पत्रकाराचं मरण झालंय स्वस्त …
दर चार दिवसाला जगात एक पत्रकार मारला जातोय
तुम्ही मान्य करा नाही तर नका करू,पण वास्तव असं आहे की,पत्रकारांचं मरण कमालीचं स्वस्त झालं आहे.दर चार-साडेचार दिवसाला जगात कुठे ना कुठे एका पत्रकाराची हत्त्या झालेली असते.आजच्या घडीला सर्वात धोकादायक क्षेत्र म्हणून पत्रकारितेकडं पाहिलं जातंय.ही आकडेवारी युनोस्कोनं जाहीर केली असल्यानं त्याबाबत शंका घेण्याचं कारण नाही.
युनोस्कानं म्हटलं आहे की,आपलं कर्तव्य पार पाडताना म्हणजे ऑन डयुटी असताना गेल्या दहा वर्षात 827 पत्रकारांना यमसदनाला पाठविलं गेलं आहे.पत्रकारांच्या हत्त्या करण्यात सिरिया,इराक,यमन,लिबिया आघाडीवर असले तरी लॅटीन अमेरिकेतील पत्रकारही सुरक्षित नसल्याचं युनोस्कोच्या अहवालात नमुद केलं गेलं आहे.गेली दोन वर्षे जागतिक स्तरावर पत्रकारांसाठी जीवघेणे ठरले.गेल्या दहा वर्षात जेवढ्या हत्त्या झालेल्या आहेत त्यातील 59 टक्के हत्त्या गेल्या दोन वर्षात झालेल्या आहेत.गेल्या दोन वर्षात ज्या 213 पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या आहेत त्यातील 78 पत्रकारांच्या हत्त्या अरब देशात झालेल्या आहेत.अर्थात अन्यत्र सारं अलबेल आहे असं समजण्याचं कारण नाही.पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेतही पत्रकारांच्या हत्त्येच्या घटना वाढत आहेत.या भागात 2014 मध्ये एकाही पत्रकाराची हत्त्या झालेली नव्हती मात्र 2015 मध्ये 11 पत्रकारांच्या तिकडं हत्त्या झाल्यात.स्थानिक पत्रकारच मारेकर्यांचे शिकार ठरत असले तरी हल्ली परदेशी पत्रकारही हल्लेखोरांपासून सुटतेले नाहीत.2013मध्ये चार परदेशी पत्रकारांच्या हत्त्या झालेल्या होत्या 2015 मध्ये हा आकडा 17 पर्यंत वाढला आहे.केवळ प्रिन्ट किंवा इलेक्टॉनिक माध्यमांचे पत्रकारच मारेकर्यांचे शिकार होतात असं नाही तर ऑनलाईन जर्नालिझम करणारे पत्रकार किंवा ब्लॉगरही मारेकर्यांच्या हिटलिस्टवर असतात.2014 मध्ये ऑनलाईन पत्रकारिता करणारे दोन पत्रकार मारले गेले होते.2015 मध्ये हा आकडा 21 वर पोहोचलेला होता.यातील सिरियन ब्लॉगरची संख्या जास्त आहे.ज्या पत्रकारांच्या हत्त्या झाल्यात त्यात टीव्ही पत्रकारांची संख्या अधिक आहे.पत्रकारांच्या हत्त्यांची आकडेवारी पाहता 2014-15 मध्ये प195 पुरूष पत्रकारांची तर 18 महिला पत्रकारांची हत्त्या झाली होती.महिलांच्या तुलनेत मारले गेलेल्या पुरूष पत्रकारांची संख्या दहापट जास्त आहे.पत्रकारांचे अपहरण ,पत्रकारांवर विविध खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज बंद करणे,छळ कऱणे,देशाबाहेर हाकलणे,बेकायदेशीररित्या तुरूंगात डांबणे,अशा घटनांची संख्या अगणित आहे.युनोस्कोच्या 39 सदस्यांनी तयार केलेला हा अहवाल आहे.
पत्रकारांची वाढत्या हत्त्यांमुळे पत्रकारांना संरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी जागतिक पातळीवर उचलून धरली जावू लागली आहे.
महाराष्ट्रातही दर चार-साडेचार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होतो.त्याविरोधात आम्ही कायदा मागतो आहोत तर काही ल्युटन्स पत्रकार ( लब्धप्रतिष्ठित पत्रकार ) त्याला विरोध करतात.ज्या पत्रकारांवर हल्ले होतात त्यांच्याकडेच संशयानं पाहण्याची ल्यूटन्स मंडळींची खास पध्दत आहे.त्यामुळे अनेक पत्रकार आयुष्यातून उठले आहेत.युनोस्कोच्या आकडेवारीनुसार जे पत्रकार मारले गेले ते ऑनड्युटी होते.आपल्याकडंही जे हल्ले झालेले आहेत ते डयुटीवर असलेल्या पत्रकारांवरच झालेले आहेत.सर्वाधिक धोक्याचं क्षेत्र असलेल्या माध्यमातील लोकांना आता संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे हे युनोस्कोच्या अहवालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे.
( पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे प्रकाशित )
————————————————————————————————————————————————————————