उरण ते अलिबाग दरम्यानच्या करंजा-रेवस खाडीवर पूल व्हावा याकरिता १९८० पासून राज्य सरकारचे प्रयत्न सुरू असून राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर. अंतुले यांनी तशी घोषणाही केली होती. मात्र मागील ३५ वर्षांत त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या संदर्भात महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड व एमएमआरडीए यांच्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू असून, दोन किलोमीटर अंतराच्या या पुलासाठी सव्र्हेही करण्यात आला आहे. या पुलाची सुरुवात लवकरच होईल त्यासाठी बेल्जीयमच्या कंपनीला सव्र्हेचे काम देण्यात आले असून, पुढील तीन महिन्यांत त्याचा अहवाल येणार आहे. ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेवस-करंजा पुलाच्या उभारणीची उरणकरांना आशा निर्माण झाली आहे.
रायगड जिल्ह्य़ातील उरण व अलिबाग हे दोन्ही तालुके जिल्ह्य़ाची दोन टोके आहेत. या दोन तालुक्यापैकी अलिबाग तालुका हा रायगडची राजधानी आहे. या दोन्ही तालुक्यामध्ये रस्त्यामार्गे दोन ते अडीच तासाचे ७० किलोमीटरचे अंतर आहे. तर जलमार्गाने केवळ पंधरा मिनिटांचे रेवस ते करंजा अंतर आहे.
या दोन्ही प्रवासांपैकी एका प्रवासात वेळ आणि पैसा जादा गमवावा लागतो. तर दुसऱ्या प्रवासात समुद्राच्या लहरीपणाचा धोका पत्करून प्रवास करावा लागतो.
त्यामुळे या खाडीवर पूल उभारण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. एमएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या या पुलाची एकूण लांबी दोन किलोमीटर अंतराची आहे. तर एक किलोमीटर पुलाला जोडणारा रस्ता असणार आहे. या पुलाकरिता साधारणत ३०० कोटी रुपयांचा खर्च आपेक्षित आहे. पुलाच्या उभारणीमुळे या परिसरात येऊ घातलेल्या बंदरांच्या विकासाला अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेत पुलाखालून मालवाहू जाहजे जाऊ शकतील इतक्या उंचीचा पूल बनविण्याचा प्रस्ताव आहे.
हा पूल झाल्यास उरणवरून अलिबागला अवघ्या तासभरात पोहोचता येणार आहे. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्य़ातील मुरूड, श्रीवर्धन आदी ठिकाणच्या पर्यटनस्थळांवर जाण्याचेही अंतर कमी होणार आहे.
तसेच भविष्यात होऊ घातलेल्या न्हावा-शिवडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग अंतरही कमी होणार आहे. या संदर्भात एमएमआरडीएचे मुख्य अभियंता एस. बी. तामसेकर यांच्याशी संपर्क साधला असता, पुलाच्या डीपीचे काम एका बेल्जियम कंपनीला देण्यात आले आहे. त्याचा अहवाल तीन महिन्यात येईल. त्यानंतर पुलाच्या कामाला सुरुवात होईल, अशी माहिती ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी दिली.