पत्रकार हल्लाविरोधी कायदा
याच अधिवेशनात – मुख्यमंत्री
मुंबई, दि १ – दिवसेंदिवस पत्रकारांवरील वाढते हल्ले थांबविण्यासाठी आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करता यावी, यासाठी प्रस्तावित असलेल्या पत्रकार हल्लाविरोधी कायद्याचे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत हे आश्वासन दिले.
पत्रकार हल्लाविरोधी कृती समिति,मराठी पत्रकार परिषद, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे पदाधिकारी आणि वृत्तवाहिन्याचे (टी व्ही) प्रतिनिधी यांनी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हा कायदा लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे विधेयक याच अधिवेशनात मांडण्याचे संकेत दिले होते.
भाजपाचे सदस्य आशिष शेलार यांनी आज पत्रकारांवरील हल्ल्याचा उल्लेख करून पत्रकारांच्या सुरक्षेविषयी विधानसभेत चिंता व्यक्त केली होती. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे संजय दत्त, राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे ,प्रकाश गजभिये आणि शिवसेनेच्या डाँ निलम गोर्हे यांनीही परिषद सभागृहात पत्रकारांवरील हल्ल्यांसंदर्भात चिंता व्यक्त करून कायदा करण्याची मागणी केली होती.
आशिष शेलार यांच्या मागणीला प्रतिसाद देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पत्रकारांवरील हल्ल्यासंदर्भातील विधेयकाचा मसुदा तयार असून हे विधेयक याच अधिवेशनात मांडले जाईल.
मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या विद्यमान कार्यकारिणीने याच काळात बैठक घेऊन पत्रकार हल्लाविरोधी कायद्यात उपयुक्त सुधारणा सुचवून शासनाला सादर केल्या आहेत.
पत्रकार संरक्षण कायद्याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत.तसेच हा प्रश्न उपस्थित करून विषयाला पुन्हा वाचा फोडल्याबद्दल आ.आशिष शेलार,डॉ.निलमताई गोर्हे,धनंजय मुंडे,आ.संजय दत्त,निरंजन डावखरे ,प्रकाश गजभिये यांचे आभार मानले आङेत. हे विधेयक याच अधिवेशनात मंजूर व्हावे, अशी अपेक्षा आहे.मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात दोन वेळा पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक सभागृहात मांडण्याचं आश्वासन दिल्यानं अधिवेशनाच्या शेवटच्या आठवडयात विधेयक येईल अशी अपेक्षा आहे.