“सुंभ जळाला तरी पिळ जात नाही” हा वाकप्रचार अरविंद केजरीवाल यांना सध्या तंतोतंत लागू होतोय.लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचं पानिपत झाले.त्यांचे सारे बडे नेते पराभूत झाले हे सारं झाल्यानंतरही त्यांचा पिळ जात नाही.खरं तर एवढी पडझड झाल्यावर त्यावर चिंतन करणं अपेक्षित होतं.तसं नं करता ते त्याच चुका पुन्हा पुन्हा करीत आहेत. प्रसिध्दीचा सोस हेच यामागचं कारण असावं असं सध्या तरी दिसतंय.कारण .सतत प्रसिध्दीच्या झोतात राहण्याचं व्यसन लागलेल्या अरविंद केजरीवाल यांना माध्यमांचा अघोषित बहिष्कार असह्य झाला असावा..त्यातून मग कॅमेऱ्यांचा फोकस आपल्याक डं वळविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ते लटपटी खटपटी करू लागले आहेत.असे दिसतेय . .मोठ्या तात्विकतेचा आव आणत ज्यांनी मुख्यमंत्रापद सोडलं तेच केजरीवाल दिल्लीत पुन्हा नव्यानं सरकार स्थापनेसाठी काही करता येतंय का हे पाहण्यासाठी काल दिल्लीच्या राज्यपालांना भेटले.”या भेटीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली नाही” असं आपतर्फे सांगण्यात आलं.मग केजरीवाल काय राज्यपालांना हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी भेटले काय? आप वाले काहीही म्हणत असले तरी त्यांची भेट राजकीयच होती हे सांगण्यासाठी राजकारणाचा फार अभ्यास असायला हवा असं नाही.राज्यपालांना भेटून आल्यावर “सरकारचा राजीनामा दिला ही आपली चूक झाली” असं केजरीवाल यांनी मान्य केलं.ही उपरती सरकार स्थापन करता येत नाही हे स्पष्ट झाल्यावर झालेली आहे याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.राज्यपालांनी त्यांना काय सांगितलं हे माहित नाही पण कॉंग्रेसनं त्यांच्या आशा आकांक्षांवर पाणी फेरलं आहे.आपला पाठिंबा देणार नाही हे कॉग्रेसनं जाहीर केलंय..अशा परिस्थितीत निवडणुकांना सामोरं जाणं हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उरतो.परंतू लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जर दिल्लीत निवडणुका झाल्या तर तेथेही केजरीवाल यांच्या हाती धुपाटणंच लागणार असं अनेक राजकीय पंडितांना वाटतं.अशा स्थितीत पुन्हा माध्यमांचा झोत आपल्याकडं ओढून घेत चर्चेत राहायचं असेल तर काही तरी निमित्ता शोधून दिल्ली अशांत करणं आवश्यक होतं.गडकरीच्या केसचं त्यांना निमित्त मिळालं आणि पुन्हा एकदा दिल्लीच्या रस्त्यावर केजरीवाल नौटंकीचे प्रयोग सुरू झाला आहे.या नौटकीचं गांभीर्य असं की,ही नौटकी तिहार परिसरात सुरू आहे.तिहारचा परिसर म्हणजे रामलिला किंवा जंतर-मंतर नाही.तिहारमध्ये अनेक खतरनाक गुंड ठेवलेले आहेत.अशा स्थितीत तिथं कोणताही अनुचित प्रकार राष्ट्राच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण करू शकतो.दुर्दैवानं याचं केजरीवाल कंपूला भान नाही.अशा बेबंद वागण्यामुळंच जनतेनं त्यांना अद्दल घडविली आहे.तरीही ते काही बोध घेत नसलीत तर आता कायदेशीर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे.
काय आहे प्रकरण?
अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.हे आरोप करताना त्यांनी कसलेही पुरावे दिलेले नव्हते.सांगीव किंवा एकिव गोष्टींवर विश्वास ठेऊनच त्यांनी आरोपांची सरबत्ती केली होती.यातील काही आरोप पूर्तीच्या संदर्भातले होते.गडकरी यांनी त्यांना नोटीस पाठविल्यावरही त्यांनी आपले आरोप मागे घेतले नाहीत.तेव्हा गडकरी यांनी केजरीवाल यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला .या प्रकऱणी केजरीवाल यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पण न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे असं वारंवार कथन कऱणारे केजरीवाल कोर्टात हजर राहिल े नाहीत.निवडणूक प्रचारात आहे असं कारण ते देत राहिले.केजरीवालच्या विरोधात दाखल झालेला खटला गुन्हेगारी स्वरूपाचा असल्यानं आरोपी म्हणून केजरीवाल यांना न्यायालयात हजर राहणं अनिवार्यच होतं.पण ते उपस्थित राहिले नाहीत.आज सुनावणी झाली तेव्हा केजरीवाल यांना तुरूंगात धाडण्यापुर्वी कोर्टाकडून जामिन घेण्याचा पर्याय त्यांच्यासमोर ठेवण्यात आला होता.10 हजाराच्या जातमुचलक्यावर केजरीवाल यांना जामिन देण्याची न्यायालयानं तयारी दाखविली होती.सुरूवातीला केजरीवाल दहा हजारांचा जामिन घ्यायलाही तयार झाले होते पण नंतर अचानक त्यांना साक्षात्कार झाला आणि फुकटची प्रसिध्दी मिळविण्याची आलेली संधी सोडता कामा नये असं त्यांना वाटलं. त्यांनी जामिन नाकारून तुरूंगात जाणं पसंत केलं.
लोकलढ्यातील कार्यकेर्त एक भूमिका म्हणून जामिन न घेता तुरूंगात जाऊन आपला विरोध प्रकट करीत असतात.असा लढा जनतेसाठी असेल तर ते शोभूनही दिसतं.केजरीवालांनी ज्यासाठी जेलमध्ये जाणं निवडलं तो जनतेशी निगडीत विषय नाही.तो तसा व्यक्तिगत विषय आहे.कोणावरही वाट्टेल ते आरोप करायचे आणि त्याचे पुरावे द्यायची वेळ आली की पळ काढायाचा ही केजरीवाल यांची आदत आहे.गडकरी यांच्यावर आरोप करून त्यांनी पुन्हा ते दाखवून दिलं.गडकरी प्रमाणंच त्यांनी माध्यमांपासून अनेकांवर आरोप केले.कोणी त्यांच्या तोंडी लागलं नाही.गडकरींनी मात्र खटला दाखल केला.प्रकरण गळ्याशी आल्यावर आपण अटकतो हे त्यांना जाणंवलं. आपल्याजवळ कसलेच पुरावे नसल्यानं आपण आरोप सिध्द करू शकत नाहीत हे ही त्यांना ऊमगलं.. कोर्टात आपणास नक्कीच शिक्षा होणार याचीही जाणीव त्यांना झाली.अशा स्थितीत काही तरी नौटंकी कऱणं तयंना आवश्यक वाटलं.सध्या दिल्लीत जे सुरू आहे तो याचाच भाग आहे.पण मुख्यमंत्री असताना भ्रष्ट मंत्र्याची पाठराखण करताना रस्त्यावर उतरून आंदोलन करणं. भाजपच्या कार्यालयावर हल्ला बोल कऱणं आणि त्यानंतर मुख्यमंत्रापदाचा राजीनामा देऊन पळ काढणं ही सारी प्रकरणं जशी त्यांच्या अंगलट आली तसंच सध्याच्या नौटंकीचं होणार आहे.कारण हे लोकांना मान्य नव्हतं किंवा आज त्यांनी तिहार तुरूंगाबाहेर राडा कऱणं हेही देशातील जनतेला पटलेलं नाही. .या साऱ्या गोष्टीचं कसंलंही समर्थन केजरीवाल यांच्या पोपटांना करता येणार नाही.कारण एका खटल्यात केजरीवाल आरोपी आहेत आणि न्यायालय आपल्या नेहमीच्या पध्दतीप्रमाणं आरोपीशी वागलं आहे.अरविंद केजरीवाल आहेत म्हणून न्यायालयानं त्यांना काही सवलत द्यावी याासाठी देशातला कायदा संमती देत नाही.देशातील कायद्यानुसारच न्यायालयानं निर्णय दिला आहे.तो स्वीकारणं केजरीवाल यांच्यावर बंधनकारक आहे.जामिन नाही भरायचा तर नका भरू मग गुपचूप तुरूंगात जाऊन बसा.हुतात्मा व्हायची योजना आखायची आणि दुसरीकडं थयथयाटही करायचा हा दुहेरी खेळ आता देशातील जनतेला मान्य नाही. प्रश्न असा आहे की.,अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाचे कार्यकर्ते तिहार समोर जाऊन आंदोलन आणि निदर्शनं करीत असतील तर ती कोणाच्या विरोधात आहेत ? .ती गडकरींच्या विरोधात आहेत की न्यायालयाच्या ? हे त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे.ती गडकरींच्या विरोधात असतील तर ती भाजप कार्यालयसमोर व्हायला हवीत.न्यायाल्याच्या विरोधात अशी निदर्शनं कऱणं हा न्यायालयाचा अवमान ठरू शकतो आणि त्यावरून केजरीवाल यांच्यावर वेगळी कारवाई होऊ शकते.
पराभवानं व्यथित झालेले केजरीवाल सैरभैर झाले आहेत.त्यामुळं देशवासियांचा अजून ज्या न्यायदेवतेवर विश्वास आहे त्याच न्यायदेवतेला केजरीवाल वेठीस धरू पहात आहेत.ते स्वतःला न्यायदेवतेपेक्षा मोठे समजत असतील तर त्यांचा हा भ्रम कायद्याचा बडगा दाखवून दूर केलाच पाहिजे.कायदा हातात घेणाऱा मग तो कोणीही असला तरी त्याची गय करता कामा नये असंच या देशातील आम जनतेला वाटतं.
एस एम देशमुख