हिंदी पत्रकारितेतील पितामह

0
1049

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीजवळील छोट्या पराड गावात जन्मलेल्या बाबूराव विष्णू पराडकर यांचा जन्म इ. स. १८८३ मधील. मात्र, आज १३४ वषारनंतरही त्यांचे नाव हिंदी पत्रकारितेतील अग्रगण्य विख्यात संपादक म्हणून घेतले जाते. त्यांच्या रोमारोमात पत्रकारिता आणि देशभक्ती भरून राहिली होती. बाबूराव पराडकरांचा जन्म १६ नोव्हेंबर १८८३ चा आणि निधन १२ जानेवारी १९५५ चे. त्यांची आज आठवण येण्याचे कारण, त्यांच्यासंबंधीचे दोन कार्यक्रम एक मुंबईत येत्या १३ सप्टेंबरला आणि दुसरा १४ सप्टेंबरला (हिंदी दिनी) त्यांच्या गावी पराडला होत आहेत. दोन्ही कार्यक्रमांचे आयोजक ‘मुंबई प्रेस क्लब’ ही संस्था आहे.

पहिला कार्यक्रम म्हणजे ‘हिन्दी और मराठी के अन्तरसरबंध’ या विषयावर चर्चासत्र असून, त्यात भोपाळच्या माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रा. बी. के. कुठियाला, वाराणसीचे प्रा. राममोहन पाठक, काशी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाषसिंह त्याचप्रमाणे डॉ. अत्रि भारद्वाज आदी सहभागी होत आहेत. दुसऱ्या कार्यक्रमात हे सारे व पुण्या-मुंबईचे काही पत्रकार पराडला जातील. तेथे बाबूराव पराडकरांच्या योगदानाबद्दल सारेच कृतज्ञता व्यक्त करतील. तद्वत त्यांचे तैलचित्र पराड ग्रामपंचायतीकडे सुपूर्त केले जाईल. भावी स्मारकाबद्दलचे काही निर्णय केले जातील.

पराडमधल्या गावकऱ्यांना बाबूरावांच्या हिंदी पत्रकारितेतील योगदानाबद्दल निश्चित अभिमान वाटतो. चार-एक महिन्यांपूर्वी आम्ही त्या गावात कणकवलीहून निघून गेलो होतो. त्या वेळी गावकरी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व तेथील पत्रकारांनी अपूर्व उत्साह दाखवला होता. पराडकरांनी प्रारंभी काही दिवस टपालखात्यात नोकरी केली होती. पण त्यांनी ती थोडक्या काळात सोडून दिली. कोलकत्याला पराडकरांचे मामाश्री सखाराम गणेश देऊस्कर पत्रकारितेत रमलेले होते. स्वाभाविकपणे ते प्रथम कोलकत्याला गेले. तेथेच त्यांचा पत्रकारितेत प्रवेश झाला. तेथील हिन्दी वृत्तपत्र ‘बंगवासी’त त्यांनी प्रारंभी २५ रुपये पगारावर नोकरी सुरू केली. नंतर ते ‘बांगला हितवार्ता’त गेले. त्याचे संपादक देऊस्कर होते. त्या नंतर ‘भारत मित्र’ या वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणादायी लिखाण केले.

‘आज’ या वाराणसीच्या व हिंदी प्रदेशात गाजलेल्या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनच पराडकर विख्यात आहेत. हिंदी पत्रकार म्हणतात, ‘‘पराडकरजी ने अपना सारा जीवन मुख्यत: ‘आज’ एवं ‘संसार’ पत्रो के माध्यम से पत्रकारिता और देशसेवा में लगा दिया।’ १९२० ते १९४२ आणि त्या नंतर १९४७ ते १९५५ पयरत ते ‘आज’मध्ये होते. ‘हिन्दी पत्रकारितेतील शिखर पुरुष’ म्हणून त्यांचा गौरव केला जातो. काही हिंदी पत्रकार त्यांना ‘प्रात:स्मरणीय बाबुरावजी पराडकर’ म्हणतात. वस्तुत: हिंदी ही त्यांची मातृभाषा नव्हती, हे उघडच आहे; परंतु त्यांनी हिंदी पत्रकारिता एका उंचीवर नेली.

 लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांपासून त्यांनी प्रेरणा घेतली. लोकमान्यांनी घोषणा केली, ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे’, पराडकरजी म्हणत, ‘स्वतंत्रता लेकर रहेंगे’, ‘गप्प बसू नका’, ‘उठा, जागे व्हा’ स्वातंत्र्यलढ्याला त्यांनी जी प्रेरणा दिली, त्याचे ऋण आजही हिंदी भाषिक मानतात. बाबूराव पराडकर केवळ पत्रकार नव्हते. स्वातंत्र्याचा लढा, साहित्य क्षेत्र, हिन्दी भाषेची शब्दसंपदा समृद्ध करणे ही त्यांची कामे हिंदी प्रदेशात इतिहास घडविणारी ठरली. पत्रकारक्षेत्रात तर ते श्रेष्ठ संपादक म्हणूनच गणले जातात. त्यांच्याबाबत एक गोष्ट सांगितली तरी त्यांचे योगदान लक्षात येईल. हिंदी वृत्तपत्रक्षेत्रात ‘हिंदी परिभाषा’ म्हटली की त्यांचे नाव घेतले जाते. ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ या शब्दाला भारतीय प्रतिशब्द हवा होता. तो हिंदीसह सर्व भाषांना समान वाटावा असा पाहिजे होता. त्या वेळच्या राजकीय व अन्य ज्येष्ठ व्यक्तींच्या नजरा बाबूराव पराडकर कोणता शब्द सुचवतात, याकडे वळले. त्यांनी जो शब्द दिला, तो अजरामर झाला आहे, ‘राष्ट्रपती’. आज ‘राष्ट्रपती’, हा शब्द साऱ्या देशवासियांचा बनला आहे. वाराणसीच्या ‘काशी पत्रकार संघा’च्या गतवर्षीच्या बृहत डायरीत प्रारंभीचे जे पूर्ण पान, ते बाबूरावांच्या गौरवासाठी समर्पित केले आहे, त्यात म्हटले आहे, ‘हिंदी पत्रकारिता के भीष्म-पितामह सम्पादकाचार्य पण्डित बाबूराव विष्णु पराडकर भारत, भारती और भारतीयता के अनन्य सेवक तथा उन्नायक थे। स्वतन्त्रता संग्राम तथा समाज की उन्नति के लिए आप ने आधी शताब्दि तक अखण्ड साधना की और अपना जीवन ही राष्ट्र को समर्पित कर दिया। आप चिरस्मरणीय रहेंगे।

स्वातंत्र्यपूर्व काळ हा पत्रकारितेच्या आदर्शाचा होता. समाजाची व राष्ट्राची सेवा, त्याप्रमाणे प्रगती हा त्या काळातील ध्यास होता. बाबूराव पराडकरांनी हिन्दी क्षेत्रात त्या ध्येयवादाने स्वत:चे स्वतंत्र व उच्च स्थान निर्माण केले. काही महिन्यांपूर्वी मी वाराणसीत जाऊन त्यांचे भव्य स्मारक पाहिले. काशी पत्रकार संघाने तीन मजली पत्रकार भवन बांधले आहे. ते पराडकरांना समर्पित केले आहे. तेथे साधारणपणे दोनशे श्रोते बसतील असे प्रेक्षागृह बांधले आहे. बाहेरगावाहून येणारांसाठी वातानुकुलीत खोल्या बांधल्या आहेत. या इमारतीचे नाव अर्थात ‘पराडकर स्मृति भवन’ आहे.

महाराष्ट्राबाहेर जीवन व्यतीत करून हजारोंना प्रेरणा देणाऱ्या ‘पराड’ गावच्या सुपुत्राचे ते स्मारक पाहताना व तेथे वावरताना मनात दोन भावना निर्माण होतात; कर्तृत्वसंपन्न पराडकरांना मनोमन अभिवादन ही पहिली आणि देशातील एकोपा, ऐक्यभावना यांना स्वत:च्या लेखणीने उन्नत करणारा महान पत्रकार, ही दुसरी.

संपादक या नात्याने त्यांनी हिंदी साहित्याचीही सेवा केली. भाषाक्षेत्रातील त्यांचे शब्दांचे योगदान तर मोठे आहेच, पण त्यांनी जशी हिन्दी साहित्यिकांना प्रेरणा दिली, तसे हिन्दी साहित्यकारही पुढे आणले. हिंदीतील श्रेष्ठ साहित्यकार पाण्डेय शर्मा म्हणतात, ‘‘श्रद्धेय पराडकरजी ने मुझे संभाला, सुधारा, रास्ते से लगा दिया.’’ आपले नेहमीचे दैनंदिन काम बाजूला ठेवून या साहित्यिकाचे साहित्य ते मन:पूर्वक वाचत, दुरुस्त करीत. साहित्यिकांसाठी वेळ देऊन, वेळ काढून या महान, संपादकाने साहित्याचीही सेवा केली. तो मोठा विषय.

सिमला येथे जे सत्ताविसावे अखिल भारतीय हिन्दी साहित्य संमेलन झाले त्याचे ते अध्यक्ष (सभापती) होते. त्या वेळी भाषण करताना राजर्षि पुरुषोत्तमदास टंडन म्हणाले, ‘यह बात हमारे लिए कितने गर्व की है कि आज एक ऐसे पत्रकार को (हम) सभापति बना रहे है, जिन की मातृभाषा मराठी है। पराडकरजी (अर्थात) हिन्दी के बहुत बडे मर्मज्ञ है।’ कुठे पराड, कुठे कोलकता, कुठे वाराणसी! सारे क्षेत्र पराडकरांनी आपल्या सेवाभावी जीवनाने उजळवून टाकले. त्यांनी १९२५ मध्ये वृंदावन येथील संपादक संमेलनात वृत्तपत्रांविषयी जी भविष्यवाणी केली तीही पाहण्यासारखी आहे : ‘भावी काळातील हिंदी वृत्तपत्रेही सुंदर होतील. त्यांचा आकार (पृष्ठसंख्या) वाढेल, ग्राहकांची संख्या लाखोत मोजावी लागेल.’’

हे सांगायला नको की हे सारे आज प्रत्यक्षात आले आहे. असो. ‘पराडकरजींचे पराड गाव कोठे आहे’, असा प्रश्न वाराणसीचे प्रा. राममोहन पाठक यांनी तीन वषारपूर्वी मला जळगावला केला होता. मी त्यांना म्हटले होते, ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात पराड येते.’ ते म्हणाले, ‘त्या गावी त्यांचे काही स्मारक असावे, असे आम्हा हिंदी भाषिक पत्रकारांना वाटते.’ हिंदी भाषिकांची तळमळच ते वरील शब्दांमधून व्ये करीत होते. या पूर्वी ज्येष्ठ संपादक माधव गडकरी पराडला गेले होते. त्या नंतर मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारीही गेले होते. पराडचे रहिवासी म्हणाले, ‘पराडकरांच्या नावाची इथे प्राथमिक शाळा होती. ती पडून गेली. पुष्कळ माणसे वर्षानुवर्षे येथे येतात. पराडकरांचे योग्य ते स्मारक व्हायला हवे.’ तळकोकणातील पराड हे छोटेखानी गाव पराडकरांनी आपल्या कर्तृत्वाने हिंदी भाषिकांच्या अंत:करणात ठसवले आहे, रुजवले आहे. तेथे त्यांच्या उचित स्मारकासाठी सध्या जे प्रयत्न चालू आहेत, ते यशस्वी होवोत, हीच अपेक्षा. कोकण ही भूमी महापुरुषांची तसेच महान पत्रकारांची. पराडकरांच्या जीवनाचा हाच अर्थ. त्यांची शताब्दी महाराष्ट्रात होऊ शकली नाही; पण स्मारक मात्र व्हायला हवे. होईल तो सुदिन.

एस.के.कुलकर्णी
महाराष्ट्र टाइम्सवरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here