मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारांना उपदेशाचे बोल सुनावले आहेत. हायकोर्टातील पत्रकारांच्या पेहरावावर आक्षेप घेत पत्रकारांसाठी ड्रेस कोड आहे का? असा सवाल यावेळी विचारला आहे. तसचे हायकोर्टातील खटल्याच्या वार्तांकनावरुनही न्यायालयाने पत्रकारांची कानउघाडणी केली आहे.
निवासी डॉक्टरांविरोधात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान कोर्टात टी- शर्ट आणि जीन्स घालून उपस्थित असलेल्या एका इंग्रजी वृत्तपत्राच्या पत्रकाराच्या पेहरावावर आक्षेप घेत मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लूर यांनी पत्रकारांसाठी काही ठराविक पेहराव आहे की नाही? असा सवाल केला. त्यानंतर पुरुष पत्रकारांनी शर्ट आणि पॅन्ट घालून वावरायला हवं, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
याशिवाय, मुख्य न्यायमूर्तींनी पत्रकारीतेवरही उपस्थितांना काही धडे दिले. मुख्य न्यायमूर्तींच्या मते पत्रकारांनी कोर्टात होणाऱ्या सुनावणीचं वार्तांकन करताना भान बाळगण गरजेचं आहे. तसंच केवळ हायकोर्ट आपल्या आदेशात जे नोंदवत तेवढच माध्यमांनी प्रसिद्ध करावं, असाही सल्ला दिलाय.
माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांचा समाजावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे माध्यमांनी एखाद्या खटल्याचं वार्तांकन करताना जवाबदारीनं वागायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. अन्यथा हायकोर्ट संवेदनशील खटल्यांची सुनावणी इन कॅमेरा घेईल, ज्यात पत्रकारांना प्रवेश मिळणार नाही असही त्या पुढे म्हणाल्या.