बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी सिंधुदुर्गात पत्रकार एकत्र

0
957

सिंधुदुर्गात आवाज फक्त जिल्हा संघाचाच…

दोन दिवस आम्ही सिंधुदुर्गात होतो.जिल्हा पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी निवडायची होती.आम्ही जाण्यापुर्वीच सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाची बैठक झाली होती . त्यातच  निवडणुका न घेता   कार्यकारिणी सर्वानुमते बिनविरोध निवडावी असा निर्णय  झाला होता.ही निवडणूक प्रक्रिया माझ्या उपस्थितीत पार पडावी अशी पत्रकार मित्रांची इच्छा होती.त्यामुळे मी,विश्‍वस्त  किरण नाईक आणि कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर ओरोसला गेलो होतो.बैठकीस जिल्हयातील साडेतीनशे पत्रकार उपस्थित होते.अपेक्षेप्रमाणे कार्यकारिणी बिनविरोध निवडली गेली.अध्यक्षपदी गजानन नाईक यांची निवड झाली.खरं तर गजानन नाईक यांची मुदत संपलेली होती,अन ते पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी फारशे इच्छुक नव्हते.नव्या दमाच्या एखादया तरूणाकडे अध्यक्षपद सोपवावं असं त्यांचं मत होतं.गजानन नाईक यांनी बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मारकासाठी खाल्लेल्या खास्ता,केलेला पाठपुरावा आणि दिलेल्या वेळ या गोष्टी लक्षात घेऊन त्यांनाच पुन्हा अध्यक्ष करावे अशी जिल्हयातील पत्रकारांची इच्छा आणि आग्रह होता.

आमचीही इच्छा गजानन नाईक यांनी अध्यक्षपद स्वीकारावं अशीच  इच्छा होती. काही  जिल्हयात  वीस वर्षापासून आपण अध्यक्ष असल्याचे छाती फुगवून सांगणारे महाभाग पत्रकार मी पाहिले आहेत,काही ठिकाणी अध्यक्षपदासाठी चाललेली लठ्ठालठ्टी आपण पहात असतो या पार्श्‍वभूमीवर सिंधुदुर्गात ‘नाईक अध्यक्षपद नको म्हणतात आणि इतर अन्य जण तुम्हीच अध्यक्षपद स्वीकारण्याचा प्रेमळ आग्रह धरतात’ हे दर्मिळ चित्र बघायला मिळाले.खरोखरच आनंद वाटला.अध्यक्षपदाचा प्रश्‍नंच नव्हता,पण अन्य पदासाठी जी नावं पुढं आली त्यापैकी एकाही नावाला कुणी आक्षेप घेतला नाही हे विशेष.  सिंधुदुर्गचे पत्रकार चांगलं लिहितात हे तर माहिती होतं पण सिंधुदुर्गचे पत्रकार उत्तम वक्तेही आहेत याचीही प्रचिती पत्रकार मित्रांची भाषणे ऐकून आली..सर्वच स्मारकाच्या मुद्यावर अत्यंत हळवे झाल्याचं बघायलं मिळालं. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली.ही निवडणुकीची सभा वाटावी असा माहोल नव्हतांच.कुटुंबातील मंडळी गणपतीसाठी एकत्र आल्यासारखे चित्र दिसत होते.हे सारं पाहून पत्रकार बदलू लागले आहेत,त्यांना त्यांच्या प्रश्‍नांची ,अडचणींची ,आणि आपण एकसंध झालो पाहिजेत याची जाणीव व्हायला लागली आहे ही फार महत्वाची गोष्ट मला सिंधुदुर्गाथ अनुभवायला मिळाली.आपल्या चळवळीनं अऩेक प्रश्‍न सोडविले आहेत पण त्यापेक्षाही आपण एक झालं पाहिजे ही जाणीव पत्रकारांमध्ये निर्माण झाली हे चळवळीचं सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं.सिधुदुर्गातल्या पत्रकारांचे आभार,आणि अभिनंदन.

सिंधुदुर्ग ही पत्रकारितेची पंढरी आहे.बाळशास्त्री जांभेकर आणि बाबुराव पराडकर यांची ही जन्मभुमी असल्यानं आपल्यासाठी ही पंढरीच आहे.मात्र या पंढरीत ना पत्रकार भवन आहे ना ,बाळशास्त्री किंवा पराडकरांचं स्मारक आहे.मागच्या सरकारनं दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी 45 लाख रूपये मंजूर केले होते.प्रत्यक्षात ती रक्कम आली नाही आणि स्मारक काही झालं नाही.फडणवीस सरकारनं बजेटमध्ये दीड कोटींची तरतूद केली आहे.हे पैसे लवकरच येतील आणि काम मार्गी लागेल अशी पत्रकारांची अपेक्षा आहे.हे स्मारक होण्यासाठी अध्यक्ष गजानन नाईक यांनी मोठा पाठपुरावा केला. स्मारक झालं पाहिजे याचचा  ध्यास त्यांनी घेतलेला आहे.त्यांनी आपल्या भाषणात पुढील वाषिर्र्क सर्वसाधारण सभा आपल्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत होईल असा शब्द दिला आहे.कोकणी माणसाची जिद्द लक्षात घेता आणि त्याना अन्य सहकार्‍याचं मिळत असलेले सहकार्य बघता वर्षभऱात नक्कीच स्मारकाचं काम मार्गी लागेल यात शंकाच नाही.

सिंधुदुर्गाच्या बैठकीत आणखी एक महत्वाचा निर्णय जाहीर केला गेला.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघाचा दर्पणदिन पोभुर्ले या बाळशास्त्री जांभेकरांच्या गावात होत नाही. बाळशास्त्रींच्या नावाचे पेटेंट घेतल्याच्या आविर्वावात वावराणारे काही बाहेरचे उपटसुंभ पोर्भुल्यात दहा-वीस जणांना घेऊन येतात आणि पत्रकार दिन साजरा करतात.त्याबद्दल अनेकांनी तक्रार केली.हे थांबलं पाहिजे आणि जिल्हा पत्रकार संघाचा पत्रकार दिन पोभुर्ल्यतच साजरा झाला पाहिजे असा निर्णय घेतला गेला.त्यामुळे 2017 चा 6 जानेवारी हा पत्रकार दिन पोभुर्ल्यात साजरा केला जाणार आहे.हा र्निर्णय फार महत्वाचा आहे.

पत्रकार संघातील एकी,पारदर्शक कारभार,परस्पर सलोखा,एकमेकांच्या सुखदुःखात धावून जाण्याची वृत्ती हे सारं पाहून ‘दिल खुष हो गया’.एक आदर्श जिल्हा संघ म्हणून या संघाचं काम नक्कीच उल्लेखनिय आहे असं माझं मत झालं आहे.या सर्वामुळे जिल्हयात आज दुसरी संघटना अस्तित्वातच नाही .’आवाज कुणाचा जिल्हा संघाचा” हा आजचा तेथील नारा आहे.त्याबद्दल अध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस गणेस जेठे,उपाध्यक्ष अशोक करंबळेकर,कोषाध्यक्ष हेमंत कुलकर्णी,तसेच माजी अध्यक्ष अरविंद सिरसाट,संतोष वायंगणकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी आणि तमाम पत्रकारांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत.सिंधुदुर्ग प्रमाणंच रत्नागिरी ,रायगड,ठाणे आणि पालघर या कोकणातील अन्य जिल्हयातही आज केवळ आणि केवळ मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या जिल्हा संघांचाच आवाज आहे.ही गोष्ठही परिषदेसाठी फारच महत्वाची आहे.

परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जिल्हा संघानं माझा सत्कार केला,अन वरती परिषदेला दहा हजार रूपयांची देणगीही दिली.त्याबद्दल सर्वांचे आभार.बाळशास्त्री जांभेकर याचं स्मारक होण्यासाठी परिषद नक्कीच प्रयत्न कऱणार आहे .स्मारकासाठी अकरा गुंठे जागा मिळाली आहे.निधीही मंजूर झाला आहे.अडथळा आहे तो नाठाळ नोकरशाहीचा तिला आता वठणीवर आणण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत.कारण बाळशास्त्रीचं स्मारक हे केवळ सिंधुदुर्गच्याच नव्हे तर राज्यातील तमाम पत्रकारांच्या अस्मितेचा,आणि प्रतिष्ठेचा विषय बनलेलं आहे. ( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here