भला माणूस,कृतीशील पत्रकार

0
1117

भला माणूस
सामाजिक बांधिलकी जपत,लोकांच्या प्रश्‍नांसाठी लेखणीचा वापर करणार्‍यां कृतीशील पत्रकारांची मराठवाडयाला मोठी परंपरा आहे.आ.कृ.वाघमारे,अनंत भालेराव,सुधाकर डोईफोडे या आणि अशाच अनेक पत्रकारांनी सामाजिक प्रश्‍नांसाठी चळवळी उभ्या करीत लोकांना न्याय मिळवून देण्याचे मोठे काम केले आहे.वाघमारे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाडा सुरू केला.त्यातून निजामाच्या विरोधात आवाज उठवत समाजाला जागृत करण्याचे काम केले.ते स्वतःही मराठवाडा मुक्ती आंदोलनात सहभागी झाले होते.आ.कृ.वाघमारे यांच्या नंतर अनंतरावांनी मराठवाड्याचे नेतृत्व करीत आपल्या धारदार लेखणीचा वापर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठीच केला.ही परंपरा नंतरच्या काळातही खडित झाली नाही.वाघमारे किंवा अनंतरावांच्या पत्रकारितेचा वसा घेत चळवळीतून अनेक पत्रकार पुढे आले आणि त्यांनी चळवळीचे नेतृत्व करीत ,लेखणीचे फटकारेही लगावले.यातील काही पत्रकारांनी नंतरच्या काळात मराठवाडयाच्या बाहेर पडून मराठवाडी पत्रकारितेची पताका फडकवत ठेवली तर काहींनी आपल्या गावीच राहून सामाजिक जबाबदारी पार पाडली.अशा पत्रकारांमध्ये मावळत्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून अकुशराव देशमुख तथा आप्पाचा आवर्जुन उल्लेख करता येईल.शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आप्पाना पत्रकारितेची तशी कोणतीही पार्श्‍वभूमी नाही.तरीही त्यांनी जवळपास पन्नास वर्षे जालन्यात पत्रकारिता करीत स्वातःच्या नावाचा दबदबा निर्माण करून तरूण पत्रकारांसमोर आपल्या कार्यातून आदर्श निर्माण केलेला आहे.विविध विभागीय आणि प्रादेशिक पत्रांचे प्रतिनिधीत्व करून मराठवाडयातील प्रश्‍न आप्पांनी तळमळीने जगाच्या वेशिवर टांगले आहेत.मराठवाडा विकास आंदोलन असो,जालना जिल्हा निर्मितीचा विषय असो,जालन्यात सातत्यानं पडणार्‍या दुष्काळामुळे होणारी जनतेची होरपळ असो हे सारे विषय आप्पांनी पोटतिडकीने मांडले.त्यासाठी ज्या चळवळी उभ्या राहिल्या त्यातही आप्पांनी मार्गदर्शक आणि कार्यकर्ता या दोन्ही भूमिका समर्थपणे पार पाडलेल्या आहेत.जालना जिल्हाच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचा इतिहास,समाजकारण,राजकारण,अर्थकारणाची इत्यंभूत माहिती असलेल्या आप्पांनी तळमळीतून हे सारे विषय मांडले आहेत.आप्पांचा स्वभाव रोखठोक.जे मनाला पटेल ते स्पष्टपणे मांडण्याची धमक आप्पांमध्ये आहे.सत्याचा कैवारी असलेल्या आप्पांनी नेहमीच लेखणीचे पावित्र्यही जपले आणि एक विधायक पत्रकारिता केली आहे.अशा वेगळ्या अर्थानं बंडखोर पत्रकारांचे फारशे मित्र असत नाहीत,मात्र आप्पा त्याला अपवाद ठरले आहेत.अनेकांच्या विरोधात लेखन केल्यानंतरही त्यांचा कोणी शत्रू बनलेला नाही किंवा त्यानं कधी आप्पांना धमक्या किंवा त्यांच्यावर हल्लेही केलेले नाहीत.याचं कारण आप्पाचा प्रामाणिकपणा हेच आहे.आप्पा जे लिहितात ते सत्य आणि सत्यच असते आणि त्यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ नसतो हे सर्वानाच माहिती असल्याने आप्पांकडे बोट दाखविण्याची हिंमत कोणी करीत नाही.तशी हिंमत कोणी केली असती तरी त्याला आप्पांनी भिक घातली नसती.कारण चारित्र्य शुध्द असल्याने तेवढा बेडरपणा त्यांच्यात आहे.शिवाय देशमुख असल्याची रगही त्यांच्या वागण्या-बोलण्यात जाणवतेच जाणवते.आयुष्याची पंच्याहत्तरी साजरी होत असताना त्यांनी लेखणीशी बेईमानी कधी केली नाही म्हणूनच आप्पा आज जालन्यात राजकारणी असोत किंवा नव्या पिढीतले पत्रकार असोत सर्वांना आदरणीय वाटतात.आप्पांना जगाच्या उठाठेवी जमल्या असल्या तरी त्यांना व्यवहार मात्र कधी जमला नाही.त्यामुळे त्यांनी भला माणूस नावाचे साप्ताहिक सुरू केले खरे पण त्याचं आर्थिक गणित जुळवता न आल्याने भला माणूस कालौघात मागे राहिला.अंकासाठी जाहिराती मिळविण्यासाठी जे गुण विशेष पत्रकारांच्या ठायी असावे लागतात ते आप्पांकडे नसल्याने स्वतःचा पेपर चालविण्याचे आप्पांचे स्वप्न फार दिवस टिकले नाही.जालन्यात त्यांच्या नंतर आलेल्या तरूणांनी आपली वर्तमानपत्रे सुरू केली आणि ती यशस्वी करूनही दाखविली.आप्पांना तसे जमले नाही मात्र याची खंतही त्यांना कधी वाटली नाही.तो आपला स्वभाव नाही हे ते प्रामाणिकपणे मान्य करतात.अलिकडे पॅकेज पत्रकारिताही फोफावलेली दिसते.हा विषय तर आप्पांसारख्या निष्ठेने पत्रकारिता करणार्‍या अनेकांसाठी आकलन शक्तीच्या बाहेरचा आहे.हे ज्ञान अवगत नसल्याने आर्थिक आघाडीवर आप्पा नेहमीच मागे पडलेले दिसतात.लेखणीला शेतीची जोड देत त्यांनी आपला संसाराचा गाडा हाकला.आपल्या स्वाभिमानाशी कधी तडजोड केली नाही आणि आपल्या तत्वांना कधी मुरडही घातली नाही.उराशी बाळगलेला जनहिताचा ध्येयवाद त्यांनी आयुष्यभर पाळल्याने ते आज जालन्यात सर्वाचे आप्पा आहेत.नाही तर हल्ली पत्रकारांबद्दल अनेकजण वेगवेगळ्या पध्दतीनं मत प्रदर्शन करताना दिसतात.आप्पा पत्रकारितेतील सर्व मोहांपासून चार हात दूर राहिल्याने 75 वर्षात त्यांनी आपल्या चारित्र्यावर एक शिंतोडाही उडू दिला नाही.शुध्द चारित्र्य आणि कमालीचा लोकसंग्रह ही आप्पांची 75 वर्षातील मोठी कमाई आहे असं मला वाटतं.नव्या पिढीतील तरूण पत्रकारांना आप्पांमध्ये दिसणार्‍या या गुणांचे मोल वाटणारही नाही,काही जण आप्पांची व्यवहारशून्य अशा शब्दात हेटाळणीही करू शकतात.मात्र शुध्द चारित्र्यामुळेच शब्दाला नैतिक अधिष्टान प्राप्त होते हे कोणी विसरू नये.समर्थ लेखणी आणि शुध्द चारित्र्य हेच आप्पाचे भांडवल आहे आणि तेच त्यांच्या पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीतील संचित आहे.
मी मराठवाडयातला असलो आणि देशमुखही असलो तरी आप्पा ना माझे सोयरे आहेत ना भावकी.तरीही आमचे संबंध या नात्यांपेक्षाही घट्ट आहेत.याचं कारण आमची मैत्री कोणत्याही स्वार्थावर आधारलेली नाही तर आम्ही विचारांनी जवळ आलेलो आहोत.स्वष्टोक्तेपणा हा त्यांच्यात दिसणारा गुण थोडाफार माझ्यातही असल्याने काही मूल्ये मी ही जपत असल्याने आमचे सूर जुळलेले आहेत.ही मैत्री निखळ आहे .ना त्यांना माझ्यापासून काही अपेक्षा आहेत ना मला त्यांचयापासून.मात्र पत्रकारितेत असूनही विचारांवर,आचरणावर निष्ठा असलेला एक भला माणूस आणि हाडाचा पत्रकार म्हणून मला नेहमीच आप्पांबद्दल आदर वाटत आलेला आहे.मी शिखर संस्थेवर असलो तरी पत्रकारांच्या राजकारणात मी आप्पांना कोणतीही मदत केली नाही म्हणून आप्पा माझ्यावर काही प्रसंगी रूष्ठही असतात.मात्र त्यातील अडचणी,मर्यांदांची जाणीव त्यांनाही असल्याने ते बोलले तरी त्यांची नाराजी फार काळ असत नाही.जालन्यातील सक्रीय आणि आप्पांसारख्या सत्शील पत्रकारांचा मोठा वर्ग मराठी पत्रकार परिषदेपासून दूर आहे याची खंत नक्कीच मला आहे.पत्रकारांचे प्रश्‍न मग तो पेन्शनचा विषय असेल ,पत्रकारांवरील हल्ल्याचा विषय असेल ,किंवा पत्रकारांच्या आरोग्याचे विषय असतील हे सारे सोडवून घ्यायचे असतील तर सर्व पत्रकारांनी मराठी पत्रकार परिषदेच्या झेंडयाखाली एकत्र आले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.अनेक पत्रकार त्यासाठी इच्छूकही आहेत मात्र जिल्हा संघ कायम आपल्याच ताब्यात राहायला हवेत या भूमिकेमुळे अशा सक्रीय पत्रकारांना दूर ठेवण्याची निती अनेक ठिकाणी अवलंबिली जाताना दिसते आहे.आप्पा हे पत्रकार नाहीत का,ते खंडणीखोर पत्रकार आहेत का मग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्यही ते होऊ शकत नसतील तर मग परिषदेच्या चळवळीला आपोआपच मर्यादा येऊ शकतात.पत्रकारांचे प्रश्‍न डोळ्याआड कऱण्याची वृत्ती जी आज सत्ताधार्‍यात दिसते आहे त्याचं कारणही पत्रकारांमधील आत्मकेंद्री राजकारण हेच आहे असं मला वाटतं.अर्थात आप्पा भलेही परिषदेबरोबर नसतील पण परिषदेच्या सर्व लढ्यात त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांचा सक्रीय सहभाग असतोच असतो.कारण परिषद जे विषय घेऊन पुढे जात आहे ते राज्यातील पत्रकारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्‍न आहेत हे आप्पांना आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना माहिती आहे.आप्पा जिद्दी आहेत,काहिशे हट्टी आहेत असले तरी ते प्रेमळ आहेत,पत्रकारितेवर कमालीचे प्रेम असलेले सच्चे पत्रकार आहेत.म्हणूनच जालन्यात कुणा पत्रकारांवर हल्ला झाला,कुणाला काही मदतीची गरज लागली की आप्पा त्याच्यासाठी धावून जातात आणि मग मलाही हक्कानं त्याचं हे काम झालं पाहिजे असं बजावत राहतात.एक उमदया मनाचा,निर्मळ मनाचा,जिंदादिल आणि भला माणूस म्हणून आप्पाबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे.आप्पासारेखी माणसं पत्रकारितेतून एक तर हद्दपार होत आहेत किंवा कमी होत आहेत.तरीही आप्पासाऱख्यांकडं पाहिल्या नंतर सारं संपलंलं नाही अशी असा दिलासा मिळत राहतो.
आप्पा या वयातही काटक आहेत,त्याचं रहस्य हे ते या वयातही धडपडत असतात,सारखे धावत असतात.आप्पा सांगतात मला डायबेटीस नाही,बीपी नाही.त्याअर्थानं आप्पा श्रीमंत आहेत असं मी मानतो.आप्पाचं हे वैभव आयुष्यभर त्यांची साथ देत राहो,आप्पांना सुखाचं समाधानाचं दीर्घायुष्य लाभो एवढीच त्यांचा एक स्नेही म्हणून माझी इश्‍वराकडं प्रार्थना आहे. एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here