बारामतीच्या संदीपची भेट
मनाला उभारी देणारी ठरली
काल बारामती होतो.. नेहमी प़माणे अनेक पत्रकारांनी माझ्या भोवती गराडा घातलेला होता.. काही जण ,माझ्या बरोबर सेल्फी घेत होते.. तेवढ्यात एक तरूण पत्रकार मित्र समोर आले.. .. म्हणाले, “सर, आपण माझ्या घरी यावं अशी माझी विनंती आहे.. इथं जवळच माझं घर आहे” मला शक्य नव्हतं.. पुढं वालचंदनगरला जायचं होतं.. तिथं कार्यक्रम होता… तिकडे पत्रकार मित्र प़तिक्षा करीत होते.. त्यांचे सारखे फोन येत होते.. “पुढच्या वेळेस नक्की येईल” असं आश्वासन मी संदीपला देत असतानाच आमचे बारामती तालुका अध्यक्ष हेमंत गडकरी पुढं आले.. ते म्हणाले,” सर हे संदीप आढाव.. त्यांच्या डोक्यात ताप गेला आणि ते गंभीर आजारी पडले तेव्हा आपण त्यांना आर्थिक मदत केली होती..” मग मला तो सारा घटनाक्रम आठवला.. हेमंतनं मला फोन करून संदीप आढाव गंभीर आजारी आहेत, त्यांना मराठी पत्रकार परिषदेनं मदत केली पाहिजे अशी विनंती केली होती .. मी लगेच मंगेश चिवटे यांना फोन केला.. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचे मान्य केले.. नंतर दोन दिवसातच एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही दोघेही बारामतीला गेलो होतो.. ..कार्यक़मातच मदतीचा चेक हेमंत गडकरी यांच्याकडं सुपूर्द केला होता.. .. तो संदीप आढाव यांना दिला गेला.. मदत फार मोठी नव्हती पण संदीप आढाव सांगतात, “ही मदत माझं मनोबल वाढविणारी आणि आपण एकटे नाही आहोत, कोणी तरी हक्काचं आपल्या सोबत आहे हा नवा विश्वास देणारी होती.. त्यामुळे मोठ्या आजारातून मी बाहेर आलो ” संदीपनं व्यक्त केलेली कृतज्ञतेची ही भावना सुकून देणारी, माझ्या अंगावर रोमांच उभे करणारी होती..
खरं तर हे सारं मी विसरून गेलो होतो.. पण संदीपला धन्यवाद यासाठी देईल की, अडचणीच्या काळात झालेल्या मदतीची आठवण त्यांनी ठेवली.. हल्ली असं होत नाही.. लोक लगेच विसरतात..अनेकदा कृतघ्न देखील होतात.. यासंदर्भातले अनेक वाईट अनुभव पाठिशी आहेत.. त्यामुळं मदत करायची आणि विसरून जायचं हे धोरण आम्ही ठेवलं आहे.. पण संदीपनं सुखद धक्का दिला होता..
नंतर आम्ही वालचंदनगर कडे रवाना झालो.. पण गाडीत संदीपचा आजारपणातील तो फोटो माझ्या डोळ्यासमोरून जात नव्हता.. ..दिवसभराच्या दगदगीनं शरीर थकलं होतं.. संदीपच्या भेटीनं मन मात्र प़फुल्लीत झालं होतं.. आपण कोणाच्या तरी मदतीला येऊ शकतो ही जाणीव लाखमोलाचं समाधान देणारी होती.. महाराष्ट्रात मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही अक्षरशः शेकडो पत्रकारांना मदत करू शकलो याचा आनंद कालच्या एवढा मला कधी झाला नाही.. नंतर राहून राहून वाटलं, संदीपच्या घरी जायला हवं होतं..पुढच्या वेळेस बारामतीला जाईल तेव्हा चहा घेण्यासाठी संदीपच्या घरी नक्की जाणार आहे..
चळवळ कश्यासाठी हवी? हार, फुले, सत्कार किंवा आंदोलनं करणं आणि सरकारकडून आपल्या मागण्या पदरात पाडून घेणं एवढाच मराठी पत्रकार परिषदेच्या चळवळीचा उद्देश नाही.. मराठी पत्रकार परिषद हे आम्ही कुटुंब समजतो.. या कुटुंबातील कोणताही घटक एकाकी नाही, आम्ही सारे त्याच्या पाठिशी आहोत हा विश्वास प़त्येक सदस्यांच्या मनात निर्माण करणं हा आपल्या चळवळीचा उदेदश आहे.. संदीपला भेटल्यानंतर आपली चळवळ योग्य मार्गानं जात असल्याची जाणीव मोठं आत्मिक समाधान देणारी होती
एस.एम.देशमुख