आपल्या विरुद्ध मीडिया ट्रायल आणि हेट कँम्पेन चालवल्याबद्दल इस्लाम धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांनी पत्रकार अर्णब गोस्वामींवर आणि टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. फर्स्टपोस्टच्या वृत्तानुसार, झाकीर नाईक यांनी टाइम्स नाऊ आणि या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अब्रुनुकसानीबद्दल नोटीस पाठवली आहे. दोन धर्मांमध्ये वैर आणि तिरस्कार निर्माण करणे तसेच मुस्लिम समुदायाच्या भावना दुखावल्याचेही त्यांनी पाठवलेल्या नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. झाकीर नाईक यांचे वकिल मुबीन सोलकर यांनी ही नोटीस पाठवली आहे.
पहिल्यांदाच झाकीर नाईक यांनी अशाप्रकारची नोटीस एका वृत्तवाहिनीला पाठवली आहे. झाकीर नाईक यांनी अर्णब यांनी आपली माफी मागावी तसेच या वृत्तवाहिनीने आपल्याविरोधात केलेली सगळी वक्तव्ये मागे घ्यावीत, असेही म्हटले आहे. सध्या झाकीर नाईक भारताबाहेर आहे. काही दिवसांपूर्वी ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी त्यांच्या भाषणापासून प्रेरणा घेऊन हल्ले केले होते, असे आरोपही त्यांच्यावर आहेत. त्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात तर आहेच पण आतापर्यंत त्यांनी केलेल्या भाषणांची चौकशी करण्याचे आदेशही सरकारने दिले आहेत. झाकिर नाईक स्वत: पीस टीव्ही नावाची वाहिनी चालवत होते. परंतु बांगलादेश सरकारने या वाहिनीवर बंदी घातली आहे.
लोकसत्तावरून साभार