‘त्या’ ब्रिटिश पत्रकाराची वीरूशी १० लाखांची पैज
रिओ ऑलिम्पिकमध्ये दोनच पदकं मिळाली असतानाही एवढं सेलिब्रेशन कसलं करता?, असा खोचक सवाल करून भारतीय नेटकऱ्यांचा शाब्दिक मार आणि वीरेंद्र सेहवागचा भीमटोला खाणाऱ्या ब्रिटिश पत्रकारानं वीरूला पुन्हा डिवचलं आहे. भारतानं ऑलिम्पिकचं आणखी एक सुवर्णपदक मिळवण्याआधी इंग्लंडनं वनडे क्रिकेटमधील वर्ल्ड कप जिंकल्यास सेहवागनं १० लाख रुपये दान करावेत, अशी पैजच त्यानं लावली आहे. त्यावर आता वीरूपाजी काय उत्तर देतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.
‘अब्जावधींचा भारत देश ऑलिम्पिकमध्ये फक्त दोन पदकं जिंकतो आणि त्याचा जल्लोष एखाद्या उत्सवासारखा केला जातो, हे लज्जास्पदच आहे’, अशी खोचक टिप्पणी ब्रिटिश पत्रकार पिअर्स मॉर्गनने यांनी ट्विटरवरून केली होती. त्यावरून भारतीय नेटिझन्सनी त्याचा खरपूस समाचार घेतलाच; पण टीम इंडियाचा माजी शिलेदार वीरेंद्र सेहवागनं मॉर्गनला जे उत्तर दिलं त्याला तोडच नव्हती. अवघ्या १४० कॅरेक्टर्समध्ये वीरूनं त्याला ४४० व्होल्टचा करंट दिला होता. ‘आम्ही छोटे-छोटे आनंदाचे क्षणही उत्साहाने साजरे करतो, पण ज्या इंग्लंडने क्रिकेट हा खेळ शोधून काढला त्यांना अजून क्रिकेट वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही आणि तरीही ते क्रिकेट खेळताहेत, हे लाजीरवाणं नाही का?’, अशी चपराक वीरूनं लगावली होती. ती मॉर्गनला चांगलीच झोंबली आहे आणि म्हणूनच त्यानं वीरूला आव्हान दिलंय.
‘इंग्लडने वर्ल्ड कप जिंकण्याआधी भारताने ऑलिम्पिकमध्ये एकतरी सुवर्णपदक जिंकून दाखवावे, अन्यथा विरेंद्र सेहवागने १० लाख रुपये दान करावे’ असं ट्विट मॉर्गनने आधी केलं होतं. त्यावरून वीरूनं पुन्हा त्याला चोपलं. भारताने याआधी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, असं त्याने निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर लगेच मॉर्गनने हे ट्विट डिलिट करून नवीन ट्विट टाकले. आता सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे, ती ‘सेहवाघ’च्या डरकाळीची!