मराठी पत्रकार परिषदेची 18 ला नांदेडला बैठक

0
791

मराठी पत्रकार परिषदेची 18 ला नांदेडला बैठक 

पत्रकार जोडो अभियान,कानून पे चर्चा,एक दिवस संघटनेसाठी

अशा विविध उपक्रमांवर बैठकीत होणार चर्चा 

महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना असलेल्या मराठी पत्रकार परिषदेची महत्वाची बैठक एस.एम.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली  18 ऑक्टोबर 2016 रोजी नांदेड येथे होत आहे.बैठकीत महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेतले जाणार आहेत.मराठी पत्रकार परिषदेने ऑनलाईन इलेक्शनची तयारी चालविलेली आहे.2017 च्या परिषदेच्या निवडणुका ऑनलाईन घेतल्या जाणार आहेत.प्रायोगिक तत्वावर येत्या 16 तारखेला पुणे जिल्हयातील शिरूर तालुका पत्रकार संघाच्या निवडणुका ऑनलाईन होतील.त्यानंतर हा प्रयोग टप्प्पयाटप्प्यानं राज्यभर राबविला जाणार आहे.अशी प्रकारे ऑनलाईन निवडणुका घेणारी परिषद ही देशातील पत्रकारांची पहिली संघटना ठरणार आहे.या महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन नांदेडच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

 परिषदेचा वर्धापन दिन 3 डिसेंबर रोजी आहे.वर्धापन दिनाच्या निमित्तानं परिषदेच्यावतीने राज्यभर पत्रकार आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जाते.यंदा ही मोहिम व्यापक प्रमाणात राबविण्याची परिषदेची योजना आहे.तसेच याच दिवशी परिषदेचा पुरस्कार वितरण सोहळा नागपूर येथे घेण्याची योजना असून त्यावर अंतिम निर्णय नांदेडला होईल.तसेच पुरस्कारांची घोषणाही तेथे होईल.

राज्यातील पत्रकारांचे प्रश्‍न सोडवायचे असतील तर सर्व पत्रकारांनी संघटनात्मक वाद विसरून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या व्यासपीठावर एकत्र यावं अशी परिषदेची भूमिका आहे.त्यासाठी हल्ला विरोधी कृती समितीने पत्रकार जोडो अभियान राबविण्याचा संकल्प सोडला असून परिषदही या अभियानात सर्व शक्तीसह उतरणार आहे.त्यावरही चर्चा होईल.पत्रकारांचं आयुष्य धावपळीचं असतं.हे जरी खरं असलं तरी एक दिवस संघटनेसाठी हा उपक्रम परिषद राबविणार असून महिन्यातून एक दिवस प्रत्येक सदस्यांनं संघटनेसाठी दिला पाहिजे या विचारांचा प्रसार आणि प्रचारावर चर्चा होणार आहे.

सांगलीत पत्रकार मेळावा प्रचंड यशस्वी झाला. यावेळी उपस्थित अनेक पत्रकारांनी कायद्याची लढाई कशी लढली जात आहे? ,सरकारने जी मसुदा तयार केला आहे त्याबद्दल आणि अन्य ़अनेक प्रश्‍न विचारले.त्यामुळे हा विषय जास्तीत जास्त पत्रकारांना समजावा ,यातील राजकीय पक्षांची भूमिकाही पत्रकारांच्या लक्षात यावी यासाठी नजिकच्या काळात कानून पे चर्चा असे कार्यक्रम राज्यभर घेण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे.यावरही बैठकीत चर्चा होईल आणि ही योजना राज्यभर राबविणयाबाबत निर्णय घेतला जाईल. स्वतः एस.एम.देशमुख काही जिल्हयात जाऊन कानून पे चर्चा हा कार्यक्रम करतील..परिषदेच्या तालुका अध्यक्षांचाही एक मेळावा घेण्याचे नियोजन आहे.त्याबाबतचा अंतिम निर्णय नांदेड बैठकीत होईल.

अधिस्वीकृती समितीने 20 वर्षे अनुभव आणि 50 वर्षे वय या श्रेणीत ज्येष्ठ पत्रकार म्हणून अधिस्वीकृती देताना ग्रामीण भागातील पत्रकारांवर अन्याय करणारी भूमिका घेतलेली आहे.या श्रेणीत मुक्त पत्रकार तसेच पन्नाशीनंतर सेवेत नसलेल्या पण पत्रकारितेत सक्रीय असलेल्या पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणार नाही अशी व्यवस्था केली गेली आहे.फक्त या योजनेचा जे श्रमिक पत्रकार संपादकांच्या मर्जितले आहेत त्यानाचा लाभ होणार आहे.याबद्दल राज्यभर मोठी संतापाची भावना असून त्यावरही चर्चा होऊन परिषदेने नेमकी काय भूमिका घ्यायची यावर निर्णय होणार आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची ही बैठक असेल.बैठकीस 36 जिल्हयातील परिषद प्रतिनिधी,36 जिल्हयांचे अध्यक्ष,9 विभागीय सचिव,पदाधिकारी तसेच अधिस्वीकृती समितीवरील परिषदेचेे सदस्य बैठकीस उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी बैठक व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.संपर्कासाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्याशी पुढील क्रमांकावर संपर्क साधता येईल.9823010111-

 ( मराठी पत्रकार परिषद न्यूज बुलेटिन )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here