मराठी पत्रकार परिषदेचा कार्यविस्तार 35 जिल्हयात आणि जवळपास 340 तालक्यात झालेला असला तरी गेली दहा पंधरा वर्षे ठाणे जिल्हा पत्रकार संघ मृतावस्थेत होता.पदाधिकारी निष्क्रीय झाले होते,नवे उपक्रम नाहीत,कार्यक्रम नाहीत,नव्या दमाच्या पत्रकारांना सदस्य करून घेणे बंद होते.त्यामुळं ठराविक मंडळी पत्रकार संघावर बेकायदा ताबा मिळवून बसलेली होती.अशा स्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाची नव्यानं घडी घालणं आवश्यक होतं.त्यादृष्टीनं प्रयत्न होत होते पण यश येत नव्हतं,.त्यामुळं परिषदेने अगोदर ठाणे जिल्हा पत्रकार संघाची कार्यकारिणी बरखास्त केली.त्यानंतर काल जिल्हयातील प्रमुख पत्रकारांची बैठक ठाण्यात घेतली गेली.या बैठकीस मी, किरण नाईक,मिलिंद अष्टीवकर,संतोष पवार असे आम्ही परिषदेच्या वतीने उपस्थित होतो.बैठकीस पन्नास ते साठ पत्रकार उपस्थित होते.बैठकीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाची एक अस्थाई समिती नेमण्यात आली.ही समिती एक वर्षात संस्थेची विस्कटलेली घडी नव्याने घालेल,एक वर्षात नव्याने सदस्य नोंदणी करेल आणि निवडणुका घेऊन रितसर नवी कार्यकारणी अस्तित्वात येईल.अस्थाई समितीची निवड एक मताने आणि टाळ्यांच्या कडकडाटात झाली.ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणून संजय पितळे यांची निवड कऱण्यात आली आहे.दोन उपाध्यक्षांमध्ये विकास महाडिक आणि तुषार राजे ,सरचिटणीसपदी श्रीकांत खाडे आणि नारायण शेट्टी यांची निवड केली गेली.कोषाध्यक्षपदी राहूल लोढे यांची तर परिषद प्रतिनिधी म्हणून दिलीप शिंदे यांची निवड केली गेली.नव्या कार्यकारिचा पहिला कार्यक्रम 6 जानेवारीला गडकरीमध्ये घेण्याचे नक्की झाले आहे.परिषदेचे पदाधिकारी देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.यावेळी पत्रकार भवनाच्या वादावरही चर्चा करून काही ठोस निर्णय घेतेले गेले आहेत.बाहेरच्या पत्रकारांना कल्पना नसेल की,ठाणे जिल्हा पत्रकार संघाचं पत्रकार भवन एका बिल्डरनं बळकावलं आहे. या बिल्डरला राजाश्रय असल्यानं जिल्हयातील पत्रकारांच्या प्रयत्नांनंतरही त्याच्या घश्यातून पत्रकार भवन काढून घेण्यात अद्याप यश आलेलं नाही.पत्रकार भवनात गाळे काढून हे गाळे या पढ्यानं विकले आहेत.त्यातून कोटयवधींची माया कमविली आहे.प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्यानं शासकीय अधिकारी हात झटकून मोकळे होतात.हा विषय आता मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून या प्रकऱणी सर्वसंबंधितांची बैठक लावण्याची विंनंती मुख्यमंत्र्यांना केली जाणार आहे.येत्या 20 तारखेला कार्टाचा निकाल येण्याचीही शक्यता आहे.गेली अनेक वर्षे संजय पितळे आणि त्यांचे सहकारी त्याचा पाठपुरावा करीत आहेत.
कालच्या बैठकीस ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ,परिषदेचे माजी कोषाध्यक्ष राजाराम माने आदि उपस्थित होते.त्यांनीही बैठकीत महत्वाच्या सूचना करून जिल्हा पत्रकार संघाची नव्याने बांधणी झाली पाहिजे असा आग्रह धरला.त्यानुसार आता ठाण्याचा विषय मार्गी लागला आहे.मुंबईच्या जवळ असलेले रायगड ,पुणे,नाशिक जिल्हा पत्रकार संघाचे काम उत्तम प्रकारे सुरू असताना ठाण्यात मात्र बांधणी होत नसल्याची खंत होती.कालच्या यशस्वी बैठकीमुळे ती खंत दूर झाली असून ठाणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात आता परिषदेचे काम वाढणार आहे.ठाण्याबरोबरच पालघरमध्येही आता नव्याने संघटना बांधण्याची तयारी होत आहे.पालघरलाही लवकरच बैठक घेण्याचे नियोजन आहे.
संजय पितळे आणि त्यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्चा.