सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेमुळे
बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचा विषय मार्गी लागला
मुंबई दिनांक 20 ( प्रतिनिधी) सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा अथक पाठपुरावा आणि मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या प्रयत्नामुळे आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदुर्ग नगरी -ओरोस येथे भव्य स्मारक आणि पत्रकार भवनाच्या बांधकामास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.त्या अर्थाची घोषणा माहिती ,गृह ,वित्त,नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषदेची फार दिवसाची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाल्याने जिल्हा संघाचे अध्यक्ष गजानन नाईक आणि परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी एका पत्राव्दारे सरकार आणि दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.परिषदेच्या प्रयत्नानं गेल्यादीड वर्षात पत्रकारांचे 15 विषय मार्गी लागले आहेत,त्यापैकी बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकाचा एक विषय आहे.
जिल्हा संघ आणि परिषदच्या मागणीनुसार वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री श्री. केसरकर यांनी विधानपरिषदेत 18 मार्च, 2016 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे पत्रकार भवन उभारण्याकरीता आवश्यक आर्थिक सहाय्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिले जाईल’,अशी घोषणा केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्री श्री. केसरकर हे स्मारकाच्या बांधकामास मंजूरीसाठी सातत्याने पाठपुरावा करीत होते.
राज्य शासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे सिंधुदूर्गनगरी-ओरोस येथे यथोचित स्मारक व पत्रकार भवनाच्या बांधकामासाठी 4 कोटी 55 लाख रुपयांच्या आराखड्यास व अंदाजपत्रकास ग्रामविकास व जलसंधारण विभागाने मान्यता दिली असून त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आल्याची माहितीही पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दिली आहे.स्मारकाच्या बांधकामाचे भूमीपूजन 6 जानेवारी 2017 रोजी होण्याची शक्यता आहे.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारक व पत्रकार भवनास मान्यता दिल्याबाबत पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे,खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचेसह पत्रकार संघाचे प्रतिनिधी व पत्रकारांचे विशेष आभार मानले.