*हरवलेले दिवस” जगताना

” कधी कधी वाईटातूनही चांगलं घडतं असं म्हणतात”.. मी सध्या त्याचा अनुभव घेतोय.. गेली वीस दिवस मी माझ्या गावी आई – वडिलांसोबत आहे..गेल्या पन्नास वर्षात आई – वडिलांसोबत एवढा प़दीर्घ काळ राहण्याचा योग कधी आला नव्हता..तो आता आलाय..त्याला कारण ठरलाय कोरोना.. अगदी पहिलीपासून शिक्षणासाठी आई वडिलांपासून दूर मामांच्या गावी होतो.. आठवीनंतर वेगवेगळ्या शहरांमधून शिक्षणासाठी बाहेर राहात गेलो.. उन्हाळ्याच्या सुट्यात , शिबिरं ठरलेली असायची.. तिकडे हजेरी लावली जायची.. त्यामुळं सलग आठ दिवसही आई वडिलांसमवेत राहणं व्हायचं नाही.. पुढं नोकरीच्या टप्प्यात तर शक्यच नसायचं.. अलिबागला अठरा वर्षे होतो.. तेव्हा तीन तीन महिने घरी येणंही व्हायचं नाही.. आलो तरी परतण्याची घाई असायची.. आई अनेकदा नाराज व्हायची, पाव्हण्यासारखा येतोस म्हणायची.. निघताना गालावरून मायेचा हात फिरवताना रडायची.. “निघताना मी म्हणायचो, पुढच्या वेळेस चांगले आठ दिवस मुक्काम ठोकतो.. पण या आश्वासनाचं थापाड्या पुढारयांचया आश्वासनां सारखंच व्हायचं.. ते कधीच पाळलं जायचं नाही.. बिचारी आई वाट बघत बसायची.. सलग तेवीस वर्षे संपादकपदाची जबाबदारी पेलत होतो..मुंबई गोवा महामार्गासाठीचा लढा, सेझ विरोधी आंदोलनं, साहित्य संमेलनाचं आयोजन आदि गोष्टीत पार बुडून गेलेलो असायचो.. त्यामुळं इच्छा असूनही घरी जास्त दिवस थांबणं जमायचं नाही.. नोकरीचा राजीनामा दिल्यावर अनेकांच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण होते.. मी मात्र जास्तच बिझी झालो आणि महाराष्ट्रभर पायपीट करू लागलो. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार पेन्शनसाठी सातत्यानं आंदोलनं, मेळावे सुरू असायचे.. त्यासाठी सावंतवाडी पासून ते वर्धा, चंद्रपूर, नागपूर पर्यन्त प्रवास व्हायचा..एका एका महिन्यात दोन दोन तीन तीन हजार किलो मिटरचा प्रवास व्हायचा.. त्यातही चालक, मालक, संपादक मीच असायचो.. त्यामुळे आई – भाऊंना वेळ देताच आला नाही.. कधी तरी नांदेडला जाताना बीड मार्गे आईला भेटून जायचो.. एवढेच..नातवांना भेटायला आई – भाऊ पुण्याला यायचे पण बंदिस्त फ्लॅटमध्ये त्याचं मन रमायचं नाही.. शिवाय दोघांचा जीव गावाकडच्या शेतीवाडीत अडकलेला असायचा.. ते चार आठ दिवसात परत यायचे..हे असं सुरू होतं..
पंधरा दिवसांपुर्वी एका लग्नासाठी बीडला आलो होतो.. शेतीची कामं होती म्हणून चार दिवस गावी थांबलो.. मग कोरोनाच्या राक्षसाचं आगमन झालं.. 22 ला अलिबागला ठरलेला कार्यक़म रद्द झाला, 30 ची परिषदेची बैठकही रद्द झाली आणि मग “घरातच थांबा” चे हाकारे येऊ लागले.. पुढे रस्तेही बंद झाले आणि मी गावी अडकून पडलो.. पण त्यामुळं मला पन्नास वर्षांची कसर भरून काढता आली.. आई खूष होती.. आई आता थकलीय, तिला काम होत नाही.. कामाला मावशी आहे पण लहानपणी मला काय आवडायचं ते आईला बरोबर आठवतंय.. ते सारे पदार्थ आईनं आपल्या हातानं गेल्या पंधरा दिवसात मला करून घातले.. शेवायाची खीर, दुधखीर, पुरणपोळी हे सारे माझ्या आवडीचे बेत झाले.. कढी, वाटयावर वाटलेली चटणी,कुरडाया, आंबट सार, पोह्याचे पापड.. वगैरे वगैरे.. रोज नवा पदार्थ.. आईच्या हातची गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर पोळी पोहून निघेल एवढं घरच्या गाईंचं तूप खाताना आपल्याला डायबेटिस आहे याची आठवण ठेवणे मुर्खपणाचे होते.. सोबतीला कटाची आमटी आहे म्हटल्यावर मजा काही औरच.. या सारया पदार्थांवर मस्त ताव मारता आला..सकाळी उठल्यावर ग्लासभर दूध, मग शेतात भटकून यायचं, दुपारी आईच्या हातच्या पदार्थांवर ताव, झोप, वाचन पुन्हा सायंकाळी बाबासाहेब अण्णा, तुळशीराम जीजा, बाबुराव, लक्ष्मण तात्या या गावाकडच्या दोस्त यारांसोबत शेतात फेरफटका आणि रात्री मग आठचा मोदींसरांचा क्लास ही सारी दिनचर्या ठरलेली आहे.. दोन तीन वेळा चांदणी रात्री रम्य वातावरणात आमच्या मळ्यात बैगण पार्टीचा बेत झाला, बीड, वडवणी च्या पत्रकार मित्रांना बोलावून हुरडा पार्टीची मजाही तीन चार वेळा घेतली.. कोरोनाला मी थॅक्स म्हणू शकत नाही पण कोरोनाच्या राक्षसानं सारयांना घरात जखडून टाकलयानं मला पन्नास वर्षात जे अनुभव घेता आले नाही ती घेता आले.. . हे हरवलेले दिवस नव्यानं जगताना खूप बरं वाटतंय.. आंदोलनं नाहीत, सत्कार नाही, लढ्याची भाषा नाही, राजकारण नाही… सारं कसं शांत शांत.. बीएसएनएल भाऊंची कृपा.. माझा बीएसएनएल मोबाईल इकडं लागत नाही..त्यामुळं क्वचितच कोणाचे फोन येतात..त्यामुळं तो तणावही नाही.. आता मोदी सरांनी सांगितलंय.. 21 दिवस घरीच राहा.. मोदीसरांची ही सूचना कोणाला नाकारायची असेल तर नाकारू देत मी मात्र आणखी 21 दिवस गावाकडच्या मोकळ्या हवेत माझे “हरवलेले दिवस” जगत राहणार आहे..आज पाडव्याच्या मुहूर्तावर ज्वारीचं खळं घातलंय, तीन एकरात लावलेला गहू देखील आज घरी आला.. लोक म्हणतात यंदा गव्हावर रोग होता.. तुम्हाला उतारा चांगला मिळाला.. दिवस शेतातच गेला .. शेतात जायला उध्दव साहेबांनी परवानगी दिलेली आहे.. अर्थात तरीही सारी काळजी घेतोच आहे…
मी स्वतःला भाग्यवान यासाठी समजतो की, आई वडिलांचं छत्र आजही आमच्या डोक्यावर आहे.. त्यामुळं आम्ही आजही निर्धास्त आहोत..वडिलांचं वय ८७ वर्षाचं असलं तरी त्यांच्यातला “देशमुखी ताठा” जसा कमी झालेला नाही तसाच गावातला त्यांचा दराराही संपलेला नाही.. अनेक वर्षे ते गावचे कारभारी.. सरपंच होते.. या काळात गावच्या विकासाची अनेक कामं त्यांनी केली. गरीब माणूस कायम त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे.. कम्युनिस्ट चळवळीत गंगाधर आप्पा बुरांडे यांचे कार्यकर्ते म्हणून ते काम करीत.. प्रचंड जनसंपर्क असलेले, भय हा शब्दच माहित नसलेले भाऊ आजही कोणाला न सांगता तालुक्याला जाऊन गावात एस. टी. नाही म्हणून निवेदन देतील, पाण्याची कैफियत तहसिलदीरांकडे मांडतील..ग्रामपंचायत निवडणुका हा त्यांच्या कायम आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय.. हा विषय असला की ते कितीही वेळ बोलत राहू शकतात.. “भाऊ वय झालंय आता निवांत बसा की” असं म्हटल्यावर ते शरद पवार, लालकृष्ण आडवाणी आणि अशीच अनेकांची नावं आमच्या तोंडावर मारतात.. आम्ही गप्प होतो..
आम्ही तीन भाऊ आजही एकत्र राहतो.. आई भाऊंमुळंआमचया वाड्याचा दिमाख आणि घरातलं घरपण देखील टिकून आहे..यापेक्षा आणखी काय हवंय माणसाला?
एस. एम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here