वर्तमानपत्रातील बंधुता कमजोर झालीय ?

0
1038

आपली मराठी पत्रकारितेची परंपरा 181वर्षांची आहे. ती अतिशय समृद्ध आणि परिपक्व आहे. तरिही या वर्तमानपत्रांमध्ये असलेली स्पर्धा कधीकधी परस्परांविषयीच्या बंधुतेला छेद देते की काय असा प्रश्न पडतो.

अलिकडची तीन उदाहरणं देतो.

1.म.टा.तील पत्रकार, नाटककार आणि कथालेखक श्री.जयंत पवार यांना साहित्यातला सर्वात मोलाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार दोन वर्षांपुर्वी त्यांच्या “फिनिक्सच्या राखेतून उठला मोर” या कथासंग्रहाला मिळाला.

2. सकाळच्या मुंबई आवृत्तीचे संपादक आणि सध्या साम वाहिनीचे संपादक, वक्ते, लेखक श्री संजय आवटे यांची भूतानच्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

3. परवा लोकसत्ताचे बातमीदार, कथाकार श्री.आसाराम लोमटे यांच्या आलोक या दर्जेदार कथासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला.

हे तिन्ही नामवंत पत्रकार माझे स्नेही असल्याने त्यांच्या गौरवाचा मला विशेष आनंद झाला.

माझ्या असे लक्षात आले की या तिघांना मिळालेल्या सन्मानांना एरवी साहित्यविषयक घडामोडी म्हणून उत्तम बातमीमुल्य असूनही सर्व मराठी वर्तमानपत्रांनी त्याला पुरेशी जागा दिली नाही. त्या दिवशी योगायोगाने इतर बातम्या जास्त असल्याने या बातमीला जागाच कमी पडली की स्पर्धक वर्तमानपत्रातील व्यक्तीचा सन्मान झाला म्हणून मुद्दाम या बातमीकडे दुर्लक्ष करण्यात आले? की योग्य ती जागा सर्वांनीच दिली पण ती माझ्या नजरेतून सुटली?

कोणी म्हणेल असे घडतच असते, त्याचे एव्हढे काय? अनेक बातम्या सुटून जातात. मुद्दाम कोणी असे करीत नाही. शक्य आहे. माझे निरिक्षण कदाचित चुकीचेही असू शकेल.

मात्र मला साहित्य, पत्रकारिता, वाचन अशा क्षेत्रात विशेष रस असल्याने असे वाटले/वाटते की सन्मान झालेली व्यक्ती जर पत्रकारितेऎवजी इतर क्षेत्रात असती तर सर्वच वर्तमानपत्रांनी या बातमीला महत्वाचे स्थान दिले असते.

तुम्हाला काय वाटते? मराठी वर्तमानपत्रातील आपसातील बंधुता कमजोर झालीये का? की पुर्वीपासूनची परंपरा अशीच आहे? की बंधुता घट्टच आहे, फक्त माझ्याच समजुतीत/आकलनात काही दोष निर्माण झालाय?

हरी नरके 

(Visited 121 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here