साहित्यिकच नव्हे तर बहुतेक बुध्दिवादी घटक भूमिका घ्यायला घाबरतात. स्पष्ट भूमिका घेणं म्हणजे कोणत्या तरी टोळीच्या ‘हिट लिस्ट’वर येणं असतं.त्यासाठी बहुतेकांची तयारी नसते…दिवाणखाण्यात बसून राजकारणावर,सामाजिक प्रश्नावर चर्चा करणारे हे बुध्दिजिवी नेहमीच कातडीबचाव भूमिकेत असतात.साधारणतः व्यवस्थेशी जुळवून घेण्यातही ते वाकबगार असतात.व्यवस्थेशी जुळवून घेत शासकीय कमिटया किंवा गेला बाजार लाखाचा पुरस्कार मिळविण्यात हा वर्ग धन्यता मानताना दिसतो.त्यामुळं राज ठाकरे साहित्यिकांबद्दल बोलले म्हणून लक्ष्मीकांत देशमुखांनी वाईट वाटून घेण्याचं कारण नाही..
प्राध्यापक,विचारवंत,डॉक्टर्स,वकिल आणि अगदी अनेक पत्रकारही नरो वा कुंजरो वा च्या भूमिकेत वावरत असतात.हा वर्ग व्यक्त व्हायला लागला तर व्यवस्थेची पळताभूई थोडी होईल.पुरस्कार वापसीच्या वेळेस सरकार किती अस्वस्थ झाले होते ते लपून राहिले नाही.मात्र हा वर्ग बोलत नाही हे खरंच आहे.लक्ष्मीकांत देशमुख म्हणतात,साहित्यिक साहित्यातून भूमिका मांडतात.असेलही तसं.पण हे साहित्य किती लोकांपर्यंत जाते.हजार प्रतीची एखादी आवृत्ती संपायलाही काही वर्षे लागतात.त्यामुळं अशी छुपी भूमिका तरी काय कामाची.एकूणच बुध्दिजिवी गप्प असतात ही व्यवस्थेसाठी चांगली गोष्ट असते.या वर्गानं बोलू नये अशीच व्यवस्थेची इच्छा असते.जे व्यक्त होतात त्यांचा आवाज वेगवेगळ्या मार्गानं बंद करण्याचे प्रयत्न होतात.हे अलिकडं अनेकदा दिसून आलंय.–