अर्णब गोस्वामी यांनी घेतली आमदाराची शाळा
बातमी कव्हर करताना एखादया रिपोर्टरवर हल्ला झाला किंवा त्याला धमक्या ,शिविगाळ झाली तर संबंधित वृत्तपत्रं किंवा वाहिन्याचे संपादक हात झटकत आपल्या रिपोर्टरला वार्यावर सोडून देतात.हे चित्र नेहमीच दिसते.स्ट्रिंजरच्या बाबतीत तर ‘तो आमचा रिपोर्टरच नव्हता’ असं दाखवत त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला जातो.काही महान संपादक ज्यांने पत्रकारावर हल्ला केलेला असतो त्याच्या घरी जाऊन त्याची माफी मागण्याचे फर्मानही सोडतात.हल्ला झाल्यानंतर अनेक पत्रकारांना आपल्या नोकर्याही गमवाव्या लागतात..या पार्श्वभूमीवर एका आमदाराने आपल्या वार्ताहराशी केलेल्या अरेरावीच्या विरोधात संबंधित महिला पत्रकारांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सर्वच संपादकांसाठी एक वस्तुपाठ घालून दिला आहे.
11 जून रोजी राज्यसभेच्या निवडणुका होत आहेत.कर्नाटक कॉग्रेसच्या नेत्यांनी आपल्या पक्षाच्या 14 आमदारांना मुंबईतील एका पंचतारांकित होॅटेलमध्ये ठेवले होते.ही बातमी टाइम्स नाऊच्या मुंबई ब्युरो चीफ मेघा प्रसाद याना कळल्यानंतर रिपोर्टर मेघा तेथे पोहोचल्या.त्याच वेळेस हॉटेलमधून बाहेर पडणारे आमदार अशोक खेनी कॅमेर्यात शूट झाले.टाइम्स नाऊ प्रतिनिधीने नंतर खेनी यांना गाठले आमदारांच्या खरेदीबाबत त्याना विचारले तेव्हा आमदार महोदयांनी आपली औकात दाखविली.मेघा यांच्याशी तो असभ्य भाषेत बोलले .ही बाब टाइम्स नाऊचे संपादक अर्णब गोस्वामी कळली। त्यानंतर खेनी यांना लाइव्ह कार्यक्रमात घेऊन त्यांना मेघा यांची माफी मागण्यास सांगितले.आमदार आपली चूक मान्य करायला तयार नव्हते तेव्हा संपादकांनी आमदारांची जोरदार शाळा घेतली.आमदाराने माफी मागितली की नाही यापेक्षा संपादकांच्या आपल्यावर विश्वास आहे आणि ते आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत ही जाणीव प्रत्येक रिपोर्टरला नवे बळ देणारी असते.
रिपोर्टरने वेगळ्या बातम्या आणल्या पाहिजेत अशी अपेक्षा सारेच संपादक करीत असतात.पण हे करताना रिपोर्टर जेव्हा अडचणीत येतो तेव्हा बहुतेक संपादक रिपोर्टरला वार्यावर सोडून मोकळे होतात.अशी शेकडो उदाहरणं देता येतील.या पार्श्वभूमीवर अर्णब गोस्वामी यांनी रिपोर्टरच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याची घेतलेली भूमिका नक्कीच कौतुकास्पद आणि संपादकपदाला साजेशी आहे.अर्णब गोस्वामी धन्यवाद.–