सोमवारी गणरायांचे आगमन होत असल्याने मुंबई-पुणे आणि अन्य शहरातून जवळपास पाच लाख चाकरमाने गणपतीसाठी आपल्या गावी कोकणात रवाना झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस.टी महामंडळाने दोन हजारपेक्षा जास्त गाडयांची व्यवस्था केली आहे.कोकण रेल्वे मार्गावरून रेल्वेन किमान पन्नास जादा फेर्या केल्या आहेत.शुक्रवारपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरून 25 ते 30 हजार गाडया रायगडसह रत्नागिरी आणि सिंधुदुर्गकडे रवाना झाल्या आहेत.आज आणि उद्या महामार्गावरून प्रवास करणार्या गाडयांची संख्या कित्येक पटीने वाढणार आहे.एकाच वेळी हजारो वाहनं रस्त्यावरून जात असताना वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रायगड पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे.महामार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत,ओव्हरटेकिंग करू नये म्हणून पेण ते वडखळ दरम्यान डिव्हायडर लावण्यात आले आहेत,ठिकठिकाणी मदत केंद्रं,वाहतूक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहेत.एखादे वाहन बंद पडून वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून क्रेन्स तयार ठेवण्यात आल्या आहेत.आरोग्य पथकेही तैनात केली गेली आहेत.वाहतूक कोंडीच्या जागा निश्चित करून तेथे वाहतूक पोलिसांची व्यवस्था केल्याने खड्ड्यानी युक्त या महामार्गावरील वाहतूक बर्याच प्रमाणात सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे.