उमेदवार ‘ऑनलाईन’,महामंडळ मात्र अजूनही ‘ऑफलाईन’च का ?

0
1189

91 वे अखिल भारतीय साहित्य समेंलन बडोदा येथे होत आहे.या संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.लेखक राजन खान,माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख,लेखक व अनुवादक रवींद्र गुर्जर,रवींद्र शोभणे आणि डॉ.किशोर सानप हे उमेदवार मैदानात आहेत.बातमी अशी आहे की,या सर्वच उमेदवारांनी आपला प्रचार ऑनलाईन पध्दतीनं आणि सोशल मडियाचा वापर करीत सुरू केलेला आहे.प्रश्‍न असा आहे की,उमेदवार जर ऑनलाईन आणि हायटेक होऊ शकत असतील तर महामंडळ असा प्रयत्न कधी करणार आहे ? की महामंडळाची तशी इच्छाच नाही ?.महामंडळाची सध्याची निवडणूक पध्दती अत्यंत खर्चीक,वेळखाऊ,संशयाला जागा असणारी आणि अनेक सदस्यांना मतदानपासून वंचित ठेवणारी  आहे.अशा परिस्थितीत ऑनलाईन पध्दतीनं मतदान घेतले गेले तर ते कमी खर्चात,कालापव्यय टाळणारे,आणि सर्व सदस्यांना मतदानाचा हक्क देणारे ठरणारे आहे.मराठी पत्रकार परिषदेची पूर्वी अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या   पध्दतीचीच निवडणूक व्यवस्था होती.महाराष्ट्रात पसरलेल्या आठ हजार पत्रकारांना बॅलेट पेपर पोस्टानं पाठवायचे,त्यावर मतदान करून ते सदस्य परत पाकिटं पाठवायाचे यासाठीचा खर्च प्रचंड होता.त्यात पाकिटं पळविण्यापासून अनेक ‘करामती’ व्हायच्या.त्यामुळं परिषदेने नागपूर येथे झालेल्या विशेष साधारण सभेत निवडणूक ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेतला.प्रयोग म्हणून पुणे जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक घेतली गेली.ती यशस्वी झाली.सर्व्हरमुळे लिंक ओपन व्हायला,पासवर्डचे एसएमएस पोहोचायला थोडा वेळ लागला हे खेर आहे मात्र या पध्दतीतील जेे तांत्रिक दोष दिसले ते दूर करता येऊ शकतात.  यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की, ही पद्धत  निदोष,अत्यंत पारदर्शक,कमी खर्चात निवडणूक घेता येऊ शकेल अशी आहे .अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 1070 सदस्य असल्याने क्षमतेचं सर्व्हर बसविले आणि थोडं नियोजन व्यवस्थित केलं तर निवडणूक ऑनलाईन होऊ शकेल.अर्थात त्यासाठी महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची मानसिकता महत्वाची आहे.ऑनलाईन पध्दतीनं जवळपास शंभर टक्के मतदान होते आणि अशा स्थितीत कोण अध्यक्ष होईल ते सांगता येत नाही हे अनेकदा गैरसोयीचे असते त्यातून आहे तेच बरंय असा एक सूर व्यक्त होतो.मात्र आहे त्या पध्दतीबद्दल अनेकदा मोठ्या प्रमाणात तक्रारी झालेल्या आहेत.त्याला उतारा म्हणून ऑनलाईन पध्दतीनं निवडणूक घेतली तर ती अधिक उचित पध्दत ठरेल.महामंडळानं याचा जरूर विचार करावा.काळानुरूप सर्वांनाच बदलावे लागते.महामंडळाला हा बदल स्वीकारणार का हा प्रश्न आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here