गुरूजी, सॉरी…
आज दिसतो तेवढा मी “तेव्हा” साधा सरळ नव्हतो.. खोडकर होतो.. उनाड होतो.. शाळेत मुलांच्या, मुलींच्या, गुरूजींच्या खोड्या काढणे हा माझा आवडता छंद होता..वर्गात विविध प़श्न विचारून गुरूजींना हैराण करणं, कागदी बाण करून वर्गात भिरकावणं, नदीत डुंबत बसणं , डिकं शोधण्यासाठी जंगलात भटकणं, झाडावर सूर – पारंब्या खेळणं,, भांडणं , मारामारी करणं..हे माझे उद्योग.. या सर्वांमुळे घरचे आणि शाळेतले सारे वैतागत.. याबद्दल अनेकदा आजोबांनी आणि गुरूजींनी मला शिक्षा ही केलेल्या होत्या.. ..अनेकदा शाळेत कोंबडा झालो.. पण माझा स्वभाव बदलत नव्हता..एकदा तर मी शाळेच्या रिझल्ट मध्येच खोडाखोड केली होती.. थ्री एडियट मध्ये मित्रासाठी Question paper चोरणारा रॅंचो आपण पाहिला.. मी एका मित्रासाठी Result sheet मध्येच खाडाखोड केली होती..त्याला नापासचं पास केलं होतं.. नंतर ही चोरी पकडली गेली.. गावात आजोबांचा दबदबा होता आणि मी अभ्यासात, खेळात, भाषणात पुढे होतो, म्हणून वाचलो.. नाही तर शाळेतून माझी हकालपट्टी नक्की होती..
आमचे एक गुरूजी होते.. द. ज्ञ. गुरूजी.. गणित शिकवायचे..एकदम सज्जन आणि पापभिरू..घर आणि शाळा हेच त्याचं विश्व.. हाडाचे शिक्षक होते.. पण त्यावेळच्या पद्धतीनुसार कडक शिस्तीचे.. मुलांना नावानं कधी बोलवायचे नाहीत…. माझं नावं सूर्यकांत तर मला सुरया म्हणायचे, दिलीपला दिलप्या म्हणून हाक मारायचे.. रोहिदास म्हणून एक मुलगा होता त्याला रोहिल्या म्हणायचे,माया नावाची एक मुलगी होती तिला महामाया म्हणायचे..अशी सारयांची टोपणनावं त्यांनी ठेवलेली.. मुलांना शिक्षा करताना जोरात कान पिरगळायचे.. जोरात चिमटा काढायचे.. मी वर्गातला Schoolar विद्यार्थी असल्याने मला द. ज्ञ. गुरुजींचा प्रसाद कधी तरीच मिळायचा.. एकदा मात्र गुरूजींनी चांगलीच शिक्षा दिली.. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला शाळेत कार्यक्रम असत.. त्यावेळेस विद्यार्थी प़तिनिधीं म्हणून मी भाषण करायचो.. द. ज्ञ. गुरूजी मला भाषण तयार करून द्यायचे.. मी हावभावासह भाषण करावे असा त्यांचा आग़ह असायचा.. हातवारे कसे करायचे ते मला समजून ही सांगत.. मी सातवीला असताना १५ ऑगस्ट रोजी नेहमी प्रमाणे मी भाषणाला उभा राहिलो.. भाषणात एक वाक्य होतं.. “पी हळद अन हो गोरी असं म्हणून चालत नाही” असं ते वाक्य.. या वाक्याच्या वेळेस गुरूजींनी सांगितलेले नसताना उजव्या हातात अंगठा तोंडाकडे नेऊन.. दारूडयाबाबत जशी खूण करतात तशी मी केली .. त्यानं हशा पिकला .. नंतर मुख्याध्यापक भिंताडे गुरूजींनी द. ज्ञ. गुरूजींना बरंच सुनावलं..ही वार्ता आमच्या घरी पोहोचली.. आजोबांनी माझी पाठ सोलून काढली.. दुसरया दिवशी शाळेत द. ज्ञ. गुरूजींनी माझा कान असा काही पिरगळा की, आजही त्याची आठवण झाली की, हात आपोआप कानाकडे जातो.. या शिक्षेनं मी चिडलो.. माझा इगो ही दुखावला.. चूक झाली होती हे खरंच.. मात्र ती अनावधानाने झाली होती.. शिक्षा मात्र मला चुकी पेक्षा मोठी दिली जात होती.. हे मला बालवयातही सहन होत नव्हते.. अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारया माझ्या स्वभावाला ते पटत ही नव्हतं….गुरूजींना “धडा” शिकवायचा हे मनात ठरलं होतं.. पण कसा? कळत नव्हतं.. मात्र एक दिवस मी जे केलं त्याचा पश्चाताप आज पन्नास वर्षानंतरही मला होत आहे.. ज्ञानदान करणारया गुरूजींशी मी एवढं वाईट वागायला नको होतं..कोणीही वागू नये..
तो दिवस मी आजही विसरलो नाही.. शनिवार होता.. शाळा हाफ डे होती.. जेवण करून गुरूजी पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या नंदीच्या पारावर वामकुक्षी घेत होते.. मी ते पाहिल,..माझ्यातला उनाड मुलगा जागा झाला… एक डबा घेतला.. त्याला छिद्र पाडून त्याला दोरी बांधली.. या दोरीचं दुसरं टोक अलगतपणे गुरूजींच्या शर्टाला बांधलं..या कटात आणखी दोन तीन मित्र होते.. कार्यभाग उरकून आम्ही दूर एका झाडाआड जाऊन गुरूजी उठण्याची वाट पहात बसलो.. अर्ध्या एक तासानं गुरूजी उठले.. घराकडं चालू लागले.. दोरीच्या साहाय्यानं शर्टाला बांधलेला तो डबा देखील खडखडत त्यांच्या मागं चालू लागला.. हे लवकर त्यांच्या लक्षात आलं नाही.. काही लोक तेथे होते..ते पाहून हसायला लागले.. लोक आपल्याकडे बघून हसताहेत का? हे गुरूजींच्या लक्षात आलं नाही.. मग कोणी तरी गुरूजींना सांगितलं.. तेव्हा शर्टला बांधलेली दोरी काढून गुरूजी पुढे निघाले.. गुरूजी चिडले होते.. हा वाह्यातपणा मीच करू शकतो हे त्यांनी ओळखलं होतं.. दुसरया दिवशी रविवार होता.. मात्र सोमवारी आपली चांगलीच हजेरी घेतली जाणार हे मी जाणून होतो.. त्यामुळं पोट दुखतंय हे नेहमीचं आवडतं कारण सांगून सोमवारी मी शाळेला दांडी मारली.. पण दांडी किती दिवस मारणार? मंगळवारी अपराधी भावनेनं आणि शिक्षा सहन करण्याची मानसिक तयारी करूनच शाळेत गेलो.. द.ज्ञ.गुरूजींचा क्लास सुरू झाला..गुरूजींनी मला शनिवारी घडलेल्या घटनेची ओळखही दिली नाही, माझा कान ही पिरगळला नाही.. ते मला बोलले ही नाहीत.. काय झालंय मला कळत नव्हतं.. गुरूजी मला शिक्षा का करीत नाहीत? उत्तर मिळत नव्हतं.. नंतर जवळपास सहा महिने गुरूजींनी माझ्याशी अबोला धरला.. ते बोलत नव्हते, प्रश्न विचारत नव्हते.. चुकलं तर कान पिरगाळत नव्हते.. ही शिक्षा माझ्यासाठी जीवघेणी होती.. मला वाटायचं गुरूजींनी माझा कान पिरगळवा, चिमटा घ्यावा..हवं तर छडीनं बदडावं.. अन विषय संपवावा.. गुरूजींचा अबोला माझी प़चंड घुसमट करीत होता.. अनेकदा मी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला.. गुरूजींना बोलण्याचा प्रयत्न केला… उपयोग झाला नाही.. या शिक्षेचा परिणाम असा झाला की, मी अंतर्बाह्य बदलून गेलो.. शांत झालो.. खोड्या काढणं, करणं बंदच झालं..अपराधीपणाची भावना मला बैचेन करायची.. पूर्ण लक्ष अभ्यासात द्यायला लागलो.. त्यातून सातवी परीक्षेसाठी माझी चांगली तयारी झाली..
ठरल्या वेळेस परीक्षा झाली..माझा पेपर चांगला गेला.. निकाल आला.. तेव्हा सातवीचा निकालही जिल्हा वर्तमानपत्रांत छापला यायचा.. झुंजार नेता, चंपावतीपत्र निकाल छापायचे.. निकालाच्या दिवशी पेपर गावात आला.. मी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण होईल असं कोणाला वाटत नव्हतं.. आम्ही स्वाभाविकपणे पास श्रेणीत नंबर पाहिले.. माझ्या बरोबरची सारी मुलं पास झाली होती.. माझा नंबर नव्हता.. मी नापास झालो ही वार्ता गावभर पसरली.. आता आपली खैर नाही हे ओळखून मी म्हसोबाच्या डेहाकडं धूम ठोकली.. थोड्या वेळात माझे तीन चार मित्र माझ्याकडे धावत येऊ लागले.. ही मुलं आपल्याला पकडायला येत आहेत असं समजून मी आणखी पुढं धावत सुटलो.. “अरे तू पहिला आलास” असं ते ओरडत होते.. माझा मात्र विश्वास बसत नव्हता.. अखेर मुलांनी मला गाठलं.. “तुझा नंबर प्रथम श्रेणीत आहे..तू शाळेत पहिला आलास.. सगळ्यांनी तुला बोलावलंय” असं मित्रांनी सांगितलं.. भीत भीतच मी परत आलो.. तिथं आल्यावर द. ज्ञ. गुरूजींनी सर्वात अगोदर मला जवळ घेतलं.. माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरविला.. या सुखद, अनपेक्षित स्पर्शानं मी मोहरून गेलो.. गुरूजींना बिलगलो.. .” गुरूजी मी चुकलो, मला माफ करा” म्हणत मी जोरात हंबरडा फोडला..माझ्या हुंदक्यांनी गुरूजींच्या डोळ्याच्या कडाही ओल्या झाल्या.. तिथं उपस्थित असलेले माझे आजोबा आणि सारं गाव स्तब्ध होऊन हे दृश्य पहात होते.. गुरूजी म्हणाले, “सुरया तुझ्याशी अबोला धरणं मलाही असह्य होत होतं.. पण तू एक हुशार विद्यार्थी आहेस, त्यामुळं तू चुकीचं वागून आयुष्याचं नुकसान करून घेऊ नयेस म्हणून मी तुला ही शिक्षा दिली.. मी चिमटा काढला असता किंवा काठीनं बदडलं असतंस तर गुरूजींबददल तुझ्या मनात आणखी तिरस्कार निर्माण झाला असता.. मला ते होऊ द्यायचं नव्हतं.. म्हणून मी विचारपूर्वक तुझ्याशी बोलणं बंद केलं.. अपेक्षेप्रमाणे ही मात्रा बरोबर लागू पडली.. तू सहा महिन्यात बदललास.. उनाडक्या बंद करून अभ्यासात रमलास.. परिणामतः तू पहिल्या वर्गात पास झालास, मला आणखी काय हवं होतं? .. तुझ्या यशाचा सर्वाधिक आनंद मला झाला आहे.. माझे शुभाशीर्वाद नेहमी तुझ्या पाठिशी आहेस”..गुरूजींच्या या आश्वासक शब्दांनी गेली सहा महिने मी डोक्यावर वहात असलेलं अपराधीपणाचं ओझं दूर झालं.. नंतर मी गुरूजींच्या, आजोबांच्या पायावर डोकं ठेऊन आशीर्वाद घेतले.. पुढील आयुष्यात माझे अनेक सत्कार, सन्मान झाले मात्र सातवी पास झाल्यानंतर सारया गावानं केलेलं माझं कौतूक मी जन्मभर विसरलो नाही.. आजोळी सातवी पर्यंतच शाळा होती.. मी पुढील शिक्षणासाठी बीडला आलो.. ती द. ज्ञ. गुरूजी अन माझी शेवटची भेट होती.. नंतर कधी गुरूजींची भेट झाली नाही.. द. ज्ञ. गुरूजी मात्र कायम स्मरणात राहिले.. गुरूजींनी दिलेले संस्कार ही पुढील आयुष्यात माझ्या कायम उपयोगी पडले.. तेव्हा गुरूजींनी काठीनं बदडलं असतं तर कदाचीत मी अधिकच बिघडलो असतो. . गुरूजींच्या अनोख्या शिक्षेनं मी बदलून गेलो.. मी आज जे काही आहे ते गुरूजींच्या त्या शिक्षेमुळे.. द. ज्ञ. गुरूजी मी आपला श्रुणी आहे..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here