सी.डी.देशमुख आणि पांडुरंगशास्त्री आठवले याचं गाव एवढीच काही रोह्याची ओळख नाही.कुंडलिकेच्या कवेत वसलेलं,निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं,सास्कृतिकदृष्टया समृध्द असं शहर ही देखील रोह्याची ओळख आहे.पंडितांचं शहर,विद्वानांची वस्ती असलेलं शहर असंही रोह्याचं वर्णन करता येईल.सर्वार्थानं संपन्न असलेल्या रोह्याकडं गेल्या काही वर्षात मात्र अक्षम्य दुर्लक्ष झालं.धाटावला औद्योगिक वसाहत सुरू झाली.अनेकांना गावात रोजगार मिळाला पण त्यामुळं शहराच्या बाहय रूपात काही बदल झाला नाही.शहरात जागोजोगी बकालपणा दिसत राहिला.याचं कारण शहराबद्दल आस्था असणारं नेतृत्व रोह्याला मिळालंच नाही.आपल्या शहराबद्दल वाटणारी आपुलकी इथंल्या नेतृत्वाला वाटलीच नाही. मोठ मोठ्या इमारती शहरात जरूर उभ्या राहिल्या.पण उभ्या राहिलेल्या इमारती म्हणजे विकास नाही.आज या इमारतींची अवस्थाही रया गेल्यासारखी झालेली आहे.रोहेकरांनी राज्यस्तरीय,राष्ट्रीय दर्जाचे मोठे मोठे कार्यक्रम जरूर अनुभवले पण काही क्षणाचं रंजन करणार्या या कार्यक्रमांनी रोहेकरांची विकासाची आस काही थांबली नाही.शहरवासियांना प्रश्नांचा विसर पाडायचा,आणि लोकांना भलत्याच विषयात गुंगवून ठेवायचं ही कार्यपध्दती होती.दर चार-सहा महिन्यांना होणार्या भव्यदिव्य कार्यक्रमांमुळे भलेही रोहे वर्तमानपत्रं आणि वाहिन्यातून गाजत असलं तरी त्यामुळं रोह्याचं दुखणं कमी होतं नव्हतं.लोकांना हे सारं दिसत होतं.पण ते उघडपणे बोलायला कोणी धजावत नव्हतं.पत्रकार बोलत होते,लिहित होते तर त्यांचा निषेध कऱणारे बॅनर्स शहरात लावले जात होते.त्यानंं शहरावर दहशतीचं सावट पसरलेलं होतं.परिणामतः एक सुप्त नाराजी रोहेकरांमध्ये दिसते होती .त्याचा परिणाम सुनील तटकरे यांच्या मतांवर नक्कीच झाला.रोह्यात तटकरेंना मतं कमी पडली.याचं कारण शोधण्याच्या आणि त्यावर उतारा शोधण्याच्या प्रयत्न तटकरे यांनी केला असं दिसत नाही.नगरपालिकेच्या राजकारणातही हेच दिसलं.ठरलं असं होतं की,अवधूत तटकरे आमदार होताच त्यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा.असं झालं नाही.वर्षभर ते यापदाला चिकटून बसले.मात्र विरोधात अकरा नगरसेवक गेल्यानंतर त्यांना पर्यायच उरला नाही.त्यांना पद सोडावं लागलं.अवधूत तटकरे आमदार झाल्यानंतर त्यांचं रोहा नगरीकडं लक्षच राहिलं नाही.शहरातील गटारं जशी तुबुन राहिली होती तशीच फाईलीही तुबुंन राहिल्यो होत्या.नगराध्यक्षाचं लक्ष नसल्यानं अधिकारी,कर्मचारी बेमुर्वतपणे वागत होते.कामही होत नव्हती.याची चीड रोहेकरांच्या मनात होती.त्याचा उद्रेक नगरसेवकांच्या उठावाच्या निमित्तानं झाला आणि रोह्यात नवीन परिवर्तनाला सुरूवात झाली.समीर शेडगे हे तरूण नगरसेवक रोह्याचे नगराध्यक्ष बनले.अवधूत तटकरेही बिनविरोध नगराध्यक्ष झाले नव्हते पण समीर शेडगे यांचं नाव पुढं आल्यानंतर विरोधच संपला.समीर शेडगेंना विरोधकांनी ही विरोध केला नाही.असं रोह्यात पहिल्यांदाच घडत होतं.समीर शेडगे आज नगराध्यक्ष म्हणून गेल्या अनेक वर्षाचा बॅकलॉग भरून काढायला निघाले आहेत.झपाटल्यासारखं त्याचं सारं काम सुरू आहे.सामाजिक कामाचं बालकडू त्यांना वडिलांकडूनच मिळालं आहे.त्यामुळं सामाजिक बांधिलकी आणि रोह्याच्या विकासाचा ध्यास यातून रोह्यात परिवर्तन येताना दिसत आहे.प्लॅस्टिक बंदीचा उपक्रम समीर शेडगे यांनी सुरू केला.रोहेकरांनी त्याला उत्तम साथ दिली.आज जवळपास रोहा प्लॅस्टिक मुक्त झालं आहे.बाधकामाच्या परवानग्या,भाजी,मच्छिविक्रेत्यांचे प्रश्न,अपंगाचं मानधन,आदि प्रश्न मार्गी लागत आहेत.रोहा शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि समीर शेडगे यांचा हा प्रयत्न लोकचळवळीचं स्वरूप घेत आहे.समीर शेडगे यांनी नगराध्यक्ष या नावाने व्हॉटसअॅप ग्रुप तयार केला असून त्यात शहरातील प्रमुख नागरिकांचा समावेश केला गेला आहे.कुठं कचरा साचला असेल,कुठं घाण पडली असेल,दिवे लागत नसतील तर नागरिक व्हॉटसअॅपवरून तक्रारी करतात आणि ते प्रश्न त्याच दिवसी मार्गी लागतात.नगराध्यक्षांच्या टेबलवर एकही फाईल नसते.लगेच निर्णय आणि अंमलबजावणी अशा पध्दतीनं कारभार सुरू असल्यानं रोहेकरांना हा सारा बदल स्वप्नवत वाटत आहे.अनेकांना असं वाटतंय की,नजिकच्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका येत आहेत.रोहेकरांना चुचकरण्यासाठी जाणीवपूर्वक लोकप्रिय आणि लोकाभिमूख भूमिका घेणारा चेहरा तटकरेंनी नगराध्यक्षांच्या रूपानं दिला आहे.काहींना असही वाटतंय की,समीर शेडगेंची वाढत असलेली लोकप्रियता तटकरेंना फारकाळ सहन होणार नाही.अर्थात उद्या काय व्हायचे ते होईल पण बर्याच दिवसांनी एक चांगला नगराध्यक्ष रोहेकरांना लाभला आहे.समीर शेडगे यांनी नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त कऱण्याचा संकल्प सोडलेला आहे.पूर्णवेळ कार्यालयात बसणारा,स्वतःचा टिफीन घेऊन कार्यालयात जाणारा नगराध्यक्ष हे चित्र रोहेकरांसाठी कौतुकाचा विषय ठरलेले आहे.परवा कोकण दौर्यावर असताना रोहा नगरपालिकेत जाऊन समीर शेडगे यांची भेट घेण्याचा योग आला.नगरपालिकेचं बाह्यरूपच परिवर्तनाच्या खुणा दाखवून देते .समीर शेडगेंशी गप्पा मारताना त्यांच्या स्वप्नातील रोहे कसे असेल असं ते तळवळीनं सांगत होते.आपल्या कल्पनेला रोहेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगत ते रोहेकरांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करायला विसरले नाहीत.अल्ताफ चोरडेकरा हे नगरसेवक आणि पत्रकारही भेटले.ते कायम तटकरेंच्या कारभारावर हल्ला चढवत आलेले आहेत.मात्र समीर शेडगेच्या कामाच्या पध्दतीनं तेही प्रभावित झालेल बघायला मिळाले.एक काळ असा होता की,रोहा म्हणजे राजे-महाराजांची वसाहत बनले होते.आता रोह्यात एक स्वागतार्ह परिर्वतन होताना दिसते आहे रोहा बदलत आहे.रस्ते रूंद आणि स्वच्छ होत आहेत.समीर शेडगे यांना जास्तीत जास्त वेळ मिळाला तर रोहा नगरपालिका रायगडमधील नंबर एक पालिका ठरल्याशिवाय राहणार नाही.रोहेकरांच्या अपेक्षा अगदीच साध्या साध्या आहेत त्या पूर्ण होताना दिसत असल्यानं आणि नगराध्यक्ष एका सामांन्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतच वावरत असल्यानं एक चांगली सुरूवात रोह्यात होताना दिसते आहे..त्याचं स्वागत केलंच पाहिजे.
एस एम देशमुख