हॉ..मै अलिबाग से ही आया हूँ…
मी तब्बल 18 वर्षे अलिबागला होतो.. या वास्तव्यात मी अलिबाग आणि रायगडच्या प्रेमात पडलो.. अलिबागचा सुंदर निसर्ग एवढेच काही त्याचे कारण नव्हते.. अलिबाग जेवढं सुंदर आहे तेवढंच ते समृध्द आणि संपन्न आहे..स्वकष्टानं शेतीत मोती पिकविणारया कृषीवलांची ही भूमी आहे.. अन्यायाच्या विरोधात प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठविणारया कष्टकरी, कामगारांची ही भूमी आहे… रायगड ही शूर – विरांची, विद्वानांची, आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालणारया असंख्य महापुरूषांची भूमी आहे.. अलिबागकर सभ्य, सुसंस्कृत आणि कल्पक आहेत.. आज ही अनेक क्षेत्रात अलिबागकरांनी आपला दबदबा निर्माण केलेला आहे.. “असा हा रायगड” या माझ्या पुस्तकात विस्तारानं ही सारी माहिती मी दिलेली आहे..
रायगडची ही महती उर्वरित महाराष्ट्रानं माहिती करून घेतली नाही किंवा तसा प्रयत्न रायगडनंही केला नाही.. हे नक्की.. त्यामुळे अनेक चित्रपट, मालिकांमधून अलिबागकरांचा सातत्यानं उपमर्द करण्याचा प्रयत्न झालेला आहे.. आजही तो थांबलेला नाही…. “अलिबाग से आया क्या”? अशा अर्थाचं वाक्य आजही अनेक सिनेमातून, मालिकांतून वापरले जाते..अलिबाग से आया है क्या? या वाक्यात अलिबागकरांना वेडसर, भोळसट, बावळट ठरविण्याचा प़यत्न होत असतो.. वास्तव अर्थातच तसं नाही.. हे मी अनुभवाने सांगू शकतो.. मी अाता अलिबाग सोडले आहे.. म्हणजे मी अलिबागहूनच आलेलो आहे.. तरीही मी अभिमानाने सांगू शकतो
” हां मै अलिबाग से ही आया हू..”
स्व. नमिता नाईक यांनी या विरोधात अलिबागमध्ये मोठी चळवळ सुरू केली होती.. कोणी तरी कोर्टात ही गेलं होतं.. त्यानंतर काही दिवस हे प़कार थांबले होते मात्र अाजही काही लोकांना अलिबागकरांचा अवमान करण्याची खुमखुमी येत राहते.. इंडियन आयडल 12चा सूत्रसंचालन आदित्य नारायण याने “आम्ही काय अलिबागहून आलोत का” ? असे वक्तव्य करून अलिबागकरांच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले आहे.. याचा मी निषेध करतो.. मात्र शाब्दिक निषेधानं ही पिलावळ गप्प बसणारी नाही.. आदित्य नारायणच्या विरोधात अलिबाग ठाण्यात तक़ार द्यायला हवी.. रायगड प्रेस क्लबने त्यासाठी पुढाकार घ्यायला हरकत नाही.. अलिबागचा हिसका दाखविल्याशिवाय हे हरामखोर वठणीवर येणार नाहीत.. हे तेवढंच खरं..