मोहोर येण्याच्या सुमारासच नोव्हेंबरमध्ये ओखी वादळाचा बसलेला तडाखा आणि गेली आठ दिवस रायगडात असलेले ढगाळ वातावरण,धुके आणि अवेळी पावसाचा मोठा फटका यंदा हापूसला बसला आहे .त्यामुळे उत्पादनात तब्बल ७० टक्के घट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.वातावरण पूरक असेल तर पाडव्याला मोठ्या प्रमाणात हापूस बाजारात येत असतो.मात्र यंदा नवी मुंबईच्या बाजारात दरवर्षीच्या तुलनेत आवक तब्बल 20 ते 30 हजार पेटयांनी घटली आहे.पुढील काळातही आवक लगेच वाढेल अशी स्थिती नाही.असे झाले तर यंदा हापूसची चव सामांन्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
ओखीमुळं मोठ्या प्रमाणात मोहोर गळून पडला होता.नव्याने पालवी फुटणे आणि पुन्हा मोहोर येणे आणि फळधारणा होणे याला पुढील तीन महिने लागले.विलंबाने आलेली फळं तोडणीला आलेली असताना आता ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळं पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी पिकावर करपा आणि तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकरी सांगतात.या सार्याचा मोठा फटका आंबा पिकाला बसला असून आंबा उत्पादक शेतकर्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.त्यामुळं आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कोकणात आंबा पिकाकडे पाहिले जाते मात्र गेली काही वर्षे सातत्यानं नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत असल्याने आंबा उत्पादक जेरीस आले आहेत.
शोभना देशमुख