गावात पसरलेल्या साथीच्या रोगांपासून गावाची सुटका करण्यासाठी पुर्वीच्या काळी गावातील लोक दूर जंगलात किंवा आपल्या शेतात जाऊन काही दिवस वास्तव्य करायचे.त्याला गावसोडणी म्हटलं जायच. आजही कोकणातील अनेक गावात गावसोडणीची ही पध्दत परंपरेनुसार पाळली जात आहे.
रोहा तालुक्यातील हेदवली या गावातही 6 मे रोजी गावसोडणी किंवा रिंगवणी साजरी केली गेली.हेदवली येथे प्रत्येक बारा वर्षांनी रिंगवणीचा उत्सव साजरा केला जात असून त्याला 90-95 वर्षांची परंपरा असल्याचे गावातील बुजुर्ग सांगतात.
प्रत्येक बारा वर्षांनी गावकी सर्वांच्या सोयीने रिंगवणीची तारीख नक्की करते.ठरलेल्या तारखेला गावापासून काही अंतरावर गावातील सर्व कुटुंब एकत्र येतात त्यासाठी छोटे छोटे तंबू उभारले जातात. जमा केलेल्या वर्गणीतून सामिष भोजन तयार केले जाते.दुपारनंतर सगे-सोयरे,माहेरवाशिणी,मित्रमंडळी तसेच नोकरी निमित्त बाहेरगावी गेलेले सर्वजण रिंगवणीच्या निमित्तानं गावी येतात आणि रात्री उशिरापर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू असते.रिंगवणीनिमित्त ग्रामदेवतेलाही मानपान देऊन त्याचा प्रसादही सर्व कुटुंबांना देण्यात येतो रात्रीचा मुक्कामही तेथेचे केला जोता चोर्या होऊ नयेत म्हणून तरूण रात्रीचा पहाराही देतात.दुसर्या दिवशी सारेच आपआपल्या घरी पोहोचतात ते बरत बारा वर्षांनी एकत्र यायचं असा निर्धार करून.हेदवलीतली ही गावटाकणीची प्रथा रायगडमध्ये चर्चेचा विषय असते. गावटाकणीमुळे एकोपा,परस्पर सामंजस्य,आणि सहकार्याची भावना वृध्दींगत होते.तसेच जाती,पंथ भेद विसरून सारेच एकत्र येत असल्याने उच्चनिचतेच्या भिंतीही आपोआपच गळून पडत असल्याने आम्ही प्रथा आजच्या आधुनिक काळात देखील सुरू ठेवणार असल्याचे गावातील तरूणांचे म्हणणं आहे.