मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी कोण लढत होतं,कोणावर गुन्हे दाखल होत होते आणि कोण गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेर्या मारत होतं हे अख्या दुनियेला माहितंय.त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांनी परवा आयबीएन-लोकमतवर आमच्यामुळच महामार्गाचं चौपदरीकरण होतंय अशी दर्पोक्ती करीत पत्रकार या कामाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत अशी टीका केली तेव्हा तेव्हा उभ्या महाराष्ट्राला हसू फुटलं.राजकीय नेते थापा मारतात,न केलेल्या कामाचं श्रेय घेतात हे जगजाहीर आहे परंतू ज्या गोष्टींशी आपला दुरान्वयानेही संबध नाही त्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा जो प्रयत्न भास्कर जाधव यांनी परवा चॅनलवर केला त्याला तोड नाही.
वास्तव असं आहे की,कोकणातल्या रस्त्यावर माणसांच्या रक्तांचा रोज पडणारा सडा पाहून आणि राजकारणी काहीच बोलत नाहीत हे बघून कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकार एकत्र आले . त्यानी तब्बल पाच वर्षे शांततेच्या मार्गाने आंदोलनं करून या प्रश्नाची उग्रता जगाला दाखवून दिली.पत्रकार लेखणी चालवत होते,पत्रकार रस्त्यावर उतरत होते तेव्हा सारे पक्ष एकजात तोंडाला कुलपं लावून बसले होते .पत्रकारांना पाठिंबा देण्याचं सौजन्य तर यांनी दाखविलंच नाही साधी सहानुभूतीही या आंदोलनाला कोणी दाखविली नाही.उलट चौपदरीकरण होणार नाही कशाला दगडावर डोकं आपटून घेताय असे टोमणे पत्रकाराना ऐकायला मिळायचे.काही नेते मुंबई-गोवा चौपदरीकरण करा म्हटलं की,ते कशाला ? आपण सागरी महामार्गाच करू ना म्हणत विषयांतर करण्याचा प्रयत्न करायचे.आता रस्ता होतोय म्हटल्यावर ही सारी मंडळी श्रेयवादाची लढाई लढत आहे.तिकडे नारायण राणे यांनी असं सांगितलं की,चौपदरीकऱण आमच्यामुळंच होतंय.परवा एक छोटसं आंदोलन केल्यानं शेकापवालेही आमच्या आंदोलनामुळंच महामार्ग चौपदरी होतोय असं सांगू लागले तर कुणाला आश्चर्य वाटू नये. हे सारं आम्हाला अपेक्षितच होतं.त्यामुळे भास्कर जाधव यांना आमचं आव्हान आहे की,ते जे म्हणतात की,आम्ही वैधानिक आयुधांचा वापर करून प्रश्न धसास लावला आणि रस्त्यावर उतरून आंदोलनंही केली.ते त्यांनी सिध्द करून दाखवावं . भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यात परस्पर विरोधाभास ठासून भरलेला आहे.ज्या काळात कोकणात पत्रकार आंदोलन करीत होते तेव्हा राज्यात आणि दिल्लीत सरकार हे कॉग्रेस-राष्ट्रवादीचे होते.सलग पंधरा वर्षे ही मंडळी सत्तेवर होती.सत्ताधारी मंडळींना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरजच का भासावी? ती गरज भासली असेल तर सरकार कोकणातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना मोजत नव्हतं त्यामुळं त्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागत होती असाही मग अर्थ काढता येऊ शकतो. भास्कर जाधव यांना आंदोलन करावंच लागलं असेल तर त्यांनी कुठं आंदोलन केलं त्याचे फोटो,त्या आंदोलनाच्या वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणं द्यावीत ( पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाची सुरूवातीपासून ते शेवटपर्यंतच्या आंदोलनाची,ते कुणा कुणाला भेटले त्याची छायाचित्र,व्हिडीओ सिडीच,बातम्यांची कात्रणं आम्ही भास्कर जाधव यांच्याकडं द्यायला तयार आहोत.) आणि विधानसभेत केव्हा आणि कोणत्या आयुधाचा वापर करून भास्कर जाधव यांनी हा प्रश्न उपस्थित केला त्याचेही पुरावे कोकणातील जनतेला द्यावेत आणि मग न केलेल्या कामाचं श्रेय घेण्याचें प्रयत्न करावेत.(तसे ते करू शकणार नाहीत . कारण त्यांनी रस्त्यासाठी काहीच केलेले नाही) ते घेतानाही अगोदर सुनील तटकरे काय म्हणाले होते तेही तपासून बघावे .कारण रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर पत्रकारांनी पेण येथे विजयी मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्यावेळेस सुनील तटकरे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की,रस्त्याचं चौपदरीकऱण पत्रकारांमुळेच होत आहे.त्यांच्या वक्त्वयाची सीडी,बातम्या,फोटो आमच्याकडं आहेत.शिवाय या कार्यक्रमास प्रफुल्ल मारपकवार, किरण नाईक ,त्यावेळचे विधीमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण प्रकाश सावंत.प्रवीण पुरो हे मुंबईतले पत्रकारही उपस्थित होते. ..बरं भास्कर जाधव म्हणतात ते खरं मानायचं असं ठरलं तरी मग 2011 ला पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मिटरच्या पहिल्या टप्प्याचं काम सुरू झालं .नियोजन असं होतं की,डिसेंबर 2014 पर्यंत हे काम पूर्ण व्हावं आणि जानेवारी 2016 पर्यंत पुढील म्हणजे इंदापूर ते कशेडी हे काम मार्गा लागावं.तसं ते झालं नाही.याला कोण जबाबदार आहे ? काम सुरू करण्याचं श्रेय तुम्ही घेणार असाल तर काम रखडलं त्याची जबाबदारीही भास्कर जाधव यांनाच घ्यावी लागेल.कारण .2014 पर्यंत तर भास्कर जाधव यांच्याच पक्षाचं सरकार राज्यात सत्तेवर होतं.त्यांना या रस्त्याची तळमळ होती तर त्यांनी आग्रह धरून हे काम पूर्ण करायला का लावले नाही . .वेळेत काम न झाल्यामुळे प्रकल्पाचा खर्च तर वाढलाच शिवाय परवाची महाडची दुर्घटना देखील सरकारच्या निष्काळजीपणाचा आणि कोकणाकडे पाहण्याच्या नकारात्मक दृष्टीकोनाचा परिपाक आहे.कोणत्याच राजकारण्यांना खरं बोललेलं आवडत नाही.खरं बोललं ,प्रश्न विचारले,प्रश्न उपस्थित केले की ते अंगावर येतात हे प्रकाश मेहता यानी परवा दाखवून दिलं.त्यामुळं काम कोणामुळं रखडलं ? हे विचारलेलं त्याना जसं आवडणार नाही तसं कोकणातील राजकीय पक्षांनी कोकणच्या विकासासाठी किती आंदोलनं केली ? हा प्रश्न विचारलेलंही एकाही नेत्याला आवडणार नाही.कोकणात जी आंदोलनं किंवा जे राडे झाले ते प्रकल्पाच्या विरोधातले झाले आहेत , विकासासाठी नाही . हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.मुंबईला जोडणारे सारे महामार्ग चौपदरी-सहा पदरी होत होते,पुणेही सर्वबाजुंनी महामार्गाने जोडलं जात होतं मात्र दक्षिण भारताला मुंबईशी जोडणारा मुंबई-गोवा महामार्ग चौपदरी होत नाही याची चिंता कोणालाच नव्हती आणि त्यासाठी कोणी आवाजही काढत नव्हतं.आता राजकीय लाभासाठी श्रेयासाठी साठमारी केली जात आहे हे कोकणचं खरं दुखणं आहे.
महामार्गाचा विषय आता संवेदनशील वळणावर पोहोचलेला असल्यानं नारायण राणे,भास्कर जाधव,विवेक पाटील हे सारेच आमच्यामुळंच म्हणत श्रेय घेण्याचा प्रयत्न करतील किंवा करीत आहेत . अर्थात पत्रकारांचा त्याला विरोध असण्याचं कारण नाही.या मंडळींना राजकारण करायचय,मतं मागायचीत ती मागताना आपण काय काय केलं हे ही मतदारांना सांगायचंय त्यामुळं त्यांची ती अडचण आहे हे आम्ही समजू शकतो. या श्रेयाच्या लढाईत कोकणातील पत्रकार नक्कीच नाहीत.ज्याला कोणाला श्रेय घ्यायचंय ते त्यांनी घ्यावं कारण आम्हाला निवडणुका लढवायच्या नाहीत आणि त्यामुळं आम्ही काय दिवे लावले हे सांगणं पत्रकारांवर बंधनकारकही नाही. भास्कर जाधव यांना श्रेय घ्यायचं असेल तर त्यांनी ते नक्की ध्यावं पण पुढचा रस्ता किती दिवसात पूर्ण होईल ते ही सांगावं,पूर्ण नाही झाला तर तुम्ही काय करणार हे ही सांगावं.कारण कोणाचं कोंबडं आरवल्यानं सूुर्योदय झाला याच्याशी कोकणी माणसाला देणंःघेणं नाही त्यांना सूर्योदय होण्याशी मतलब आहे.तेव्हा किमान या महामार्गासाठी तरी राजकीय मंडळींनी एकत्र यावं आणि तो रस्ता लवकर होईल यासाठी प्रयत्न करावेत.भास्कर जाघव यांनी त्यासाठी पुढाकार घेतला तर हे काम वेगाने मार्गी लागेल असं वाटतंय.कारण ते लढाऊ नेते आहेत आणि वैधानिक आयुधांचा वापर केव्हा आणि कसा करायचं याचं चांगलं ज्ञान त्यांना आहे तेव्हा जाधवसाहेब प्लीज … .
एस.एम.देशमुख