संतांची भूमी उजाड होतेय,,,
गारपीटीनं मराठवाड्याचं कंबरडं मोडलंय
तुफान वादळ,जोरदार पाऊस आणि गारांचा जीवघेणाम मारा होत असताना मी मराठवाड्यात होतो.गारांचा मारा मराठवाडयाला नवा नसला तरी गेल्या आठ-दहा वर्षात अशा गारांचा मारा झालेला नव्हता.जेव्हा या गारा पडायच्या तेव्हाही त्या फेब्रुवारी -मार्चमध्ये पडायच्या नाहीत.त्या एप्रिल- मे मध्ये पडायच्या.एप्रिलपर्यथ रब्बीची सुगी संपलेली असते त्यामुळे गारा पडल्या तरी त्याचा पिकांना त्रास व्हायचा नाही.यंदा रब्बीची सुगी ऐन झोकात असतानाच गारा,वारा,आणि पाऊस झाला.त्यानं मराठवाड्यातील सुगी होत्याची नव्हती झाली.ज्वारी,गगू,हरभरा याशिवाय फळ बागायतीचं अतोनात नुकसान झालं.माझ्या स्वतःच्या शेतातला चार एकर गहू झोपी गेला.आई सांगत होती,असा गहू यापूर्वी कधी आला नव्हता.तूरही भन्नाट आलेली होती.ती काढली होती पण तिचं खळॅं करायचं राहिलं होतं.शेतात पडलेल्या तुरीवर सतत चार -सहा दिवस पावसाचा मारा होत होत होता.ही स्थिती साऱ्याच शेतकऱ्यांची .मराठवाड्यातील एकही जिल्हा गारपिटीनं सोडला नाही.बीड पुरतंच सांगायचं तर जिल्हयातील सारेच तालुके चुन चुन के मारो अशा पध्दतीनं मारले गेले.म्हणजे आज धारूर,केज- उध्या वडवणी बीड,परवा,परळी-म ाजलगाव,आणखी एका दिवशी गेवराई म्हणजे निसर्गाच्या फटक्यातून कोणीच सुटलं नाही.गेवराईत आमचे एक पाव्हणे आहेत.पोरगा बीएससी ऍग्री झाला त्यानं आधुनिक शेती सुरू केली.सहा एकर पपई लावली.पावसामुळं त्यानं पपई काढली.व्यापारी येणार म्हणून पपई ताडून ठेवली.त्या दिवशी व्यापारी काही आला नाही.आल्या त्या गारा.एका एका पपईला गारांच्या फटक्यानं वीस वीस छिद्र पडली.
धारूरला तर 100 गॅ्रम वजनाच्या गारांपासून 500 ग्राम वजनाच्या गारा पडल्या.गोफणीचा गुंडा यावा अशा गारा येत.त्यानं झाडांना पानं उरली नाहीत.झाडावरील पक्षी राहिले नाही.अंगणात ठेवलेल्या अनेक गाड्यांची काचं फुटली काही गाड्याच्या टपाच्या चिंधड्या उडाल्या.माणसं मेली.माझ्याच गावापासून तीन किलो मीटर अंतरावर पिंपरखेड नावाचं गाव आहे.वीज पडून तिथं एक महिला जागीच ठार झाली.अन्य तिेघे अत्यवस्थ आहेत.हे शेतकरी कुटुंब आभाळ आलंय म्ङणून गाडीतून घरी येत असताना मध्येच त्यांच्या अंगावर वीज कोसळली.गावातले लोक सांगतात कानठळी बसविणारा आवाज झाला.वीज पडली म्हणजे काय होत याचा अनुभव गावकऱ्यानी घेतला.
जे घडलं ते सारं वर्णनापलिकडंचं आहे.मराठवाड्यावर अशी नैसर्गिक संकंटं वारंवार का येतात याचा आतातरी विचार होणार आहे की नाही हा खरा प्रश्न आहे.कधी भूकंप,कधी अतिवृष्टी,कधी गारपीट दुष्काळ तर मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला आङे.निसर्गाचा प्रकोप म्हणून या साऱ्या घटनांकडे बघता येणार नाही.कुठं तरी,काही तरी चुकतंय हे नक्की.नेमकं काय चुकतंय याचा अभ्यास तत्ज्ञांनी करण्याची गरज आहे.जे कधी कुणी पाहिलं नाही,जे कधी घडलं नाही अशा घटना घडत असतील तर मग निसर्गाचं चक्र कुठं तरी बिघडलंय हे वेगळं सांगण्याची गरज नाही.त्यावर गंभीरपणे विचार झाला नाही तर मराठवाड्याचा वाळवंट व्हायला वेळ लागला नाही.नुकसान भरपाईची मलमपट्टी हा तात्पुरता उपचार आहे.तो पुरेशाही नाही.माझ्यापुरतंच सांगायचं तर माझी जवळपास दोन लाखांची तूर वाया गेली.चार एकरातील छान आलेले गहू झोपला.त्याचं नुकसान किती झालं हे सांगता येत नाही.तलाठी आता पंचनामे वगैरे करायला गेलाय.पण माझं जवळपास पाच लाखांचं नुकसान झालं असेल तर सरकार दहा वीस हजार देऊन माझी बोळवण करणार.त्यानं काय होणार.माझ्यासारखंच अनेक शेतकऱ्यांचं वर्षाचं गणित आता कोलमडून पडणार आहे.आता निवडणुका असल्यानं आश्वासनं ,भेटी-गाठी वगैरे होतच राहणार आहे.मला वाटतं यापेक्षाही मराठवाडयातील बदलत चाललेल्या हवामानाच येथील भूगर्भाचा सखोल अभ्यास करण्याची गरज आहे.गार पिट झाली,ुदुष्काळ आला की,निसर्गाचा प्रकोप म्हणून शेतकऱ्यांना दैवाधिन कऱण्यासारखी परिस्थिती आज नाही.प्रकोप म्हणत शेतकऱ्यांच्या तोंडावर नुकसान भरपाईचे हजार-पाचशे रूपये मारल्यानेही आता काही होणार नाही.कारण त्यातून जे कारभारी आहेत त्याना फार तर आपण रयतेसाठी काही करतो आहोत याचं तात्कालिक समाधान घेता येईल पण त्यातून उजाड होत चाललेला मराठवाडा वाचणार नाही.मराठवाडा ही संतांची भूमी आहे.कष्टकऱ्यांची भूमी आहे,ती उजाड होत असेल तर ती वाचविण्याचं उत्तरदायित्व सरकारचं आहे.सरकार त्याकडं दुर्लक्ष करीत चाललंय.त्यानं मराठवाड्यतील माणून न माणून हवालदिल आहे.चार दिवस मी माझ्या देवडी गावात होतो.गारपिटीचीच चर्चा.तुझं किती नुकसानं झालं,माझं किती नुकसानं झालं हे प्रश्न परस्पराना विचारणे एवढंाच विषय आहे.निडवणुकांचे ढोल सध्या वाजताहेत त्याची कोणी चर्चा करीत नाही.राजकाऱण साऱ्यांचाच आवडता विषय असला तरी आज सारंच होत्याचं नव्हतं झाल्यानं राजकारणावर चर्चा कऱण्याचं बळ आता कोणालाच नाही.प्रत्येकाला आजचीच काळजी आहे.सरकारनं या साऱ्या प्रदेशाकडं थोडं सहानुभूतीनं पाहिलं नाही तर यापुढं मराठवाडयातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याशिवाय राहणार नाही.