सांगली:प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ 15 ऑगस्टपूर्वी स्थापन करू अशी घोषणा राज्याचे कामगार मंत्री संभाजी पाटिल निलंगकेर यांनी केली. महाराष्ट्रातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याबाबत शिवसेना नेते, उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्याचे कामगारमंत्री श्री. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, संघटन सचिव संजय पावसे, सदा नंदूर, मनोहर परब उपस्थित होते.राज्य विक्रेता संघटनेने दिलेल्या प्रस्तावातील सर्व योजनांचा सहभाग कल्याणकारी मंडळात करण्याचेही मान्य करण्यात आले.
राज्यातील 122 उद्योग व व्यवसायातील असंघटीत क्षेत्रात 3.65 कोटी कामगार कार्यरत आहेत. अशा कामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना आर्थिक व सामाजिक दृष्टया सक्षम करण्यासाठी युती शासनाने पुढाकार घेतला आहे आणि याकरीताच गेली 100 वर्षे मुंबई शहरासह इतर जिल्हयात कार्यरत असलेल्या आणि अथक कष्ट करून सर्वदूर गावात वेळेत वृत्तपत्र पोहचविणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना यांचा लाभ मिळावा म्हणून आज दि. 19 जुलै 2017 रोजी बैठक आयोजित केली होती.
मंत्री श्री देसाई यावेळी म्हणाले, वृत्तपत्रे व वाचक यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून वृत्तपत्र विक्रेते काम करतात. ऊन, वारा, पाऊस, सुख, दुःख विसरून हे विक्रेते वेळेत वृत्तपत्र पोहचवण्याचे काम करतात. मात्र हे विक्रेते सतत दुर्लक्षीत राहीले आहेत. त्यांना न्याय द्यावाच लागेल अशी ठाम बाजू बैठकीत मांडली. सुनिल पाटणकर यांनी वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे स्वरूप, विक्रेत्यांच्या मागण्या सविस्तर मांडल्या. राज्यात साडेतीन लाख वृत्तपत्र विक्रेते कार्यरत आहे. वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाचे स्वरूपाबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यांचे प्रश्न तातडीने सोडवावेत. बालाजी पवार यांनी वृत्तपत्र विक्रेते, कुटुंबिय यांचेकरीता घरकुल, आरोग्य, शिक्षण आदी कल्याणकारी योजना राबवाव्यात अशी मागणी केली. विकास सूर्यवंशी म्हणाले, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्रच कल्याणकारी मंडळ असावे. कल्याणकारी मंडळाचे लाभासाठी नाव नोंदणी करताना वृत्तपत्र विक्रेता संघटनेची शिफारस आवश्यक असावी अशी सुचना गोरख भिलारे यांनी मांडली.
यावेळी राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ 15 ऑगस्टपूर्वी कार्यरत होईल अशी घोषण राज्याचे कामगारमंत्री मा.श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केली. 122 प्रकारच्या असंघटीत कामगारांकरीता एकत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. मात्र त्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी खास व भक्कम स्थान असेल. विक्रेत्यांना अधिक प्राधान्य देण्यात येईल. विक्रेता संघटनेने त्यासाठी तात्काळ आपल्या प्रत्येक शहर व जिल्हयातील वृत्तपत्र विक्रेत्यांची‘आधार कार्डद्वारे’ नोदंणी पूर्ण करावी. त्यामुळे कल्याणकारी मंडळाचा लाभ तात्काळ मिळण्यास मदत होईल असेही श्री.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, कार्याध्यक्ष सुनिल पाटणकर, सरचिटणीस बालाजी पवार, कोषाध्यक्ष गोरख भिलारे, उपाध्यक्ष विलास सूर्यवंशी, संघटन सचिव संजय पावसे, संचालक सदा नंदूर, विकास आयुक्त(विकास) पंकजकुमार, स.कामगार आयुक्त सुनिता म्हैसकर,जाॅ.सेक्रेटरी ए.पी. विधले, उपस्थित होते. मंत्री महोदयांना मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.