शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित हमी भाव देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पेण येथे केली.
स्वाभिमानी पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी विस्तारित कार्यकारिणीच्या दोन दिवसीय शिबिराचे पेण येथे आयोजन कऱण्यात आले आहे.या शिबिरासाठी दोन्ही संघटनांचे दीड ते दोन हजार प्रतिनिधी पेणमध्ये दाखल झाले आहेत.शिबिराचे उद्दघाटन काल राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार शेट्टी यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीवर नाखुषी व्यक्त केली .ते म्हणाले,जानेवारी 2014मध्ये केंर्दीय कृषी मूल्य आयोगाने खरीप हंगाम 2014-15साठी पिकांच्या किमान आधारभूत किंमती ठरविण्यासाठी केलेल्या शिफारशी मोदी सरकारने जश्याच्या तश्या स्वीकारून आधारभूत हमी भाव जाहीर केला.त्यामुळे आधारभूत किंमतीत केवळ दोन टक्केच म्हणजेच 30 ते 100 रूपयांची वाढ झाली आहे.केंद्राच्या या निर्णयावर आम्ही समाधानी नाही आहोत असेही यावेळी शेट्टी यांनी स्पष्ट केले.
या शिबिरासाठी सदाभाऊ खोत,एकनाथ दुधे,पृथ्वीराजबापू ढाकसाळ, सतीश बोरूळकर आदि नेते उपस्थित आहेत .आज शिबिरात पक्षाच्या विधानसभेच्या निवडणुकांची रणनिती ठरविली जाणार आहे.