मुंबई- विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गोळ्या घालून त्याचा आवाज कायमचा बंद कऱण्याबरोबरच त्यांनी सुरू केलेली चळवळ बंद पाडण्याचे पध्दतशीर प्रयत्न राज्यात एका बाजुला सुरू असतानाच पत्रकारांवर हल्ले करून माध्यमामध्येही दहशत निर्माण कऱण्याचा प्रयत्नही नेटाने होताना दिसतो आहे.पत्रकारांवर हल्ले करून माध्यमांचा आवाज बंद कऱण्याच्या घटना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात सातत्यानं घडत आहेत.नव्या वर्षात जानेवारीत राज्यात नऊ ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले किंवा त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या तर फेब्रुवारीच्या पहिल्या 23 दिवसात आठ पत्रकारांवर हल्ले तरी झाले किंवा त्यांना धमक्या तरी देण्यात आल्या आहेत.फेब्रुवारीत 6 तारखेला जिंतूर येथे पत्रकार राजू देशमुख यांच्यावर हल्ला झाला.त्यानंतर कळंब येथे 10 तारखेला, 11 तारखेला घाटकोपर,16 तारखेला माहूर,20 तारखेला नगर ,23 तारखेला माणगाव येथील पत्रकाराला मारहाण केली गेली.चारच दिवसांपुर्वी माणगाव येथील लोकमतचे पत्रकार नितीन देशमुख यांचेही अपहरण करण्यात आले होते.या घटना बातमी संकलन करताना किंवा बातमीच्या काऱणांवरूनच झालेल्या आहेत.डॉ.दोभोळकरांच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश आल्याने मारेकऱ्याची भिड चेपली आणि त्यांनी कॉ.पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.त्याच धर्तीवर पत्रकारांवर हल्ले केले तरी काहीच होत नाही हे समाजकंटकांच्या ध्यानात आल्याने हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झालेली आहे.महाराष्ट्रात सरासरी चार दिवसाला एका पत्रकारावर हल्ला होत असल्याने माध्यम जगतात मोठी संतापाची भावना आहे.पत्रकारांवरील हे हल्ले थांबविण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा करावा अशी मागणी राज्यातील 95 टक्के पत्रकार करीत असताना अगोदरच्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले,पत्रकार संरक्षण कायद्याचं आश्वासन देत नवं सरकार सत्तेवर आलं पण हे सरकारही आता मतभेद असल्याचे कारण सांगत कायदा कऱण्यास टाळाटाळ करीत आहे.येत्या अधिवेशन काळात कायद्यासाठी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी आता पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील पत्रकार करीत आहेत.