राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कर्जत मेळाव्यात पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात ‘2019 हे वर्ष राष्ट्रवादी कॉग्रेसचे आणि शरद पवारांचे आहे’ असं भाकित केलं होतं.ते पुढं जाऊन असंही बोलले होते की,’पवारांबद्दल .कार्यकर्ते जे स्वप्न पाहतात ते देखील यावर्षात पूर्ण होणार आहे’.शरद पवार यांनी आपल्या भाषणात ‘प्रफुल्ल पटेल यांनी हा विषय काढायला नको होता’ असं जरी म्हटलं असलं तरी शरद पवार याचं राजकारण जे ओळखून आहेत त्यांना हे नक्की माहिती आहे की,शरद पवारांच्या अनुमतीशिवाय प्रफुल्ल पटेल हा विषय काढू शकणार नाहीत.जे आपणास बोलता येत नाही ते सहकार्यांकडून वदवून घेण्याची पवारांची हातोटी आहे.प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यानंतर चर्चा अशी सुरू झाली की,’ज्या पक्षाकडं दोन आकडी खासदारही नाहीत त्या पक्षाचा नेता देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकेल” ?.लोकांच्या मनातला हा प्रश्न स्वतः शरद पवार यांनीही आपल्या भाषणात उद्घधृत केला होता.मात्र यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आणि पवार समर्थकांना असं वाटतं की,देवेगौडा ज्या परिस्थितीत पंतप्रधान झाले तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होईल आणि शरद पवार हे देशाचे पंतप्रधान होतील.खरंच तशी परिस्थिती निर्माण होईल काय ?
गुजरात निवडणुकांनी चित्र पालटलं..
गुजरात निवडणुकांच्या अगोदर स्वतः शरद पवार यांनाही असं वाटत नव्हतं.कारण प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या विजयाचा वारू चौफेर उधळताना दिसत होता.कॉग्रेसची परिस्थिती दारूण होत चालली होती.त्यामुळं 2019 मध्ये नरेंद्र मोदी आरामात बाजी मारतील असंच चित्र दिसत होतं.गुजरात निवडणुका आणि राजस्थानमधील पोटनिवडणुकांनंतर हे चित्र बदललं आहे.दोन्ही ठिकाणी राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉग्रेसनं चमकदार कामगिरी बजावल्यानं कॉग्रेसच्याच नव्हे तर देशातील तमाम विरोधी पक्षांच्या आशा पल्लवित झालेल्यात.त्यात शरद पवार देखील आहेतच.या दोन्ही निकालानंतर पुन्हा एकदा ‘विरोधी पक्षांना आपण एकत्र आलो तर भाजपला आव्हान देऊ शकतो’ याचा विश्वास वाटायला लागला आहे.त्यामुळंच दिल्लीतील विरोधी पक्षाच्या गोटातील हालचालींना वेग आलेला आहे..भाजपला मदत करणार्या घटक पक्षांतील वाढलेली नाराजी देखील विरोधकांचा आत्मविश्वास वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे.शिवसेना महाराष्ट्रात आणि दिल्लीत अजूनही भाजपबरोबर सत्तेत असली तरी या पक्षानं पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार जाहीर केलेला आहे.चंद्रबाबू नायडू यांनी ‘केंद्र सरकार आंध्रकडं दुर्लक्ष करीत असल्याचे’ कारण सांगत बंडाचं निशान फडकविलं आहे.अकाली दलही भाजपवर नाराज आहे.म्हणजे 2019 मध्ये हे सारे पक्ष भाजपबरोबर नसतील अशी परिस्थिती आहे . नितिशकुमार याचं राजकारण बघता ते ऐनेळी काय भूमिका घेतील हे कोणी सांगू शकत नाही.ममता बॅनर्जी भाजपच्या गळाला लागण्याची चिन्हे नसल्यानं विरोधी तंबूत आज तरी आनंदाचं वातावरण आहे.त्यामुळंच स्वतः शरद पवार आणि त्यांचा दिल्लीतील त्यांचा कॅम्प दिल्लीत अधिक सक्रीय झाल्याचं दिसतं आहे. मध्यंतरी दिल्लीत संविधान बचाव रॅलीचं आयोजन शरद पवार यांच्या सांगण्यावरून कऱण्यात आलं होतं.या रॅलीत शरद यादव,ओमर अब्दुल्ला,डी.राजा हे सारे नेते एकत्र आले होते.स्वतः सोनिया गांधी या रॅलीत सहभागी झाल्यानसल्या तरी महाराष्ट्रातील कॉग्रेसचे नेते या रॅलीत होते. रॅलीच्या निमित्तानं शरद पवार विरोधकांची मोट बांधत आहेत हे कॉग्रेसच्या नजरेतून सुटलं नाही.परिणामतः सोनिया गांधी लगेच सक्रीय झाल्या आणि आपल्या घरी विरोधकांची बैठक त्यांनी बोलाविली.आणि आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार नाही असे संकेत दिले.. शरद पवार यांनाही ते माहिती आहे.त्यामुळे शरद पवार यांनी आता कॉग्रेसलाही चुचकारायला सुरूवात केली आहे हे दुर्लश्रिता येणार नाही.काल पर्यंत राहूल गांधी हे पवारांसाठी पप्पूच होते.मात्र आता त्यांनी आपली भूमिका बदलली असून आपलं स्वप्न साकार करायचं तर कॉग्रेसला वगळून ते साकार होणार नाही हे ओळखून शरद पवार राहूल गांधी यांच्याशी देखील संवाद साधायला लागले आहेत.काल महाराष्ट्रात दोन्ही पक्षांच्या नेत्यांची झालेली बैठक आणि पुढील निवडणुका एकत्र लढविण्याच्यादृष्टीनं केलं गेलेलं मंथन देखील पवारांच्या ‘चलो दिल्ली’ कार्यक्रमाचा एक भाग आहे एक गोष्ट तर सगळेच जाणून आहेत की,पवारांनी राज्यात कॉग्रेसबरोबर युती केली नाही तर आज जी राष्ट्रवादीच्या खासदारांची संख्या आहे ती देखील उरणार नाही.अशा स्थितीत आपले पंतप्रधान होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊच शकणार नाही.म्हणून पवारांचा असा प्रयत्न असणार आहे की,राज्यातील समविचारी पक्षांना बरोबर घेऊन आपल्या खासदारांचा आकडा किमान दोन अंकी तरी झाला पाहिजे.कॉग्रेसबरोबर आघाडी केली तरच ते शक्य होणार आहे.त्यासाठी थोडं नमतं घेत ते कॉग्रेसच्या मनगटावर घडयाळ बांधणार आहेत.मागच्या वेळेस कॉग्रेसचे बहुतेक स्थानिक नेते असं म्हणायचे की,राष्ट्रवादीबरोबर युती नको..आज कॉग्रेसला देशातील सर्वच छोटया -मोठ्या पक्षांची मोट बांधूनच भाजपला टक्क्रर द्यायची असल्यानं ते देखील राष्ट्रवादीचा फार अंत न बघता त्यांनाबरोबर घेऊन निवडणुका लढवतील.म्हणजे गरज दोन्हीकडून आहे.
भाजप विरोधी वारे
देशातील जनमत ज्या गतीने भाजपच्या विरोधात जात आहे ते बघता आगामी काळात ज्या राज्यात निवडणुका होत आहेत तेथेङी भाजपला फटका बसणार आहे.मध्यप्रदेश,राजस्थान,छत्तीसगड,झारखंड या भाजपशासित प्रदेशातही भाजपच्या विरोधी वारे वाहात असल्याचे रिपोर्ट आहेत.कर्नाटक पुन्हा कॉग्रेस राखील असेही संकेत मिळत आहेत.असं झालं तर 2019 मध्ये भाजप 220 चा आकडा पार करू शकणार नाही असं राजकीय पंडितांना वाटतं.टाइम्स ऑफ इंडियानं एका वरिष्ठ कॉग्रेस नेत्याच्या हवाल्यानं असंच वृत्त दिलं आहे.देशातील जे विरोधी पक्ष आहेत ते आपआपल्या राज्यातील आपलं स्थान कायम ठेवतील.तृणमूलचा प्रभाव पश्चिम बंगालमध्ये कायम असणार आहे.चंद्राबाबू आपला गढ राखतील,महाराष्ट्रात शिवसेना स्वतंत्र लढणार असल्यानं कॉग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून चमकदार कामगिरी बजावतील.उत्तर प्रदेशची राजनीती बघता भाजपला तेथेही एकतर्फी कौल मिळणार नाही.त्यामुळं विरोधकांबरोबरच कॉग्रेसच्या जागा वाढतील.कॉग्रेस 125 जागांपर्यत वाढले आणि अन्य घटक पक्ष 160-180 पर्यंत मजल मारू शकले तर आपोआपच शरद पवार यांचे महत्व वाढू शकते.शरद पवार यांची हीच रणनीती आहे किंवा असावी. अशा वातावरणात देेवेगोंडाच्या धर्तीवर सहमतीचे उमेदवार म्हणून शरद पवार पुढे येऊ शकतात असे पवार समर्थकांना वाटते.
मात्र खरंच हे सारं एवढं सोपंय का ? देवेगौडांच्या नावावर सहमती झाली होती..कारण ज्यांनी सहमती दर्शविली होती अशा सर्वच नेत्यांना ‘पंतप्रधान म्हणून गुळाचा गणपती बसवायचा होता’.रबरी स्टॅम्प पीएम होऊ शकेल असा नेता त्यांना हवा होता.ते कर्तबगार,लोकप्रिय नाहीत आणि लोकनेतेही नाहीत हे देवेगौडा यांच खरं कॉलिफिकेशन होतं.देवेगौडा यांच्यामुळं आपल्या अस्तित्वाला आणि स्थानाला कसलाही धोका नाही हे सारे नेते ओळखून असल्यानं त्यांच्या नावाला सर्वांनी होकार दिला होता.कोणतीही महत्वाकांक्षा नसलेला पीएम ही तेव्हाच्या नेत्यांची गरज होती.देवेगौडा यांच्या रूपानं ती पूर्ण झाली.शरद पवारांच्या बाबतीत असं नाही.ते जनाधार असलेले,डावपेचात मुरलेले,प्रचंड महत्वाकांक्षा असलेले नेते आहेत.ही पवारांच्या नावावर एकमत न होऊ शकण्याची काही कारणं आहेत.शिवाय विश्वासार्हता ही देखील मोठीच समस्या आहे.शरद पवार कोणत्याही वेळी काहीही करू शकतात हे सर्व नेत्यांना माहिती असल्यानं त्यांच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार होणार नाही.सोनिया गांधींना आज गरज असली तरी सोनिया गांधींना अडचणीत टाकून ते पक्षातून निघून गेले होते हे शल्य त्या विसरल्या नाहीत.त्यांच्या परकीयत्वाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार यांनी देशात उठविलेलं काहूर आणि त्यातून सोनिया गांधी यांना झालेला मनःस्तापही त्या विसरल्या असण्याची शक्यता नाही.त्यामुळं शक्यता अशीय की,सोनिया गांधी एकवेळ भाजप सत्तेवर आला तरी ते स्वीकारतील पण शरद पवारांना रोखण्याचा शर्थीनं प्रयत्न करतील यात शंकाच नाही.
पवारांचे सर्व ऑप्शन खुले असतील..
नरेंद्र मोदींबरोबर शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत.त्याची धास्ती विरोधकांना वाटते. समजा उद्या भाजपला 220 च्या आसपास जागा मिळाल्या आणि बहुमतासाठी त्यांना बाहेरच्या मदतीची गरज भासली तर शरद पवार मोदींच्या मदतीला धाऊन जावू शकतात. ही भिती निराधार नाही.महाराष्ट्रात विधानसभेचे निकाल जाहीर होत असताना भाजप बहुमताच्या दिशेने घौडदौड करीत होती त्यावेळेस न मागता राष्ट्रवादीने एकतर्फी भाजपकडं मदतीचा हात पुढं केला होता.तो प्रसंग विरोधी पक्ष नेते आणि देशही विसरलेला नाही.तेव्हा उद्या मोदींना गरज भासली तर शरद पवार त्यांच्याकडंही मदतीचा हात पुढं पुढं करणारच नाहीत अशी खात्री कोणी देऊ शकत नाही..कॉग्रेसबरोबर निवडणुका लढवून नंतर भाजपकडं मदतीचा हात पुढं करतानाही शरद पवार कचरणार नाहीत अशी रास्त भितीही अनेक वरिष्ठ नेत्यांच्या मनात आहे. . सोनिया गांधी असतील किंवा विरोधी पक्षातील अन्य नेते असतील..त्यांना पवारांचं हे राजकारण चांगलं ठाऊक आहे म्हणूनच ते पवारांच्या बाबतीत कमालीचे सावध असतात.पुढंही राहतील.म्हणूनच परिस्थिती कशीही निर्माण झाली तरी शरद पवार हे देवेगौडा होऊ शकणार नाहीत हे नक्की.शरद पवार यांच्या स्वप्नांना टाचणी लावायला प्रकाश आंबेडकरांनी सुरूवात केलीच आहे.जर तरच्या भाषेत पवारांची पोलखोल करण्याचा इशाराच आंबेडकरांनी दिला आहे.इतरही अनेक टपून बसलेले आहेत.तेव्हा 2019 मध्ये भलेही पवारांचे महत्व वाढेल पण प्रफुल्लभाई म्हणतात ‘तो चमत्कार’ घडण्याची शक्यता आजच्या घडीला तरी बहुतेक राजकीय पंडितांना वाटत नाही.अर्थात या सार्या नकारात्मक बाबींचा विचार करून स्वस्थ बसणार्यांपैकी पवार नाहीत.ते आपल्या पध्दतीनं राजकारण करीत जास्तीत जास्त लाभ कसे पदरात पाडून घेता येतील याचा प्रयत्न करतील.आणि निवडणुकानंतर आपले सर्व ऑप्शन खुले आहेत असं सांगत सोयीचं राजकारण करतील यात शंका नाही.
एस.एम.देशमुख