आगरतालाः सरकारनं डेली डेशर कथा या बंगाली वृत्तपत्राला कुलूप ठोकलं आहे.संपादक,प्रकाशन,आणि मालकी हक्कात झालेल्या बदलाची माहिती वृत्तपत्र नोंदणी कार्यालयाला दिली नाही या कारणावरून जिल्हा दंडाधिकार्यांनी काल तातडीनं ही कारवाई केली आहे.याची संतप्त प्रतिक्रिया माध्यमांत उमटायला सुरूवात झाली आहे.15 ऑगस्ट 1979 ला सुरू झालेलं डेली डेशर कथा अगोदर साप्ताहिक स्वरूपात वाचकांच्या भेटीला यायचं..त्यानंतर 1988 पासून ते दैनिक स्वरूपात प्रसिध्द व्हायचं.सीपीआयएमचं मुखपत्र म्हणून या वृत्तपत्राकडं पाहिलं जायचं.कॉग्रेसच्या सत्ताकाळातही या वृत्तपत्रावर आघात झाले.आता त्रिपुरात भाजप सरकार आल्यानंतर अगोदर या दैनिकाच्या जाहिराती बंद केल्या गेल्या आता एका रात्रीतून प्रकाशन बंद केलं गेलं आहे.डेली डेशर कथा या वृत्तपत्रात दोनशेवर पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी कार्यरत आहेत.
विरोधी विचार दडपून टाकण्याचे प्रयत्न जगभर सुरू असतात.डेली डेशर कथाबाबतचा निर्णय त्याचाच एक भाग आहे.अनेकदा जाहिराती बंद केल्या जातात,तुमचं चॅनल असेल तर त्यात तांत्रिक अडथळे निर्माण करून कार्यक्रम व्यवस्थित दिसणार नाहीत याची काळजी घेतली.मात्र हे सारं फंडे आजमाविल्यानंतरही जेव्हा संबंधित व्यवस्थापन भिक घालत नाही असं दिसतं तेव्हा डेली डेशर कथावर जशी कारवाई केली गेली तशी ती केली जाते.जगात अशी अनेक उदाहरणे देता येतील.डेली डेशर कथा या दैनिकावरील कारवाई ही राजकीय असल्याचा दावा दैनिकाचे माजी संपादक गौतम दास यांनी केला आहे.आम्ही संपादक,प्रकाशक,मुद्रक तसेच मालकीहक्क बदलाची माहिती जिल्हादंडाधिकार्यांना सादर केली होती मात्र ती आरएनआयला पाठविली गेली नाही असे दिसते असा दावाही दास यांनी केला आहे.हा आदेश काढला जाण्यापुर्वी भाजपचे सरचिटणीस राजीब भट्टाचार्य यांनी डीएमची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती असा आरोपही दास यांनी केला आहे.बेकायदा कृती करण्यासाठी भाजपनं जिल्हादंडाधिकार्यांवर दबाव आणल्याचं दास याचं म्हणणं आहे.मात्र भाजपचे प्रदेश प्रवक्ता क्रांती देव यांनी कारवाईत भाजपचा हात नसल्याचा खुलासा केला आहे.
त्रिपुरातील डेली डेशर कथावर सरकारी बंदी