आपच्या स्वयंघोषित क्रांतीच्या जनक आणि ” महान नेत्या ” अंजली दमानिया यांनी आपचा राजीनामा दिलाय.पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व आणि पदाचाही त्यांनी त्याग केलाय.अंजलीताई म्हणे आता राजकारण सन्यास घेणारयत.त्या म्हणतात,आता माझ्या प्रायव्हेशीमध्ये कोणी लुडबुड करू नये.राजीनाम्याचं कारण वैयक्तिक असल्याचं त्याचं म्हणणं असलं तरी आपचं जहाज बुडत असल्याची चाहूल त्यांना लागल्यानं त्या अगोदरच जहाजातून बाहेर पडल्यात असं त्यांचे टिकाकार म्हणतात. त्यांच्या बरोबर प्रिती मेनन यांनी देखील आपच्या पदांचा राजीनामा दिलाय.
अंजली दमानिया यांच्या सारख्या महान नेत्यानं राजीनामा दिल्यानं आपचं किती नुकसान झालंय ते केजरीवालच सांगू शकतील. पण महाराष्ट्राचं मात्र त्यांच्या राजीनाम्यानं मोठं नुकसान होणार आहे.हातात झाडू घेऊन या महोदया राज्यात ” शुध्दीकऱण” करायला निघाल्या होत्या. भ्रष्टाचाराचा कमालीचा तिटकारा असलेल्या दमानियांना महाराष्टातून भ्रष्टाचाराचं नामोनिशान मिटवून टाकायचं होतं. या शुध्दीकऱण मोहिमेचं आता कसं होणार? याची घोर चिंता महाराष्ट्रातील जनतेला लागलीय.शिवाय आता महाराष्ट्राचं प्रबोधन कोण कऱणार? याची चिंताही जमतेला लागलीय.वाहिन्यावरील त्यांचो तो आवेश,त्याचं तत्वज्ञान,समाज बदलून टाकण्याची त्याना लागलेली काळजी,सारे साले चोर आहेत हे सांगतानाची त्यांची भाषा आता आपल्याला ऐकायला मिळणार नाही.कित्ती ..कित्ती ..नुकसाना आहे हे सारं.आपचे जे कोणी शिल्लक नेते आहेत त्यांनी दमानियाबाईचा राजीनामा स्वीकारू नये कारण त्यांचं राजकाऱणातून निवृत्त होणं राज्यात मोठी राजकीय पोकळी तयार कऱणारं ठरेल .आज आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते ” अंजली दमानिया यांच्या राजीनाम्यानं महाराष्ट्राच्या राजकाऱण निर्माण होणारी पोकळी पुढील हजार वर्षे तरी भरून निघणार नाही.”