शिवसेनेने आपले प्रवक्ते बदलले आहेत.जुन्यांपैकी खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत,मनोहर जोशी आणि सुभाष देसाई यांना डच्चू दिला गेला आहे.डॉ.निलम गोऱ्हे यांचं प्रवक्तेपद मात्र कायम आहे.अरविंद सावंत,अमोल कोल्हे,अरविंद भोसले ,विजय शिवतारे याच्यासारख्या नव्या दमाच्या चेहऱ्याना संधी दिली गेली आहे.
मनोहर जोशीं हे ज्येष्ठ नेते असल्यानं वयोमानाप्रमाणे त्यांना नारळ मिळल्याचं आश्चर्य कोणाला वाटलं नाही .सुभाष देसाई यांचीही अलिकडे प्रकृत्ती चांगली नसते त्यामुळे त्यांनाही पक्षानं विश्रांती दिलेली असू शकते.मात्र संजय राऊत यांना डच्चू ही आजची मोठी बातमी ठरली आहे.याचं काऱण संजय राऊत हे पक्षाचे फायरब्र्रन्ड नेते आहेत.प्रवक्ते म्ङणून तेच प्रामुख्यानं आणि सातत्यानं माध्यमांना सामोरे जायचे.तुलनेत मनोहर जोशी असतील किंवा सुभाष देसाई फारच कमी वेळा माध्यमांसमोर यायचे.त्यामुळं संजय राऊत यांची उचलबांगडी हा चर्चेचा विषय ठरला असल्यास नवल नाही.शिवसेना पक्षप्रमुखांनी एवढा धाडसी निर्णय का घेतला? याची आता चर्चा सुरू झाली आहे.संजय राऊत यांना हटविण्याचं तात्कालिक कारण ठरलं ते राष्ट्रवादीच्या अलिबागमधील चिंतन शिबिरानंतर संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया.शरद पवार यांनी “महाराष्ट्रातील भाजप सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतलेला नाही” असं स्पष्ट केल्यानंतर काही मिनिटातच सेनेचे प्रवक्ते असलेल्या संजय राऊत यांनी “आम्ही सरकार पडू देणार नाही”अशी प्रतिक्रिया दिली होती.ती सेनेला अडचणीत आणणारी होती असं अनेकांना वाटलं.नंतर घडलंही तसंच राऊतांच्या प्रतिक्रियेनंतर काही वेळातच उध्दव ठाकरे यांनी “आम्ही विरोधी बाकावरच बसणार”असल्याचे सांगावे लागले.दोन नेत्यांच्या या परस्परविरोधी प्रतिक्रियामुळे पक्षातील गोंधळाची स्थिती जगासमोर आली.यामुळे उध्दव ठाकरे संतप्त झाले असे म्हटले जाते.अर्थात संजय राऊतांच्या विधानावर यापुर्वी देखील वारंवार पक्षाला खुलासे करावे लागले होते.तसेच अलिकडच्या काळात सामनातून व्यक्त होणारी भूमिका आणि प्रत्यक्षात सेनेची भूमिाक यामध्ये देखील तफावत असल्याचे आणि त्यावर देखील पक्षाला खुलासे करण्याची वेळ आल्याचे काही दाखले दिले जातात.त्यामुळेच कोणतेही पूर्वसंकेत न देता तडकाफडकी हा निर्णय़ घेतला गेला आहे.हा संजय राऊत यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते.संजय राऊत यांचे शरद पवार यांच्याशी असलेलं संख्य देखील त्यांच्या उचलबांगडीस कारणीभूत ठरलं असं बोललं जातंय.कारण शिवसेना आणि राष्ट्रवादीचे संबंध अलिकडे फारच ताणले गेले आहेत.
संजय राऊत यांना डच्चू दिला गेला हे स्वतः संजय राऊत यांना मान्य नाही.”आपण गेली अनेक वर्षे प्रवक्ते म्हणून काम करीत आहोत.तेव्हा पक्ष वाढविण्यासाठी नव्या चेहऱ्यांना संधी देण आवश्य़क होते ती दिली गेली आहे.शिवाय मला सामनाचे कार्यकारी संपादक म्हणून सामनात जास्त लक्ष देता यावे तसेच पक्ष कार्यासाठी देखील वेळ मिळावा यासाठी हा बदल असल्याचे त्यांचे म्हणणे आहे” एका वाहिनीच्या प्रतिनिधीने त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी राऊतांना फोन केला आणि तुमची उचलबांगडी केली गेली यावर तुमची प्रतिक्रिया काय ? असा प्रश्न विचारला असता ते उसळून म्हणाले,कोणी सांगितलं तुम्हाला माझी उचलबांगडी झाली म्हणून? नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देण्यासाठी हा निर्णय़ घेतल्याचं राऊतांचं म्हणणं आहे.राऊतांचंं हे म्हणणॅं खरं असेल तर मग हा नियम निलम गोऱ्हे यांना का लावला गेला नाही?या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही.एक मात्र खरं की,राऊतांना विश्वासात न घेता त्यांना बदलले गेले असावे त्यामुळे ते मनातून दुखावले गेलेत हे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसते.डच्चू दिला म्हणणाऱ्यांना शिवसेना समजली नाही ,असे लोक अफवा पसरवितात,ते मुर्ख आहेत असाही अभिप्राय त्यांनी दिला आहे.