनं बघतात अशी तक्रार त्यांनी केली.ती रास्तही आहे.शहरातील एखादया पत्रकारावर झालेला हल्ला हा मिडियावरचा हल्ला असतो त्याच्या बातम्या ठळक दिल्या जातात आणि ग्रामीण पत्रकाराचं डोकं जेव्हा फुटतं तेव्हा तो वैयक्तिक मामला असतो हा भेद दूर व्हायला हवा असा आग्रह त्यांनी माझ्याकडं धरला.आम्ही अर्ध्यारात्रीही तुमच्याबरोबर आहोत हा विश्‍वास मी त्यांना दिला.दयानंद लिपारे यांच्या नेतृत्वाखाली प्रेस क्लबची चांगली टीम इचलकरंजीत कार्यरत आहे.अमर शिंदे,शरद सुखटणकर,संजय खूळ,उमेश घोरपडे,आराधना श्रीवास्तव,संजय कुडाळकर,सुनील मनोळे,अजय काकडे,अरूण काशिद,मयुर शिंदे,पद्माकर खुरपे,सागर बाणदार ही सारी तरूण पत्रकार मंडळी अत्यंत सकारात्मक पध्दतीनं पत्रकारिता करून जनमानसात माध्यमांबद्दल विश्‍वास निर्माण करण्याचं काम करीत आहेत.ही सारी मंडळी चळवळीबरोबर आहे त्यामुळं नक्कीच आमचं बळ वाढलेलं आहे.दयानंदजी तुम्हाला आणि तुमच्या टिमला मनापासून धन्यवाद. (एस .एम )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here