सनियंत्रण समितीची पुनर्रचना करण्याची जिल्हयातील पत्रकारांची मागणी

सिंधुदुर्गः पत्रमहर्षि बाबूराव पराडकर यांच्या स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सनियंणन समितीत सिंधुदुर्गातील एकाही पत्रकाराचा समावेश केला गेलेला नाही,जिल्हयातील पत्रकारांना मुद्दाम डावलण्यात आले आहे.या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघानं जाहीर निषेध व्यक्त केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघानं जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की,बाबूराव पराडकर हे सिंधुदुर्गचे सुपुत्र आहेत.त्यांचे स्मारक होत असताना जी जिल्हास्तरीय समिती नेमली गेलेली आहे त्यात जिल्हयातील सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत,पराडगावचे सरपंचही आहेत मात्र जिल्हा पत्रकार संघ किंवा जिल्हयातील एकाही पत्रकाराचा यामध्ये समावेश करण्यात आलेला नाही.जिल्हयातील एका पत्रकाराचे स्मारक होत असताना जिल्हयातील पत्रकारांना त्यापासून दूर ठेवत मुंबई-पुण्यातील पत्रकारांचा त्यात समावेश करण्याची कृती संतापजनक आहे.असे निवेदनात नमूद केले गेले आहे.या समितीत माहिती आणि जनसंपर्क विभागाचे माहिती अधिकारी किंवा विभागीय उपसंचालक यांचाही समावेश केला गेला नाही त्याबद्दलही निवेदनात नाराजी व्यक्त केली गेली आहे..
बाबुराव पराडकर यांचे स्मारक व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ तसेच मराठी पत्रकार परिषदेने सातत्यानं पाठपुरावा केला होता.परिषदेच्या पदाधिकार्‍यांनी जिल्हयातील पत्रकारांसह पराड गावाला भेट देऊन स्थानिकांशी चर्चा केली होती.तसेच तत्कालिन जिल्हा परिषद अध्यक्ष सग्राम प्रभूगावकर यांचीही भेट घेऊन जिल्हा परिषदेने आपल्या मालकीची जागा स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती केली होती.असं असतानाही परिषद आणि जिल्हा संघालाही डावलले गेले आहे.त्यामुळं ही समिती बरखास्त करून सर्वसमावेशक अशी नवी समिती स्थापन करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

बाबुराव पराडकर यांचे भव्य स्मारक व्हावे ते लवकरात लवकर व्हावे आणि त्यामध्ये संकुचितपणा न आणता सर्वांना विश्‍वासात घेऊन हे स्मारक व्हावे अशी अपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here