आता कोणताही पत्रकार एकाकी नाही
हम सब साथ है!
पुणे :मराठी पत्रकार परिषद ही केवळ पत्रकार संघटना नसून ते पत्रकारांचे कुटुंब आहे ही आमची भावना आहे.. त्यामुळे कुटुंबातील कोणताही सदस्य अडचणीत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणे ही परिषदेला आपली जबाबदारी वाटते.. ही जबाबदारी परिषद आणि पुणे जिल्हा आणि हवेली तालुका पत्रकार संघाने काल पुन्हा एकदा कर्तव्य भावनेतून पार पाडली.. राज्यातील कोणताही पत्रकार एकाकी नाही आम्ही सारे त्याच्या बरोबर आहोत हा संदेश त्यातून दिला गेला.
.
४४ वे अधिवेशनात ज्या हवेली तालुक्यात होत आहे तेथील तालुका संघाचे एक सदस्य आणि पुण्य नगरीचे पत्रकार धनराज साळुंखे ( रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे ) यांच्या गळ्यात तीन गाठी आल्या होत्या. त्यामुळे त्यांना तातडीने गॅलक्सी रुग्णालय, डेक्कन जिमखाना, पुणे या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथील डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्या गाठी काढून टाकल्या. शस्त्रक्रिया व त्यानंतरचे औषधोपचार यासाठी बराच मोठा खर्च येणार आहे. बहुतेक पत्रकारांची असते तशीच त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने मराठी पत्रकार परिषद, पुणे जिल्हा पत्रकार संघ, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमधील १९९९ची बॅच तसेच हवेली तालुका पत्रकार संघाच्यावतीने ७६,००० रूपयांची मदत धनराजच्या कुटुंबियांकडे काल सुपूर्द करण्यात आली…
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त मा. एस एम देशमुख , लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्या हस्ते धनराज साळुंखे यांची पत्नी व मुलाकडे काल ही रक्कम सोपविण्यात आली.. यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, जिल्हा समन्वयक सुनील जगताप, सोशल मिडिया परिषदेचे जिल्हा प़मुख जनार्दन दांडगे, हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापुसाहेब काळभोर, मार्गदर्शक तुळशीराम घूसाळकर आदि उपस्थित होते…