जोर जांभळीतील पूरग्रस्तांना
मराठी पत्रकार परिषदेचा
मदतीचा हात
सातारा :अतीवृष्टी आणि महापुराने वाई तालुक्यातील जोर जांभळी परिसराची पार दुर्दशा झाली.. दुर्गम भाग असल्याने त्यांच्यापर्यंत मदत पोहोचायला देखील अनेक अडचणी आल्या.. ही वस्तुस्थिती ओळखून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मराठी पत्रकार परिषदने त्या भागातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार पुणे जिल्हा पत्रकार संघ आणि लोणावळा पत्रकार संघाने ही जबाबदारी उचलली. जिल्हा अध्यक्ष सुनील लोणकर आणि महिला संघटक श्रावणी कामत यांनी पुढाकार घेत जोर जांभळी परिसरात मदत पोहोचविण्याचा निर्णय घेतला.. त्यानुसार जावळी पट्ट्यातील गोळेगाव आणि गोळेवाडी येथील पूरग्रस्तांना ब्लॅकेट, सॅनिटरी नॅपकिन, आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हरिष पाटणे आणि श्रावणी कामत यांच्या हस्ते आज करण्यात आले..
मदत स्वीकारताना पूरग्रस्तांना अश्रू अनावर झाले.. पत्रकारांनी केवळ बातम्या न पाठविता सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून केलेल्या मदतीबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.. स्थानिक नागरिक सुनील गोळे आणि जितेंद्र गोळे यांनी मराठी पत्रकार परिषदेला धन्यवाद दिले..
चिपळूण, महाड, कणकवली, सावंतवाडी आणि आता जावळी परिसरातील पूरबाधितांना मदतीचा हात देऊन मराठी पत्रकार परिषदेने सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श पत्रकार आणि समाजासमोर ठेवल्याचे मत हरिष पाटणे यांनी व्यक्त केले.. दत्ता मर्ढेकर यांनी आभार मानले.. यावेळी वाई परिसरातील पत्रकार, ग़ामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते…