विषय समजून घेणं,त्याचं गांभीर्य समाज आणि लोकप्रतिनिधींच्या ध्यानात आणून देणं,आणि तो प्रश्न सुटेपर्यत त्याचा पाठपुरावा करणं हे कोणत्याही जागरूक पत्रकारांचं काम असतं.हे काम इमाने-इतबारे करीत आपल्या विभागातील लोकांच्या जिव्हाळ्याच्या समस्यांना वाचा फोडण्याचं आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक पत्रकार मोठ्या सचोटीनं करताना दिसतात.बीड जिल्हयातील वडवणी येथील पत्रकारांनीही सातत्यानं लोकांचे प्रश्न वेशिवर टांगून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आणि आपल्या समाजाभिमुख पत्रकारितेचा प्रत्यय आणून दिला आहे.
वडवणी हा नव्यानंच अस्तित्वात आलेला तालुका.दुष्काळ पाचविलाच पुजलेला. जेमतेम 400 ते 500 मिली मिटर पावसाचा हा परिसर असला तरी अनेकदा तेवढा पाऊसही होत नसल्यानं दुष्काळाचं संकट दरवर्षी न चुकता येतंच येतं. एका बाजुला डोंगरी भाग आणि खाली काही सुपिक भाग असला तरी सातत्यानं दुष्काळाला तोंड द्यावं लागत असल्यानं संपुर्ण वडवणी तालुक्याचीच अवस्था वाईट झालेली आहे. दुष्काळ आहे म्हटल्यावर तेथे प्रश्नांची कमतरता नाही.रस्ते,वीज,पाणी,रोजगारापासून अनेक बुनियादी प्रश्नांसाठी लोकांना धडपड करावी लागते,रोजगाराच्या संधी नसल्यानं असंख्य शेतकऱ्यांना ऊस तोडणीच्या कामावर जावं लागतं.लोकप्रतिनिधी या सर्व प्रश्नांबाबत फार संवेदनशील असतातच असं नाही.मात्र वडवणीतील सर्वच पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या ताकदीवर वडवणीचे आणि तालुक्याचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याचं सुखद चित्र बघायला मिळतं.
यंदा पाऊस कमी झाल्यान सरकारनं राज्यातील 121 तालुके टंचाईग्रस्त असल्याचं जाहीर केल.त्यांची नावं देखील जाहीर केली.या टंचाईग्रस्त गावांमध्ये बीड जिल्हयातील वडवणी,बीड आणि अंबाजोगाई वगळता अन्य सर्व तालुक्यांचा समावेश केला गेला होता.ही यादी प्रसिध्द झाली त्याच दिवशी आपल्या तालुक्याला डावलेलं गेलंय हे वडवणीच्या पत्रकारांच्या ध्यानात आलं.केवळ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे चुकीची आकडेवारी सरकारकडं गेल्यानं ही गफलत झाल्याचं दिसून आल्यानंतर सारेच पत्रकार तुटून पडले.आपआपल्या वर्तमानपत्रांच्या माध्यमातून त्यांनी हा विषय जगाच्या समोर आणला.ते करतानाच वस्तुस्थिती देखील समोर आणली.या प्रश्नावर जनमते प्रक्षुब्ध आहे याचीही जाणीव सरकारीयंत्रणा तसेच लोकप्रनिनिधीनंा करून दिली.त्याचा पाठपुरावाही केला .अंतिमतः माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके आणि पालकमंत्री जयदत्तआण्णा क्षीरसागर यांना त्याची दखल ध्यावी लागली.त्यांनी हा विषय महसुलमंत्र्यांकंड मांडला आणि अखेर सरकारनं वडवणी आणि बीड हे दोन तालुके टंचाईग्रस्त गावांच्या यादीत समाविष्ट केले.वडवणी तालुका टंचाईग्रस्त झाल्यानं वीज बिलात सवलतीसह अन्य काही सवलती जनतेला मिळणार आहेत त्याचा फायदा लाखो कुटुंबांना होणार आहे.वडवणीच्या पत्रकारांनी केलेलं हे कार्य कौतुकास्पद आणि अभिनंदनीय आहे.त्याबद्दल लोकप्रश्नचे प्रतिनिधी अनिल वाघमारे आणि वडवणीतील अन्य सर्व पत्रकारांना मनःपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील.पत्रकारांबद्द्ल अनेकजण अर्धवट माहितीच्या आधारे नाकं मुरडत असतात मात्र महाराष्ट्रातील पत्रकारांनी सातत्यानं सामाजिक बांधिलकी जपत आपली भूमिका निष्टेनं पार पाडल्याची हजारो उदाहरणं देता येतील.या मालिकेतलं वडवणीतलं हे ताजं उदाहऱण आहे.(एस.एम.)