गुगलने आज भारताच्या पहिल्या महिला फोटोजर्नालिस्ट होमी व्यारावाला यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त त्यांचा डुडलद्वारे सन्मान केला आहे. आजच्या काळात महिला पत्रकारितेसह सर्वच क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. पण ज्या काळात बाईला घराचा उंबरठा ओलांडलायला मज्जाव होता, त्या काळात व्यारावाला यांनी फोटो जर्नालिझममध्ये करिअर करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
व्यारावाला यांचा जन्म ९ डिसेंबर १९१३ रोजी गुजरातच्या नवसारीत एका मध्यमवर्गीय पारसी कुटुंबात झाला. मुंबईत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. १९३८ साली जेव्हा फोटोग्राफी हे पुरुषांचंच क्षेत्र मानलं जाई, त्या काळात होमी यांनी व्यावसायिक स्तरावर फोटोग्राफीला सुरुवात केली. १९४२ मध्ये दिल्लीच्या ब्रिटीश इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसमध्ये छायाचित्रकार म्हणून त्या रुजू झाल्या.
व्यारावाला या अनेक ऐतिहासिक घटनांच्या साक्षीदार होत्या. १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवण्यात आला, तेव्हा त्या तिथे उपस्थित होत्या. राष्ट्रपती भवनात लॉर्ड माउंटबॅटन सलामी स्वीकारताना, पंडित नेहरू आणि त्यांची बहिण विजयालक्ष्मी यांची गळाभेट, नेहरूंचे नातवंडांसोबतचे क्षण होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहेत.