राणे-राष्ट्रवादीचा हा राडा संपावा यासाठी आज सावंतवाडीत आणि रत्नागिरीत बैठकी ठेवण्यात आल्या होत्या. पण त्यातून काही निष्पन्न झाले नसल्याचे कळत आहे. सावंतवाडीत कोअर समितीच्या झालेल्या बैठकीत कोणताही समेट झालेला नाही. त्यामुळे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात उतरणार नसल्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे स्पष्ट होत आहे. तर, दुसरीकडे रत्नागिरीमध्ये काँग्रेस भवन येथे झालेल्या सभेत तर प्रचंड वादावादी झाल्याचे कळते आहे. राणे-राष्ट्रवादीतल्या या संघर्षात एका कार्यकर्त्याने काही विधाने केली. त्यावरून वाद पेटला आणि संघर्ष हातघाईवर गेला असे सुत्रांकडून समजते. नारायण राणे यांनी राष्ट्रवादीला सतत पाण्यात पाहिले आहे, आम्हाला दिलेला कुठलाही शब्द पाळलेला नाही, असा संताप राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला होता. त्यातूनच काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचा राजीनामाही सोपवला होता. दरम्यान, या प्रकरणात आता थेट शरद पवार मध्यस्थी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आपण पवार साहेबांचे स्वागत करू, पण प्रचारात उतरणार नाही असे सांगत आहेत. त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.