1 सप्टेंबरचा औढा नागनाथ येथे संपन्न झालेला राज्यातील छोटया वृत्तपत्रांच्या मालक-संपादकांचा मेळावा,20 सप्टेंबरला अंबाजोगाई येथे संपन्न झालेले बीड जिल्हास्तरीय अधिवेशन,गंगाखेडच्या पत्रकारांच्या पुढाकारानं केरळ पूरग्रस्तांसाठी जमा झालेला निधी केरळ पूरग्रस्तांसाठी सूपूर्त करण्याचा झालेला कार्यक्रम, बेळगावच्या सीमेवर असलेल्या चंदगडच्या पत्रकारांशी झालेला दिलखुलास संवाद, आणि माझ्या जन्मभूमीत पहिल्यांदाच झालेलं नेत्र तपासणी शिबिर आणि मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर असे पाच-सहा महत्वाचे कार्यक्रम गेल्या 21 दिवसांत करता आले किंवा या कार्यंक्रमांना उपस्थित राहता आले .त्यासाठी तब्बल अडीच हजार किलो मिटरच्यावरती प्रवास करावा लागला.बीडला गेल्यानंतर आमचे मित्र अनिल वाघमारे जरी गाडीचा ताबा घेत असले तरी अन्यत्र चालक आणि मालक अशा दुहेरी भूमिकेतच आम्हाला प्रवास करावा लागतो.मात्र कधी कंटाळा येत नाही..थकवाही येत नाही.याचं कारण सर्वच ठिकाणी पत्रकाराचं मिळत असलेलं अपार प्रेम हे आहे.ठिकठिकाणी पत्रकार ज्या आपलेपणाने मला भेटतात ते पाहून नवी उर्मी, नवी उर्जा मिळते.
चंदगडच्या पत्रकारांनी किमान चार-पाच वेळा फोन करून चंदगडला येण्याची विनंती केली होती.अंतर आणि अन्यत्र कार्यक्रम असल्यानं ते शक्य होत नव्हतं.मात्र नुकताच चंदगडला जाण्याचा योग आला.तेथील पत्रकारांनी अत्यंत आपुलकीनं आमचं सपत्नीक स्वागत केलं.मस्त गप्पा मारल्या.त्यांचे काही प्रश्न आहेत.त्यावर उपाय आणि तोडगे सांगितले.मजा आली.
औढा नागनाथ येथील मेळावा तर सर्वार्थानं ऐतिहासिक ठरला.सरकारनं छोटया वृत्तपत्रांचं नाक दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे.त्याविरोधात हा एल्गार मेळावा होता.सरकारी यंत्रणेला असं वाटत होतं की,पन्नास तरी पत्रकार औढ्याला येतील की,नाही..उपस्थिती आमच्याही अपेक्षपेक्षा जास्त होती.तीनशेवर मालक-संपादक मेळाव्यास उपस्थित होते.सरकारी यंत्रणेला ही चपराक होती.सरकारी धोरणाच्या विरोधात राज्यातील छोटया आणि मध्यम वृत्तपत्रांनी असहकार पुकारला तर सरकारची पळताभुर्ई थोडी होईल.निवडणुकांच्या वर्षात छोटया वृत्तपत्रांना डिवचण्याचा सरकारी निर्णय आत्मघातकी ठरणार हे उघड आहे.मेळाव्यानंतर सरकारनं योग्य तो बोध घेतल्याचं आणि नवीन धोरणातील जाचक अटी मागे घेण्याचं ठरविलं आहे असं समजतंय.त्यांनी तसं करावं..उगीच आगीची पंगा घेऊ नये.औढयाच्या पवित्र भूमितला हा मेळावा खरोखरच चळवळीला नवी चेतना देणारा,पत्रकारांमधील एकोपा वाढविणारा ठरला.नंदूभाऊ तोष्णीवाल आणि विजय दगडू यांना त्याबद्दल धन्यवाद द्यावे लागतील.
नांदेडचे दोन्ही कार्यक्रम अविस्मरणीय ठरले.जिल्हा अधिवेशन आणि जिल्हा कार्यालयाचं उद्दघाटनाच्या निमित्तानं नांदेडला गेलो होतो.नांदेडला काही काळ वास्तव्य होतं.1994 ला नांदेड सोडलं.त्या गोष्टीला पंचवीस वर्षे होत आलीत.मात्र नांदेडच्या पत्रकारांची तीच आपुलकी,तेच प्रेम,तोच विश्वास मला नांदेडच्या भेटीत पुन्हा बघायला मिळाला.खरं तर मला आवडत नाही.. तरीही नांदेडच्या मित्रांनी शहरात वीस होर्डिंग लावली होती.उद्याचा मराठवाडा या दैनिकानं माझ्या स्वागताची पानभर रंगीत जाहिरात प्रसिध्द केली होती.कार्यालयातही शेगाव अधिवेशनातला माझा भला मोठा फोटो लावला आहे.नांदेडमध्ये दिवसभर माझ्यावर स्वागताचा वर्षाव होत राहिला.जुने मित्र मुद्दाम भेटायला आले.हे सारं भारावून टाकणारं होतं.खरं तर मी एक छोटा पत्रकार..ज्यांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्या पत्रकारांना काही देण्याची माझी एैपत नाही..तरीही त्यांनी माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेलं हे प्रेम माझी उमेद वाढविणारं ठरलं आहे.प्रकाश,प्रदीप,विजय,रवी तुम्हाला धन्यवाद द्यायला माझ्याकडं शब्द नाहीत.हेच प्रेम कायम राहावं एवढीच अपेक्षा..
गंगाखेड हे मराठवाड्यातील दुर्लक्षित शहर असलं तरी येथील पत्रकार जागरूक आणि उपक्रमशील आहेत.लोकहितासाचे विविध उपक्रम राबवून जनतेशी आमची नाळ जुळलेली आहे हे ते सातत्यानं दाखवून देत असतात.केरळला पूर आलं.त्यानं गंगाखेडचे पत्रकार अस्वस्थ झाले.गावात फेरी काढून निधी जमा केला.तो निधी माझ्याहस्ते सरकारी यंत्रणेच्या सूपूर्त केला गेला.नांदेडहून यायला दोन तास उशीर झाला..तरीही सारेच माझी प्रतिक्षा करीत होते.गंगाखेडला आपलेपणानं जे स्वागत झालं,ते देखील मी विसरू शकत नाही.स्वामी आणि त्यांच्या मित्रांचे आभार..
मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन दर दोन वर्षांनी होतं.दोन हजार पत्रकार या अधिवेशनास उपस्थित असतात.मात्र तेथे थेट संवाद होत नाही.त्यामुळं प्रत्येक जिल्हा संघानं जिल्हयाचं अधिवेशन दरवर्षी घ्यावं अशी सूचना मराठी पत्रकार परिषदेनं केली आहे.रायगड,पुणे,अकोला,नांदेड आदि जिल्हयात अशी अधिवेशनं झाली.बीडचं अधिवेशन 20 सप्टेंबरला झालं.अधिवेशनासाठी साडेचारशे पत्रकार उपस्थित होते.ही उपस्थिती सत्तेला धडकी भरविणारी होती.दोन पत्रकार एकत्र येऊ शकत नाहीत असा समज करून बसलेल्या व्यवस्थेला या उपस्थितीनं नक्कीच मिर्च्च्या झोंबल्या असणार हे उघड आहे.पत्रकारांनी एकत्र येऊ नये असा प्रयत्न सातत्यानं होत असतो.मात्र राजकारणी आणि सत्ताधार्यांची ही कारस्थानं आता पत्रकारांना उमजली असून आपण एकत्र आलो नाहीत तर आपली खैर नाही याची जाणीव पत्रकारांना झाली आहे.पार्श्वभूमी या दैनिकाचं ‘पत्रकारांमध्ये परस्पर आपुलकी वाढविणारं अधिवेशन’ अशा शब्दात अंबाजोगाई अधिवेशनाचं वर्णन केलं आहे.मला हेच अपेक्षित आहे.पत्रकाराचं प्रश्न आज ना उद्या सुटतीलच.किंबहुना ते सरकारला सोडावावेच लागतील.आपली चळवळ आहे ती,परस्पर स्नेह,आपुलकी,एकी वाढविण्यासाठी..मी जेेथे जातो तेथे मला जो प्रतिसाद मिळतो ते बघता आम्ही आमच्या कामात यशस्वी झालो आहोत हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.मराठी पत्रकार परिषदेने हाक दिली की,पाचशे पत्रकार सहज जमा होतात.पाटणच्या मेळाव्यातली उपस्थिती देखील हेच दाखविणारी होती.व्यवस्थेच्याही हे लक्षात आलंय म्हणून तर मराठी पत्रकार परिषदेची ही चळवळ मोडून काढण्यासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करते आहे.मराठी पत्रकार परिषदेला टार्गेट करून नोटिसा पाठविल्या जात आहेत.त्यामागं आम्हाला भिती दाखविण्याचा प्रयत्न आहे मात्र असा धमक्यांना परिषद भीक घालणार नाही हे संबंधितांनी ध्यानात घेतलं पाहिजे.
पत्रकारांचे प्रश्न घेऊन गेली वीस-पंचवीस वर्षे लढतोय..या काळात गावाकडं लक्ष देता आलं नाही.गावातील राजकारणात न पडता सामाजिक उत्तरदायीत्व पार पाडण्याचा प्रयत्न मी आता करणार आहे.मध्यंतरी घेतलेला अडीचशे वृक्ष लावण्याचा कार्यक्रम असेल किंवा परवाचा नेत्र तपासणी शिबिराचा कार्यक्रम असेल याचाच भाग म्हणता येईल.जानेवारी सर्वरोग निदान शिबिर घेऊन किमान एक हजार रूग्णांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करणार आहे तुळशीराम राऊत,बाबासाहेब झाटे,लक्ष्मण झाटे,परमेश्वर राऊत,गोरख पैठणे या गावातील मित्रांच्या बळावर गावात लोकहिताच्या विविध चळवळी राबविण्याचा माझा प्रयत्न आहे,,येत्या काही दिवसात शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेणार आहे.
पत्रकारांचं प्रेम ही माझी उर्जा आहे.आजपर्यंत क्वचितच कोण्या पत्रकाराच्या वाटयाला आलं असेल एवढं पत्रकारांचे अभूतपूर्व प्रेम मला मिळालं.त्यादृष्टीनं मी भाग्यवान आहे..त्याबळावरच व्यक्तीगत अडचणींवर मात करीत मी पत्रकारांच्या हक्काची लढाई लढतो आहे.या कार्यात माझी पत्नी शोभना,आई-वडिल आणि मुलांची खंबीर साथ मला मिळते आहे.किंबहुना त्यांनी मला ‘पत्रकारांसाठी सोडलेलं’ असल्यानंच मी हे कार्य करू शकतो…हे मला मान्य करावेच लागेल
( एस एम देशमुख )