देणार्‍यांचे हात हजारो..

0
1459

दिवंगत पत्रकाराच्या कुटुंबियांना 6 लाखांची मदत

त्रकारांच्या हक्कासाठी लढे उभारणे,पुरस्कार देणे,कार्यक्रमांचे आयोजन करणे ही तर पत्रकार संघटनांची कार्य आहेतच पण त्याचबरोबर एखादा पत्रकार जर अडचणीत असेल,कोणत्याही कारणांनी त्याचं कुटुंब संकटात सापडलं असेल तर बंधुत्वाच्या भावनेतून संबंधित कुटुंबाला मदत करणं हे देखील पत्रकार संघटनेचं कार्य आहे याचा वस्तुपाठ आज मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सातारा जिल्हा पत्रकार संघानं घालून दिला आहे.सातारा जिल्हयातील खटाव येथील पुढारीचे पत्रकार अरूण देशमुख याचं ह्रदयाविकारानं निधन झालं.सर्वसामांन्य कुटुंबातील अरूण गेल्यानंतर स्वाभाविकपणे कुटुंब हवालदिल झालं.अरूणची एक मुलगी पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतेय,मुलगा पाचवीत आहे,अरुण गेल्याने या मुलांच्या शिक्षणाचं काय होणार ? हा प्रश्‍न देखील उभा राहिला.कारण घरातला  कर्ता पुरूषच गेल्यानं सारंच होत्याचं नव्हतं झालं होतं.सर्वाशी प्रेमाचे ,सलोख्याचे संबंध असलेल्या अरूणच्या जाण्यानं सातारा जिल्हयातील सारेच पत्रकार अस्वस्थ झाले.यातून अरूणच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे असा विचार समोर आला .त्यासाठी हरीश पाटणे यांनी पुढाकार घेतला ,त्याना अन्य पत्रकारांनी सहकार्य केले  आणि बघता बघता साडेपाच लाख रूपयांचा निधी जमा झाला.हा निधी अत्यंत  आपुलकीच्या भावनेनं,कृतज्ञता पूर्वक  आज माझ्या हस्ते अरूणच्या वृध्द वडिलांच्या आणि मुलीच्या स्वाधिन करण्यात आला.हा सर्व कार्यक्रमच कमालीचा ह्रदयस्पर्शी झाला.अरूणच्या आठवणी आणि देशमुख कुटुंबियांवर आलेली वेळ यामुळं माझ्यासह सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते.भाऊक झालेल्या वातावरणात काय बोलावं हे देखील मला कळत नव्हतं.?मात्र आजच्या कार्यक्रमामुळं एक संदेश दिला गेला,महाराष्ट्रातील कोणताही पत्रकार कोणत्याही कारणानं अडचणीत आला तर तो एकटा नाही तर महाराष्ट्रातील तमाम पत्रकार त्याच्या किंवा त्यांच्या कुटुबियांच्या पाठिशी आहेत.कारण  गेल्या दीड वर्षात राज्यात विविध कारणानी  अडचणीत आलेल्या चौदा पत्रकारांना मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने  किंवा परिषदेशी संलग्न विविध जिल्हा संघांच्यावतीने

गरजू पत्रकाराना  मदत केलेली आहेत.नगरच्या एका पत्रकाराला पाय बसवून देण्यासाठी मदत केली,परभणीच्या एका पत्रकाराला ब्लड कॅन्सर झाला होता त्याच्यावरील उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली,सोलापूरचा एक पत्रकार अपघातात जखमी झाला त्यांच्यावरील उपचारासाठी मदत केली गेली,बीड जिल्हयातील एका पत्रकाराला मानसिक आजारावरील उपचारासाठी मदत केली गेली,रायगडच्या एका पत्रकाराचं अचानक निधन झालं त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था नागपूर येथील एका एनजीओच्या माध्यमातून पुण्यात केली गेली.इतरही काही पत्रकारांना शक्य ती मदत केली.आज अरूणच्या कुटुंबियांनाही आम्ही तुमच्याबरोबर आहोत ही जाणीव  दिली आहे.हे सारं फक्त आम्हीच करतो आहोत असंही नाही आपण सुरू केलेल्या चळवळीमुळं राज्यातील वेळवेगळ्या जिल्हयात पत्रकार अडचणीत असेल तर तेथील  पत्रकार समोर येताहेत आणि त्याला मदत करताहेत.मला वाटतं परस्पर सहकार्याची,मदतीची पत्रकारांमध्ये निर्माण झालेली ही जाणीव हे पत्रकार चळवळीचं यश आहे.अरूण देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याचे वचन अजित पवार यांनी दिलं आहे.जिल्हयातील इतरही दाणशूर व्यक्तींनी या सत्तकार्यासाठी मदत केली आहे.एका एजन्सीनं अरूणच्या कुटुंबियांना पिठाची गिरणी आज दिली आहे.ज्यांनी ज्यांनी मदत केली अशा सर्वांचा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने मी आभार व्यक्त करतो.

महाराष्ट्र सरकारची शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी आहे.मात्र या योजनेतील जटील अटींमुळं आतापर्यंत गेल्या सात-आठ वर्षात केवळ शंभर पत्रकारांनाच मदत दिली गेली.अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच या योजनेतुन मदत दिली जाते.शिवाय काही आजाारांसाठीच ही मदत दिली जाते.म्हणजे तीन ते चार टक्के पत्रकारांनाच या योजनेचा लाभ होतोय.केंद्र सरकारच्या योजनेची एक तर माहितीच कुणाला नाही ज्यांना आहे त्यांनाही ही मदत मिळत नाही.अशा स्थितीत पत्रकार आणि पत्रकार संघटनांनाच एकत्र येत सरकारी योजनेवर अवलंबून न राहता गरजू पत्रकारांना मदत करण्याची भूमिका घ्यावी लागेल.तसे प्रयत्न महाराष्ट्रात होताना दिसताहेत ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे.सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघानं यापुर्वी देखील एका पत्रकाराचं निधन झालं तेव्हा साडेतीन लाख रूपयांची मदत त्या पत्रकारांच्या कुटुंबियांना केली होती.आज साडेपाच लाख रूपये अरूणच्या कुटुंबियांना मदत दिली गेली आहे.राज्यात आतापर्यंतची ही सर्वाधिक मदत आहे.त्याबद्दल सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,कार्याध्यक्ष शरद काटकर आणि त्यांच्या सर्व सहकार्‍यांना धन्यवाद.पत्रकारांवर अशी वेळ येऊ नये यासाठी राज्यात ठिकठिकाणी पत्रकार आरोग्या तपासणी शिबिरं घेतली जात आहेत.सातार्‍यातही आज आरोग्या तपासणी शिबिर घेतलं गेले.त्यात साडेचारशे पत्रकारांची आरोग्य तपासणी केली गेली.

 एका चांगल्या कार्यक्रमास मला उपस्थित राहता आलं याचा आनंद नक्कीच मला आहे.( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here